

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19मे):-शहरातील वाहतुक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्याचा फटाका सर्वांनाचा बसतो. अबालवृध्द, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिलांसह अनेक घटकांना वाहतुक कोडींचा सामना करावा लागतो. त्यात रेल्वे फाटक बंद होणे, ही मोठी डोकेदुखी आहे. परिणामी, शहराच्या चौफेर प्रत्येक रस्त्यांवर वाहानांच्या लांबच लांब रांगा लागतात. दररोज होणाऱ्या या त्रासाला शहरवासीयांसह तालुक्यातील जनता आणि वाहनधारक वैतागले आहेत. त्यामुळे स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांंनी केंद्रात पाठपुरावा केला होता. अखेर, त्या पाठपुराव्यास चांगले यश आले असून शहरात भव्य उड्डानपूल मंजूर झाला आहे.
परंतु, त्या प्रस्तावित उड्डानपूलास काही विकास विरोधी मंडळींनी विरोध केला आहे. त्यांच्याकडून जनतेची सातत्याने दिशाभूल केली जात आहे. मात्र, आम्ही सुध्दा त्यांचे बाप आहोत. त्यांच्या नाकावर टिच्चून उड्डानपूल करून घेऊ. त्यात जीव गेला तरी बेहत्तर, पण उड्डानपूल करून घेणारचं, असा निर्धार उड्डाणपूल निर्माण संघर्ष समितीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले यांनी केला.
शहरातील प्रस्तावित उड्डानपूलाच्या समर्थनार्थ आयोजित भव्य मोर्चास संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद मुरकुटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले, जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, इक्बाल चाऊस, माजी नगरसेवक नंदकुमार पटेल, जेष्ठ व्यापारी सुभाष नळदकर, गंगाधरराव पवार, मनोज मुरकुटे, तुकाराम तांदळे, बालाजी मुंडे यांच्यासह अनेकांनी मनोगते व्यक्त करून सर्वसामान्य जनतेच्या भावना मांडल्या. शेवटी, स्थानिक तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उड्डानपूलाचे समर्थन करणारे लेखी निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी, दिलकश चौक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी ‘अरे कोण म्हणतंय होणार नाही, केल्याशिवाय राहाणार नाही!’, ‘गुट्टे साहाब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!’ यासह विविध घोषणांनी सगळा परिसर अगदी दणाणून गेला होता.
२०२४ साली मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे सुरक्षा अंतर्गत शहरातील तहसील कार्यालयाच्या जवळ कोद्री-अकोली रोडवर उड्डाणपुल मंजुर झाला आहे. विशेष म्हणजे या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची निविदा सुध्दा प्रसिध्द झाली आहे. परंतु, काही राजकीय लोकांनी विकासात आडथळा आणण्यासाठी या कामात तांत्रिक अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे विकासाला प्राधान्य देत आम्ही शहरवासीय व तालुक्यातील सर्वसामान्य जनता आणि वाहनधारकांच्या वतीने उड्डाणपूल निर्माण संघर्ष समितीची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून आमचा उड्डानपूलास जाहीर पाठींबा आहे. शहरातील रेल्वे गेटच्या दक्षिणेच्या बाजुस गंगाखेड शहराचा जवळपास ४० टक्के भाग येतो. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, न्यायालय इमारत, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच अनेक शाळा व महाविद्यालय आहेत. परिणामी, प्रस्तावित उड्डानपूल होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्या लेखी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
त्याचबरोबर शहरातील प्राध्यापक कॉलनी, भंडारी कॉलनी, अरुणोदय कॉलनी, ममता कॉलनी, महात्मा फुले नगर, तुळजाभवानी नगर, राजीव गांधी नगर, बंजारा कॉलनी, जनाबाई नगर, व्यंकटेश नगर, अजिंठा नगर, गौतम नगर, मन्नाथ नगर, कृष्णा नगर, माणिक नगर, माऊली नगर, यज्ञभुमी यासह बालाघाटच्या डोंगर रांगेतील किमान ५० ते ६० गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रेल्वे फाटकाच्या खालील भागांमध्ये खासगी व शासकीय दवाखाने आहेत. अनेक वेळेला या फाटकामुळे रूग्णांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच गरोदर महिला व शालेय विद्यार्थ्यांचेही प्रचंड गैरसोय होत आहे. उड्डाणपूल नसल्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी होते. वाहानांच्या लांबच लांब रांगा लागतात. एवढेच नाही, तर दिवसातून ३५ ते ४० वेळा रेल्वे गेट बंद होते. त्यामुळे सर्व नागरिकांसह वाहनधारकांची मोठी अडचण होते. त्यामुळे उड्डाणपूल बांधणे शहर व तालुक्यातील जनतेच्या सुखकर दळणवळणासाठी तसेच वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. म्हणूनच सुखकर व आनंददायी प्रवास, शहराचे भविष्य आणि गतिमान दळणवळण यासाठी संबंधित उड्डानपूलाचे बांधकाम त्वरीत सुरू करावे, अशीही विनंती त्या लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरवासीय व तालुक्यातील जनता आणि वाहनधारकांच्या लोकभावनेचा आदर करून तहसील कार्यालय जवळच्या प्रस्तावित उड्डानपूलाचे बांधकाम त्वरीत सुरू करून सर्व नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. अन्यथा उड्डानपूल निर्माण संघर्ष समितीच्या वतीने भविष्यात तीव्र आंदोलन उभारले जाईल. गरज पडली तर, मुंबईच्या आझाद मैदानावर सुध्दा उपोषण करू. पण, उड्डानपूलाच्या बाबतीत कणभर सुध्दा मागे हटणार नाही, इशाही गंभीर इशारा त्या लेखी निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी उड्डाणपूल निर्माण संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी तसेच शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
10 दिवसांपासून मोर्चाची तयारी, सोशल मीडियावरून मार्गदर्शन
नियोजित मोर्चासाठी १० दिवसांपासून शहर व तालुका, सर्कलपासून ते गावपातळीपर्यंत पूर्वतयारीच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. तसेच वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक गावात रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात आली होती. परिणामी, सर्व स्तरातील नागरिक व वाहनधारक मोर्चात सहभागी झाले होते. शिवाय, मोर्चा किती वाजता निघेल. कोणत्या मार्गाने तहसील कार्यालयावर जाईल. शहरात पार्किंगची व्यवस्था कशी राहील. येथेपासून काटेकोरपणे नियोजन केले. तसेच सोशल मीडियावरून जनतेला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे हा विराट आणि भव्य मोर्चा अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडला. तसेच मोर्चादरम्यान, शहरात कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही. त्यामुळे प्रशासनाने उड्डाणपूल निर्माण संघर्ष समितीच्या शिस्तपूर्ण नियोजनाचे कौतुक केले.
इतर कुणाचाही नाद करा, पण गंगाखेडकरांचा नाद करू नका!
उड्डानपूल होणे ही शहरासह तालुक्याची मागणी आहे. यातून कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान होणार नाही. तरीही, तुम्ही काही व्यापारी व नागरिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उड्डानपूलाला विरोध करत आहात. कारण, तुम्ही विकास विरोधी माणसं आहात. तुम्हाला विकासाशी कधीच देणे-घेणे नाही. केवळ विरोध करणे, हे तुमचे आवडते काम आहे. पण, विकास करणे म्हणजे काळी-पिवळी चालविण्याएवढे सोपे नाही. त्यासाठी दानत आणि दुरदृष्टी असावी लागते. तीच दानत आणि दुरदृष्टी आमदार डॉ.गुट्टे यांच्याजवळ आहे. म्हणून त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून उड्डानपूल मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता ही एकट्या आमदार साहेबांची लढाई नसून, सर्वसामान्य जनतेची लढाई आहे. त्यामुळे जनाईनगरीची सुज्ञ आणि जाणकार जनता तुम्हाला चांगलेच ओळखून आहे. म्हणूनच, तुमचे विकास विरोधी मनसुबे आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही. असले अनेक हौशे, नवसे आणि गवसे आम्ही आजपर्यंत पळवून लावले आहेत. त्यामुळे तुम्ही इतर कुणाचाही नाद करा, पण गंगाखेडकरांचा नाद करू नका! असा शब्दात संदीप आळनुरे यांनी नाव न घेता विरोधकांचा कडक समाचार घेतला.



