

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.11मे):-शब्दास्त्र विचार मंच, बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी समिती,बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन दि. १५ मे २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन,भीमटेकडी अमरावती येथे करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे प्रमुख अतिथीपदी व परिवर्तनवादी आंबेडकरी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी कवी व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे.
समाजप्रबोधनकर्ते व अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांची सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक विषयावरील अकरा पुस्तके प्रकाशित झाली असून ‘निखारा’ व ‘ अभंग तरंग’ या दोन काव्यसंग्रहासह आदर्श अभ्यास पुस्तिका,आदर्श अभ्यासाचे तंत्र, आदर्श मार्गदर्शिका ही अभ्यास विषयक पुस्तके तथा नळावरची झोंबाझोंबी, शकुने !आता आपलं कसं ?,भद्याचं लगीन, दारुनं मेला ओ माय,हुंडा पापाचा हंडा या सामाजिक एकांकिका प्रकाशित झालेल्या आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन,आदर्श निबंध लेखन पुस्तिका,पत्राद्वारे विद्यार्थी प्रबोधन,श्री संत गुरू रविदास जीवन व कार्य, थोरांची लेखमाला इत्यादी पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचार माला ते जयंती- पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सादर करतात,तर त्यांची शैक्षणिक प्रबोधन माला विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धीसाठी तथा समाजातील विविध समस्यांवर प्रबोधन करणारी सामाजिक प्रबोधन माला सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजासमोर ते सादर करतात.
आजपर्यंत त्यांनी अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन, ग्रामीण मराठी दलित साहित्य संमेलन,विद्रोही साहित्य संमेलन, सत्यशोधक साहित्य संमेलन, कोरोना काळातील ऑनलाईन साहित्य संमेलने इत्यादी संमेलनातील निमंत्रित कवी तथा कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले आहे.
प्रा.अरुण बुंदेले यांच्या सामाजिक,शैक्षणिक व साहित्यिक कार्याचा गौरव दोन राष्ट्रीय व २३ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी आंबेडकरी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



