Home चंद्रपूर ‘नरभक्षक’म्हणू नका, अतिउष्णतेने बिथरले वाघ?- पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)- रविकांत खोब्रागडे

‘नरभक्षक’म्हणू नका, अतिउष्णतेने बिथरले वाघ?- पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव)- रविकांत खोब्रागडे

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.25मे):-सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही येथे चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्य हादरले असताना, या घटनेकडे केवळ ‘नरभक्षक वाघ’ या नजरेतून पाहणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा वन्यजीव तज्ज्ञांनी दिला असून अतिउष्णतेमुळे वाघांचे वर्तन आक्रमक होत असल्याचे निरीक्षण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) तथा जलद बचावगट प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे यांनी नोंदवले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४५ ते ४७ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम फक्त मानवांवरच नव्हे तर वन्यजिवांवरही होत आहे. विशेषतः वाघांसारख्या मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये ‘थर्मल स्ट्रेस’ वाढल्यास त्यांच्या वर्तनात मोठे बदल होऊ शकतात. म्हणून वाघ अधिक चिडचिडा, अस्वस्थ व आक्रमक होतो. वाघ हे ‘होमियोथर्मिक’ म्हणजे शरीराचे तापमान स्थिर ठेवणारे प्राणी आहेत. मात्र, मानवांप्रमाणे त्यांच्या शरीरात घामाच्या ग्रंथी नसतात.

त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते प्रामुख्याने धापा टाकणे आणि पाण्यात बसणे अशा पद्धतींचा वापर करतात. उन्हाळ्यात तापमान अत्यंत वाढल्यास आणि पाण्याचे स्रोत कमी झाल्यास वाघांमध्ये ‘हायपरथर्मिया’ म्हणजेच उष्णतेमुळे शारीरिक व मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. या स्थितीत शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रिनालिनसारखे तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात. त्यामुळे वाघ अधिक चिडचिडा, अस्वस्थ आणि आक्रमक होऊ शकतो. अशा परिस्थितीत अगदी छोट्या हालचालींनाही तो धोका किंवा शिकार म्हणून पाहण्याची शक्यता असते, असे खोब्रागडे यांनी सांगितले.

…..अशावेळी हल्ल्याची भीती अधिक

तेंदूपत्ता गोळा करताना मजूर वाकून काम करतात. वाघाची दृष्टी मुख्यतः हालचाली आणि शरीराच्या आकृतीवर आधारित असते. त्यामुळे वाकलेली मानवी आकृती काहीवेळा नैसर्गिक भक्ष्यासारखी भासू शकते. आधीच उष्णतेमुळे तणावाखाली असलेल्या वाघामध्ये त्यामुळे अचानक हल्ल्याची प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते, असेही निरीक्षण डॉ. खोब्रागडे यांनी नोंदविले आहे.

*वाघ आणि मानव संपर्काने संघर्ष तीव्र*

जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वाघांचे वास्तव्य आणि हालचालींचे क्षेत्रही बदलत आहे. पाण्याच्या शोधात अनेक वाघ जंगलाच्या सीमेलगतच्या भागात आणि मानवी वस्त्यांच्या आसपास फिरताना दिसतात. विशेषतः अनुभव कमी असलेले तरुण किंवा आई पासून वेगळे झालेले वाघ मुख्य अधिवासाबाहेर फिरतात. त्यामुळे मानव आणि वाघ यांचा थेट संपर्क वाढून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वाढते.