शेतकरी पुत्र प्रा. मा. म. देशमुख सत्यशोधक इतिहासकार 

76

साहित्यातून आणि व्याख्यानातून सत्य विचारांची पेरणी करणारे सत्य विचारांचे वाहक, आयुष्यभर समाजप्रबोधन करणारे समाज प्रबोधनकार, सत्य धर्माची धगधगती मशाल हातात घेणारे सत्यधर्माचे प्रचारक, विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला देणारे थोर समाजसुधारक, निष्ठावंत व स्वाभिमानी लेखक – वक्ते – इतिहासकार, इतिहासाच्या स्वातंत्र्योत्तर काळातील बहुजन समाजाच्या प्रबोधनाचे महत्त्वाचे शिलेदार, सत्यशोधकी प्रबोधन परंपरेचे अस्सल उद्गगाते,बहुजन चळवळीचे चालते बोलते विद्यापीठ, बौद्ध धम्म आणि सार्वजनिक सत्यधर्माचे समर्थक असलेले शेतकरी पुत्र सत्यशोधक इतिहासाचार्य प्रा. मा. म. देशमुख यांचे दि.१९ मार्च २०२५ ला दुःखद निधन झाले त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व येथे शब्दबद्ध करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो.

           सरांचे वडील महादेवराव देशमुख आणि आई सखुबाई या शेतकरी कुटुंबात त्यांचा दि.११ जुलै १९३६ रोजी इसापूर या ग्रामात जन्म झाला.

महादेव पिता । सखुबाई माता ।

सुसंस्कार दाता । लाभियले ॥

     माता पित्यांच्या सुसंस्कारामुळे त्यांच्यात प्राथमिक शिक्षणापासूनच शिक्षणाची आवड निर्माण झाली नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सतत प्रगती करीत राहिले. हे सर्व त्यांच्या विद्यार्थी जीवनातील जिद्द व चिकाटी असल्यामुळे होऊ शकले हीच जिद्द व चिकाटी त्यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत कायम ठेवली. आजच्या प्रलोभनाच्या युगातील विद्यार्थ्यांना त्यांचे विद्यार्थीजीवन प्रेरणादायी ठरेल असेच होते.

      असे शेतकरी पुत्र ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख बुधवारी दि.१९ मार्च २०२५ ला ८९ वर्षी संपूर्ण बहुजन समाजाला दुःखसागरात सोडून निघून गेले. प्रा. मा. म. देशमुख सर शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीटमध्ये उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांची चिकित्सक वृत्ती असल्याने ते इतिहासातील सत्यता बाहेर काढायचे. १९५४-१९६३ पर्यंत नागपूर महानगरपालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६४ नंतर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आदर्श प्राध्यापक कसा असावा? हे त्यांनी जगाला दाखवून दिले आणि आदर्श अध्यापनातून व मार्गदर्शनातून हजारो आदर्श विद्यार्थी घडविले.

 

“देशमुख सर । पूजक तत्वांचे ।

 विद्यार्थी सत्वांचे । दीपस्तंभ ॥”

अभ्यास कसा करावा? हे त्यांचे पुस्तक विद्यार्थी जगतात खूप गाजले. अभ्यासात अडथळा आणणाऱ्या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांना त्यांनी त्याग करायला सांगितला. अशा प्रकारचा त्याग केल्यानंतर विद्यार्थी गुणवंत होणारच,bअसा त्यांचा आत्मविश्वास होता. 

ते विद्यार्थ्यांना म्हणायचे की,

” विद्यार्थी जीवन । करा त्यागमय ।

होई अभ्युदय । जीवनाचा ॥”

 

            ते १ ऑगस्ट १९९६ ला जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना भावना प्रधान होऊन निरोप दिला असे ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.

        नवीन इतिहासाची मांडणी त्यांनी केली, बहुजन जागृतीसाठी आपल्या लेखणीतून त्यांनी नवीन दालन उघडले. लेखातून व भाषणातून त्यांनी बहुजनांमध्ये जनजागरण केले. ” मध्ययुगीन भारताचा इतिहास ” या ग्रंथाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. 

        प्रा.मा.म. देशमुख सर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील तेजस्वी तारा होते. बहुजनांचे उद्धारक होते. बहुजन चळवळीला समोर नेण्याचे काम त्यांनी लेखनीतून केले. ते कांशीरामजीच्या विचारांचे पाईक होते. त्यांच्या निधनामुळे बहुजन समाजाची व चळवळीची प्रचंड हानी झाली आहे.

       सरांनी त्यांच्या कार्यकाळात “मध्ययुगीन भारताचा इतिहास ” हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथावर महाराष्ट्र सरकारने बंदी आणलेली होती; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करीत असताना प्रा. मा. म. देशमुख सरांचे वकीलपत्र निशुल्क घेऊन सबळ पुराव्याच्या आधारावर ग्रंथावरील बंदी मा.उच्च न्यायालयाने उठविली व सत्य इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून प्रा. मा. म. देशमुख सरांना मान्यता मिळाली. सत्यशोधकी प्रबोधन परंपरेचे ते अस्सल उद्‌गाते आहेत. राष्ट्रजागृती करिता समाजजागृती करणे हा त्यांनी स्वतःचा जीवनधर्म मानला होता. वाचन संस्कृती नष्ट होत असलेल्या आजच्या या समाजात “ज्याच्या घरात नाही पुस्तकाचे कपाट त्याचे घर केव्हाही होईल सपाट” असा संदेश त्यांनी जीवनभर दिला. अलीकडे तर 

” ज्या घरी पुस्तकांचे

 कपाट आणि कम्प्युटर ,

ते घर होईल जगात अग्रेसर ॥”

 असा वैज्ञानिक बदल लक्षात घेऊन संदेश त्यांनी दिला. मागील पन्नास वर्षांपासून व्याख्यानांतून, पुस्तकांतून, शिबिरांतून परिवर्तनाचे विचार स्पष्टपणे, निर्भिडपणे प्रा. मा. म. देशमुख सरांनी मांडले आहेत. आज बहुजन समाजात होणाऱ्या परिवर्तनामध्ये सरांच्या ग्रंथांचा वाटा अनमोल आहे. सरांच्या ग्रंथांची सामान्य कार्यकर्ते, विचारवंत, विरोधक टीकाकार या सर्वांनीच दखल घेतली आहे.

“मध्ययुगीन भारताचा इतिहास” या ग्रंथाने सर इतिहास-संशोधक असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालाने सिद्ध झाले आहे. सरांच्या सर्वच पुस्तकांची विक्रमी विक्री देखील इतिहासाने दखल घेण्यासारखी आहे.

                                               मराठा सेवा संघाच्या वैचारिक जडणघडणीत सरांच्या वाङ्मयाचा आणि प्रत्यक्ष कार्याचा देखील सिंहाचा वाटा आहे. ‘कॅडर-कॅम्प’, कॅडर बेस संघटना व तिची शिस्त आणि मूल्ये सरांनी मराठा सेवा संघाला बहाल केली आहेत. त्यांच्या भाषेचा, लेखन शैलीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणामही मराठा सेवा संघाच्या लेखक, कार्यकर्त्यांवर झालेला आहे. 

         बुद्ध -शिव- फुले- शाहू- आंबेडकरांची प्रेरणा घेऊन ऐतिहासिक लेखनाची जी परंपरा निर्माण केली, त्या परंपरेत लेखन करणाऱ्या अनेक इतिहास लेखकांना सरांचा इतिहासकार म्हणून मोठा आधार वाटतो. सरांच्या ” प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास ” या ग्रंथाने तर स्वातंत्र्योत्तर काळातील बहुजनांच्या पिढीला स्वअस्तित्वाचे, अस्मितेचे भान दिले; तर मनुवाद्यांशी लढा, बहुजन समाज आणि परिवर्तन, शिवशाही इ. पुस्तकांनी पर्यायी समतावादी व्यवस्था दिलेली आहे. व्यावहारिक शिक्षणाच्या संदर्भात जे त्यांनी मार्गदर्शन केले ते अनमोल ठरले.

        प्रत्यक्ष सामान्य शेतकरी कुटुंबातून सरांनी संघर्ष करून स्वतःला सिद्ध केल्यामुळे या समतावादी धर्माचा त्यांनी जाहीर पुरस्कार केला आणि त्या दिशेने जाण्याचा मार्ग बहुजन समाजाला दाखविला.

        सरांचे विविध विषयांवर २६ ग्रंथ प्रकाशित झाले असून त्या सर्व ग्रंथांना वाचकांपर्यंत पोचविण्याचे सुलभ तंत्र त्यांनी शोधले. त्यासाठी ग्रंथांचे अल्पमूल्य ठेऊन मध्यस्थ टाळले आणि व्याख्यान प्रसंगी सरांनी स्वतः ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिले. त्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रात सरांचे १० लाखांपेक्षा जास्त वाचक आहेत. एवढी लोकप्रियता मिळविणारे प्रा. मा. म. देशमुख सर एकमेव साहित्यिक असावे.

 

ग्रंथ शिकविती । न्याय आणि नीती ॥

पुस्तकांशी प्रीती । करावीच ॥”

       अशाप्रकारे त्यांनी जीवनभर पुस्तकांवर प्रेम केले व इतरांनाही करायला सांगितले, असे प्रा. मा. म. देशमुख हे ग्रंथप्रेमी होते.

 

             हजारो व्याख्याने देणारे,

शिबिरांना मार्गदर्शन करणारे, मा. कांशीराम साहेबांसोबत भारतभर दौरे करणारे निष्ठावंत व स्वाभिमानी लेखक, वक्ते, प्रबोधनकार म्हणून इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांची महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला ओळख आहे.

       प्रा.मा.म.देशमुख यांच्या ‘मध्ययुगीन भारताचा इतिहास’ या पुस्तकामुळे तळतळाट झालेल्या लोकांनी नागपूरमध्ये २७ जानेवारी १९६९ रोजी त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ग्रंथाच्या होळ्या केल्या; परंतु त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेमयात्रा काढून प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे हे प्रा. मा. म. देशमुख कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, अत्यंत स्पष्टपणे बहुजनांच्या इतिहासाची बाजू मांडणारे इतिहास संशोधन क्षेत्रातील तेजस्वी तारा होते. ते विचारवंत म्हणून महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला परिचित आहेत. विश्वास न ठेवता विचार करता आला पाहिजे, असे ते भाषणातून नेहमीच सांगायचे. हिंदुधर्मातील जातीभेदांवर ते तुटून पडायचे, असे परखड प्रश्न ते सभेत विचारायचे. विचार कृतीत उतरला तर त्याची चळवळ बनते. अशा महत्वपूर्ण विचारांची ते मांडणी करायचे. इतिहासाची चिकित्सा झाली पाहिजे. सत्य इतिहास समाजासमोर आणला गेला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत 

होते. संत तुकाराम महाराज त्यांचे आदर्श होते.

 

“तिर्थ धोंडा पाणी,

 देव रोकडा सज्जनी”

     हा अभंग ते भाषणात नेहमी सांगायचे. त्यांनी सतत सत्य विचारांची पेरणी केली. हजारो भाषणे दिली. भाषण देताना व्यासपीठ न म्हणता ते विचारमंच म्हणायचे. आज हा शब्द रुढ झाला आहे पण सर्वच बहुजन कार्यक्रमाच्या आणि भाषणाच्या वेळी हा शब्द आचरणात आणतात की नाही हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. ते भाषणात म्हणायचे की, प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवावा असा माझा आग्रह नाही पण विचार करावा, विश्वास ठेवल्याने विकार वाढतात तर विचार केल्याने ‘विकास’ वृद्धिंगत होतो. मानसाच्या वयाबरोबर वैचारिक वयसुद्धा वाढले पाहिजे. समाजाचे वैचारिक वय वाढले तरच समाजाचा विकास होतो असे ते म्हणत असत. बहुजन समाजाच्या वैचारिक वयात वृद्धी झाली पाहिजे. विज्ञानवादी बना, अंधश्रद्धेतून बाहेर पडा असे ते म्हणत. मनुवाद्यांवर तुटून पडल्यामुळे त्यांना आयुष्यात अनेकदा संकटांना तोंड द्यावे लागले; पण कोणत्याही परिस्थितीत ते कधी विचारापासून परावृत्त झाले नाही.

                                               मराठा सेवा संघ, आंबेडकरवादी संघटना, बहुजनांतील विविध संघटनांचे पितामह असलेल्या प्रा. मा. म. देशमुख सरांचा मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित महाअधिवेशन दि.२४ डिसेंबर २०१५ ला क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड, अकोला येथे मानपत्र – स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला होता. तसेच सप्तखंजरी प्रबोधनकार संघ महाराष्ट्र राज्य डॉ.रामपाल धारकर श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त गावकरी शेंदुर्जना खुर्द यांच्या वतीने दि.१६ मे २०२४ ला प्रबोधन दिनी शेंदुर्जना खुर्द येथे ४१ हजार रूपये, शाल, स्मृतिचिन्ह आणि ‘सन्मानपत्र’ देऊन भव्य सत्कार करण्यात आला होता तसेच इतर अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले होते. हे सर्व पुरस्कार त्यांच्या क्रांतिकारी-परिवर्तनवादी कार्याची पावतीच आहे.

         ‘प्राचीन भारताचा इतिहास’, ‘युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा’, ‘मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा’, ‘बहुजन समाज आणि परिवर्तन, शिवशाही, सन्मार्ग, अभ्यास कसा करावा?, राष्ट्रनिर्माते, रामदास आणि पेशवाई, मनुवाद्यांशी लढा, समाज प्रबोधन, अभिनव अभिरूप लोकसभा ( नाट्य), मध्ययुगीन भारताचा इतिहास, दिल्ली सुलतानशाहीचा इतिहास, मोगल कालीन भारताचा इतिहास ही सर्व त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. विज्ञानवादी दृष्टीकोन समाजाला देणारे ते थोर समाजसुधारक असून सत्यशोधकी प्रबोधन परंपरेचे ते अस्सल उद्‌गाते आहेत.

            काळाच्या पडद्याआड गेलेल्या प्रा.मा.म.देशमुख सरांच्या कार्य कर्तृत्वाचे स्मरण बहुजन समाजात सतत होत राहील; कारण त्यांचे विचार हे बहुजनांच्या हितासाठी अखंड प्रेरणा देणारे आहेत. शेतकरी पुत्र सत्यशोधक इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख सरांना विनम्र आदरांजली अर्पण करतो.

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)मो:-८०८७७४८६०९