

▪️कांकरिया ट्रस्टकडून वीजग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19मे):- गंगाखेड तालुक्यातील खादगाव येथे दि. १८ मे २०२५ : “गरजेला जो धावून जातो, तोच खरा माणूस असतो…” या तत्त्वाला अनुसरून, बी.के.बी.सी.च्या कांकरिया ट्रस्टने अतिशय संवेदनशील आणि प्रेरणादायी माणुसकीचे कार्य करत एक आदर्श उभा केला आहे.
मौजे खादगाव येथील शिवारात राहणाऱ्या गंगाधर नामदेव फड यांच्या शेतातील घरावर १८ मेच्या रात्री २ वाजता आकाशातून वीज कोसळली. सुदैवाने त्या रात्री वादळी पावसामुळे संपूर्ण कुटुंब शेजारील घरी स्थलांतरित झाले होते, त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र, त्यांचे घर व घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, कपडे, धान्य इत्यादी १००% जळून खाक झाले.
ही हृदयद्रावक बातमी सोशल मीडियावर पोहोचताच, ट्रस्टच्या सचिव सौ. मंजूताई दर्डा यांनी तातडीने संवेदना व्यक्त करत, “संकटात धावून जाणे हीच खरी माणुसकी” या भावनेतून त्वरित मदतीसाठी पुढाकार घेतला व ट्रस्टने पीडित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला.
कांकरिया ट्रस्टने दिलेल्या मदतीमध्ये स्टीलची आवश्यक भांडी, पुरुषांचे कपडे, महिलांसाठी साड्या, मुलांसाठी कपडे, तसेच एक महिना पुरेल इतके अन्नधान्याचे जीवनावश्यक कीट देण्यात आले. या कीटमध्ये आटा, तांदूळ, साखर, खाद्यतेल, तूर डाळ, मूग डाळ, बेसन, मीठ, चहा पावडर, विविध मसाले आणि बिस्किटांचे पॅकेट्स यांचा समावेश होता.
ही मदत केवळ वस्तूंची नव्हे, तर धैर्य, आधार आणि माणुसकीचा सुगंध देणारी होती. या कार्यातून ट्रस्टने “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या आपल्या ब्रीदवाक्याला प्रत्यक्षात उतरवले आहे. समाजात निस्वार्थी सेवा, करूणाभाव आणि बांधिलकी यांचे बीज पेरणारे हे कार्य अनेकांसाठी दीपस्तंभ ठरेल, यात शंका नाही.



