▪️समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना क्रीडा कौशल्य शिकण्याची संधी – डॉ. गावतुरे
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.20मे):-ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी च्या वतीने महाकाली नगरी देवाडा येथे माणिक कुटी भवनात लहान मुलांसाठी समर कॅम्प चे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. वीस दिवस चाललेल्या या समर कॅम्पच्या समारोपास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे, ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर लाभले होते. शिबिराच्या मुख्य संयोजक सौ. रजनी बोढेकर यांनी प्रास्ताविकातून शिबिरात झालेल्या उपक्रमावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. गावतुरे यांच्या हस्ते बेस्ट कॅम्पर अवार्ड कु. मिनल काकडे, चि. ग्रिष्म वाकडे , चि. आरूष झाडे या तिघांना देण्यात आला तर प्रोत्साहनपर पुरस्कार चि.रूहान झाडे, प्रत्युश कोहळे, कु. वेदांती उपरे, कु. अलायना शेख यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. गावतुरे म्हणाल्या,
विद्यार्थ्यांनी रोज सकाळी लवकर उठून व्यायामाची सवय लावावी, रोज सायकल चालवावी आणि आपल्या भोजनात फास्ट फूड टाळावे. आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपले शरीर स्वच्छ, स्वस्थ ठेवावे.घराजवळ वृक्षारोपण करून किमान एक तरी झाडं जगवावे, असे प्रतिपादन केले. बंडोपंत बोढेकर म्हणाले की, समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि उन्हाळी सुट्टीत अनेक चांगल्या गोष्टी शिकता येतात, असे ते म्हणाले. या कॅम्प मध्ये कराटे व लाठीकाठीचे प्रशिक्षण ब्लॅक बेल्ट विनर कु. प्रगती जेनेकर यांनी दिले तर विविध नृत्याचे धडे कु. रिया पिपरीकर यांनी दिले. योग नृत्य वैजयंती गहुकर यांनी शिकवले तर कथाकथन डॉ. धर्मा गांवडे, डॉ. श्रावण बानासुरे यांनी शिकवले. संगीताचे धडे बंडू टेकाम, कार्तिक चरडे गुरूजी यांनी दिलेत. बौध्दीक खेळ प्रा. नामदेव मोरे आणि रोहिणी मंगरूळकर यांनी शिकवले. मेडीटेशन व क्राफ्ट संबंधित माहिती रजनी बोढेकर यांनी दिली. तसेच याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मराठी ,हिंदी ,संस्कृत श्लोकाचे पाठांतर ऐकवले, हे विशेष.