पहलगाम : भ्याड दहशतवादी हल्ला !

27

किसी मुल्क को बर्बाद करना हो तो लोगो को धर्म के नाम पर लढा दिजिए, मुल्क अपने आप बर्बाद हो जायेगा’ – लियो टॉलस्टाय यांचे उद्गार आज खरे ठरत आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष बेन्स हे भारतात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये देशाच्या विविध भागातून आलेले हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला पर्यटन व्यवसाय बहरत असतांना दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये 28 हिंदू पर्यटकांना समोरून गोळ्या घातल्या. त्याची प्रतिक्रिया म्हणून देशात संतापाची लाट उसळणे नैसर्गिक होते. या वेळी समस्त विरोधी पक्षांनी सरकारला दिलेला एकमुखी पाठिंबा आणि विविध मुस्लीम संघटनांनी दिलेला संयमी आणि संवेदनशील प्रतिसाद हे सरकारसाठी जमेचे मुद्दे आहेत. पुलवामाप्रमाणेच या वेळीही सुरक्षा यंत्रणेबाबत काही गंभीर शंका आहेत. 

 पहलगाम हे पर्यटकांचे मोठे आकर्षण स्थळ आहे. सर्व देशातून काश्मीरमध्ये येणारे पर्यटक श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम येथे हमखास येतात, पहलगाम हे भारत-पाकिस्तान सरहद्दपासून बरेच दूर आहे. सरहद्दीपासून पहलगामला पोहोचायला 8 तास तरी लागतातच. अशा दूर अंतरावर पाकिस्तानमधून आलेले प्रशिक्षित व सशस्त्र दहशतवादी पोहोचले तरी कसे? हे गूढ अजून उकललेले नाही. किश्तबाडमधून त्रालच्या दाट जंगलातून हे पायपीट करुन आले असण्याची शक्यता आहे. पण ते पहलगामला पोहोचून तेथे 28 हिंदू पर्यटकांचे रक्ताचे सडे उडवेपर्यंत जम्मू-काश्मीर पोलीस, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, निमलष्करी दले आणि लष्करी सैन्यदलाला सुद्धा त्याचा चांगपत्ता लागला नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. जम्मू काश्मीर हा देशातील सर्वांत मोठा संवेदनशील व हाय सिक्युरिटी झोन आहे. पाकिस्तानच्या सरहद्दीला लागून हे राज्य आहे. 24 तास डोळ्यांत तेल घालून तेथे घडणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते, मग यावेळी आपण कमी कुठे पडलो? 

 सुमारे दोन हजार पर्यटक असलेल्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नसणे, गुप्तचर यंत्रणेला सुगावा न लागणे याची जबाबदारी कोणाची? काश्मीरचे स्थित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन खोऱ्यात निरपराध व निष्पाप पर्यटकांच्या हत्याकांडाने रक्ताचा सडा पडला. त्या दिवशी बेसरनमध्ये येऊन कुणी घोडेस्वारीचा आनंद घेत होते तर कुणी खाण्यापिण्यात मस्त दंग होते, मुले खेळत होते, मस्ती करत होते, कुणी फोटो काढत होते, तर कोणी व्हीडिओ शूटिंगमध्ये निसर्गाचे सौंदर्य टिपत होते. अचानक गोळीबाराचे आवाज आले, पोलिसांच्या गणवेषात काही धावतांना दिसले, पोलिसांबरोबर कुणाची तरी चकमक चालू आहे असे पर्यटकांना क्षणभर वाटले पण ने तरुण दहशतवादी हातात बंदूक घेऊन प्रत्येकाला नाव विचारावला लागले, तू हिंदू का मुस्लीम असा प्रश्न थेट विचारू लागले, कलाम पढायला सांगू लागले आणि एकापाठोपाठ एक अशा हिंदू पर्यटकांना डोक्यावर, छातीवर गोळ्या घालून ठार मारू लागले. पत्नी आणि मुलांसमोर त्यांनी पुरुष पर्यटकांवर गोळ्यांचा वर्षाय केला. एवढा मोठा रक्तपात काश्मीर खोऱ्यात कित्येक वर्षांत घडला नव्हता. 

 त्या दिवशी पहलगाम परिसरात 2500 पर्यटक होते, बेसरनच्या पठारावर मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, गुजराती असे विविध भाषिक पर्यटक जमले होते. दहशतवाद्यांनी कुणालाही त्यांची जात, त्यांचा प्रांत किंवा त्यांची भाषा कोणती असा प्रश्न विचारला नाही, तर ते कोणत्या धर्माचे आहेत एवढाच प्रश्न विचारत होते, काहींनी पर्यटकांकडे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्सची मागणी केली, ज्या पर्यटकांविषयी संशय आला त्यांच्या अंगावरची पेंट काडून खतना तपासला. खतना न केलेल्यांना त्यांनी जवळून गोळी घातली, जे गप्प बसले, तेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. पहलगाममध्ये 2500 पर्यटक असतांना ज्या बेसरनमध्ये हत्याकांड घडले त्याच्या जवळपास कुठेही सुरक्षा व्यवस्था नव्हती, कुठेही पोलीस चौकी नव्हती, कुठेही गस्त नव्हती. दहशतवाद्यांना रोखायला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नसावी हे असे कसे घडू शकते? विशेष म्हणजे गोळीबार झाल्यावर व 28 पर्यटकांची हत्या झाल्यावर दहशतवादी तिथेच काही काळ होते पण सुरक्षा व्यवस्थेला काही कळू शकले नाही, हे चिंताजनक आहे. दहशतवादी निश्चितच हत्याकांड घडविण्यापूर्वी अगोदर आलेले असणार, ते काही बंदुका हातात येऊन जंगलात फिरत बसणार नाहीत, मग ते कुठे राहिले, कुठे जेवले, त्यांना मदत करणारे स्थानिक कोण आहेत? घटनेनंतर पाच दिवस उलटले तरी त्याचा तपशील बाहेर आला नाही. पाकिस्तानच्या सीमेवरून दहशतवादी घुसले तेव्हा आपले सुरक्षा दल कुठे कुठे होते? दहशतवादी हे पोलिसांच्या किंवा लष्करी सैनिकांच्या गणवेषात पहलगामला आले होते, त्यांना सुरक्षा दलाचे गणवेष कुणी पुरवले? ते त्यांनी कुठे अंगावर घातले? अंगावरचे कपडे कुठे बदलले व कुठे लपवून ठेवले?

  मोदी सरकारच्या दोन कारकिर्दीत पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्‍याने सर्व देशाचा धरकाप उडला होता. दहशतवादी देशात कसे घुसले? तिथपर्यंत कसे पोहोचले, सुरक्षा दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्‍या बसपर्यंत ते कसे पोहोचू शकले? साडेचारशे किलो आरडीएक्स हाय सिक्युरिटी झोनमध्ये कसे येऊ शकले? सुरक्षा दलाचे जवान विमानाने न जाता बसेसमधून प्रवास करीत आहेत ही माहिती दहशतवाद्यांपर्यंत कशी पोहोचली? पुलवामा हल्ला करणारे दहशतवादी कोण आहेत, कुठे आहेत? पुलवामाचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये पुसून बालाकोटला एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे असंख्य अड्डे उद्धस्त केले असे सांगितले गेले, मग त्यानंतरही काश्मीरवर दहशतवादी हल्ले कसे चालू राहिले? तेव्हा 44 सुरक्षा दलाच्या सैनिकांची हत्या झाल्यावर इंटेलिजन्सचे अपयश म्हणून आरोप झाले, आता पहलगाम पर्यटकांच्या हत्याकांडानंतरही इंटेलिजन्सवर खापर फोडले जात आहे. पुलवामा हत्याकांडानंतर जम्मू-काश्मीरचे तत्कालीन उपराज्यपाल सतपाल मलिक यांनी त्या घटनेबाचत सरकारला दोष दिला होता. सरकारने दुर्लक्ष केले, असे म्हटले होते. पण त्या घटनेला कोण जबाबदार आहे हे कधी समजलेच नाही.

 पहलगाम हत्याकांडाची जबाबदारी पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या द रेजिस्टेंस फ्रंट ने घेतली होती ती नंतर घुमजाव करून झटकली. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील कोकेरनाग येथून किश्तवाड मार्गे बेसरनला पोहोचले. बर्फाच्छादीत पर्वतांनी वेढलेल्या बेसरनच्या पठारावर दहशतवादी दुपारी 3 वाजता पोहोचले तेव्हा देशाच्या विविध भागांतून आलेले पर्यटक त्यांच्या मित्रमंडळी व परिवारासह मौज-मजा मस्तीत आनंद लुटत होते. आपल्याला कोणी प्रतिकार करणारे नाही, पर्यटक निःशस्त्र आहेत. जवळपास कुठेही सुरक्षा व्यवस्था नाही. हे दहशतवाद्यांना पूर्ण ठाऊक असावे. बेसरनपासून 5 किमी अंतरावर सीआरपीएफचा कॅम्‍प आहे, पण त्याची सुद्धा दहशतवाद्यांना पर्वा नव्हती.

 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 200 निरपराध मुंबईकरांचा बळी गेला. मुंबई पोलीस दलातील धाडसी व आक्रमक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्‍यांनाही दहशतवाद्यांशी लढतांना मरण आले, पण मुंबई सर्व दहशतवादी पोलिसांनी आलेले सर्व दहशतवादी वेचून-वेचून ठार मारले. एवढेच नव्हे तर अजमल कसाबला पोलिसांनी जिवंत पकडला व पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सर्व जगाला दाखवला, त्याच कसाबला नंतर फाशी झाली. संसदेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हाही सर्व दहशतवादी संसदेच्या प्रांगणातच ठार मारले गेले. मुंबईवरील आणि संसदेवरील हल्यात दहशतवादी हे लष्करी गणवेषात होते. तसेच पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यातही दहशतवादी लष्करी गणवेषात होते. दुर्दैवाने पुलवामा येथील हल्ल्यात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा म्हणून कोणाला पकडून जगाला दाखवता आलेला नाही. पहलगाम येथे हत्याकांड घडविणारे दहशतवादी कसे-कुठे पसार झाले ते अजून समजलेले नाही.

 गेली सहा दशके जम्मू काश्मीरला घटनेतील 370 कलमानुसार विशेष दर्जा होता. जम्मू-काश्मीरचा झेंडा सुध्दा वेगळा होता. केंद्राने केलेले कायदे काश्मीरच्या विधानसभेने मंजूर केल्यावर तिथे लागू होत असत. काश्मीरमध्ये हिंदुस्थानातील कोणात्याही व्यक्तीला मालमत्ता खरेदी करता येत नव्हते. मोदी सरकारने 370 वे कलमच काढून घेतले, त्यावर संसदेने शिक्कामोर्तब ही केले. जम्मू-काश्मीरचे विभाजन करून लेह-लद्दाख वेगळा केला. काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश केला. काश्मीरला विधानसभा दिली, पण पूर्ण दर्जा अजून मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा जास्त अधिकार तेथील उपराज्यपाल यांना आहेत. पण अशा मुद्दयावरून काश्मीरमध्ये असंतोष व अशांतता कशी निर्माण होईल यासाठी पाकिस्तान सतत प्रयत्न करीत असतो. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे भारताच्या विरोधात नेहमीच गरळ ओकण्याचे काम करीत असतात.

 16 एप्रिल 2025 रोजी इस्लामाबाद येथे एका परिषदेत ते म्हणाले, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्यातील नस आहे, ती कधीही विसरली जाणार नाही. काश्मिरी बांधवांना त्यांच्या शौर्यपूर्ण संघर्षात एकटे सोडणार नाही पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ म्हणाले, भारताने पाकिस्तान शहरात घुसून कारवाई केल्यास त्याची किमत भारताला मोजावी लागेल. जर पाकिस्तानी नागरीकांना काही इजा झाली, तर भारतीय नागरीक सुरक्षित राहणार नाहीत. पहलगाममध्ये निरपराध 28 हिंदू पर्यटकांच्या भीषण हत्याकांडानंतर भारताने गप्प बसून सहन करावे असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते काय? पहलगाम हत्याकांडानंतर त्याच्याशी आमचा काही संबंध नाही, हल्ला करणारे स्वातंत्र्य सैनिक असू शकतात अशी प्रतिक्रिया पाकिस्तानने व्यक्त केली होती म्हणूनच अजमल कसाबसारखा दहशतवादी चेहरा जिवंत पुरावा म्हणून भारताला, जगाला पुन्हा एक्दा दाखवावा लागेल पहलगामची घटना म्हणजे पाकिस्तानकडून भारतावर हमाससारखा झालेला हल्ला आहे. आता भारत सरकार इस्रायलप्रमाणे सडेतोड उत्तर देणार, याची सारे जग वाट पाहत आहे. खरेतर पहलगाममध्ये हत्याकांड घडवून पाकिस्तानने भारताच्या विरोधात फार मोठा जुगार खेळला आहे.

 टी.व्ही. स्टुडिओत बसून पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची वल्गना करणारे अँकर आणि जनतेतील उन्मादी कोलाहल सरकारने आटोक्यात ठेवणे ही काळाची गरज आहे. युद्ध आणि मुत्सद्देगिरी हे गंभीर विषय टीआरपीसाठी वापरले जाऊ शकत नाहीत. देशातील व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी यांची संख्या जगात सर्वाधिक आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी हजारो प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी गुंतले आहेत. त्याची खरच गरज आहे का? एकीकडे सैन्य संख्या रोडावत आहे, तेथे अग्निवीरसारखी कंत्राटी योजना राबविण्यात येते तर दुसरीकडे या तथाकथित अति महत्त्वाच्या व्यक्तींना संरक्षण देण्यासाठी प्रशिक्षित कमांडोजची नेमणूक करण्यात येते आणि काश्मीरमध्ये दोन हजार पर्यटक असलेल्या ठिकाणी एकही सुरक्षा कर्मचारी नसणे हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे.

 भारताच्या सीमेवरील भौगोलिक व राजकीय परिस्थिती, प्रचंड मोठी सागरी सीमा लक्षात घेता अग्निवीर योजनेचा गांभीर्याने पुनर्विचार होणे गरजेचे आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाच्या आधारे हे अग्निवीर सियाचिन, पूर्वोत्तर खडतर प्रदेश, पश्चिमेच्या वाळवंटात कसे टिकाव धरतील? चार वर्षांच्या सेवेनंतर ७५ अग्निवीर सेवानिवृत्त होणार याचे दडपण त्यांच्यावर नक्की असणार हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे. नौदल आणि वायुसेनेतील अग्निवीरांसमोर तर तंत्रज्ञान आणि समुद्रावरील जीवनाशी जुळवून घेण्यासाठी किमान दीड ते दोन वर्षे जातील, हे नाकारता येत नाही. नुकतेच तातडीने सरकारने अत्यंत कडक निर्णय घेतले ते किती परिणामी ठरतात ते काळच ठरवेल. सरकारने बोलाविलेली सर्वपक्षीय बैठक हे स्वागतार्ह पाऊल होते परंतु या बैठकीत सहभागी होण्याऐवजी मा. पंतप्रधान बिहार दौऱ्यावर जाणे मात्र खटकणारे आहे. काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी कोणतीही जादूची छडी उपलब्ध नाही, तो केवळ मुत्सद्दीपणाने सुटू शकतो याबाबत तज्ज्ञाज्ध्ये एकमत आहे. पाकिस्तान भारताच्या तुलनेत सर्व आघाड्यांवर खूप मागे आहे. जसे तो राजकीय अस्थिरता, लोकशाही मूल्यांचा ऱ्हास यामुळे प्रदीर्घ काळ ग्रासला आहे, तेथील अर्थव्यवस्था डबघाईस तर महागाई, बेरोजगारी आणि परकीय कर्जाचे ओझे हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. दहशतवाद पोसल्याची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. तर संयम, अराजकीय आणि धर्मनिरपेक्ष सैन्य, विकसनशील अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही ही आपली बलस्थाने आहेत. पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत त्याचप्रमाणे पहलगाम आत्मघाती हल्ल्याला सुध्दा आज आठ दिवस झाली आहेत. देशभरात या 28 पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. आजच्या दिनी त्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रध्दांजली!

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com