▪️जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर !
▪️पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आरोग्य विभागाकडे लक्ष देणार का ?
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.1मे):-मोर्शी तालुक्यात १ वर्षापूर्वी दापोरी येथील आरोग्य उपकेंद्राचे नविन बांधकाम करण्यात आले, परंतु अद्यापपर्यंत तेथे वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्यांची नियुक्ती न केल्याने १ कोटी रुपये खर्चून बांधलेली नविन रुग्णालयाची सुसज्ज इमारत व कर्मचारी निवासस्थान धूळखात पडलेले आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तसेच इतर खाजगी रुग्णालयांना आर्थिक फायदा व्हावा याकरिता आरोग्य उपकेंद्र सुरु करण्यात येत नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी लावून आरोग्य विभागाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे .
ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी याकरिता विनाविलंब रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचार्यांची नियुक्ती करुन रुग्णालय सुरु करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पत्राद्वारे रुपेश वाळके यांनी अनेक वेळा कळविले परंतु त्या पत्राला आरोग्य विभागाने केराची टोपली दाखवल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होतांना दिसत आहे.
दापोरी व परिसरातील इतर सर्व गावातील गोरगरीब रुग्णांना तातडीची दर्जेदार वैद्यकिय सेवा मिळावी याकरिता माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषाली प्रकाश विघे यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळवून दिली होती त्यानंतर तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी आरोग्य उपकेंद्र व कर्मचारी निवासस्थान ईमारत बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेसह निधीची उपलब्धता करुन दिला होता. सबब रुग्णालय इमारतीचे १ वर्षापूर्वीच बांधकाम पूर्ण होवून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर सुध्दा रुग्णालय सुरु करण्यात आले नसल्यामुळे आरोग्य विभागा विरोधात नागरिकांमध्ये रोष निर्माण होतांना दिसत आहे. हि बाब चुकिची व अतिशय गंभीरस्वरुपाची असुन संपुर्ण आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत दापोरी उपकेंद्र हे सर्वात मोठे आहे. ग्रा.पं. दापोरी व सभोवतालच्या परिसरातील दापोरी डोंगर यवली, घोडदेव, मायवाडी, भाईपुर इत्यादी गावांची लोकसंख्या जवळपास २० हजारा पर्यंत आहे. या परिसरातील संपुर्ण गावातील जनतेच्या आरोग्य सेवेसाठी दापोरी प्राथमिक आरोग्य उप केंद्र तात्काळ सुरू करण्याची गरज असल्याचे मत ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी व्यक्त केले असून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालून ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेऊन दापोरी येथील उपकेंद्र सुरू करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली.
शासनाने ग्रामीण भागातील जनतेचा अंत पाहू नये !
दापोरी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात, प्रथमोपचार, प्रसूतीपूर्व मातांची तपासणी, किरकोळ आजारांवर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता-बाल संगोपन, क्षयरोग, कुष्ठरोग, हिवताप यांसारख्या आजारांवर उपचार, शालेय आरोग्य तपासणी, विविध शस्त्रक्रिया व उपचार करण्यासाठी आधुनिक वैद्यकिय यंत्रसामुग्री उपलब्ध करून ईतर सोई सुविधा निर्माण करून आरोग्य उपकेंद्राला लागणारे अधिकारी कर्मचारी १५ दिवसात उपलब्ध न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य.