Home महाराष्ट्र गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभावमुळे रुग्णांना करतात रेफर

गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभावमुळे रुग्णांना करतात रेफर

97

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.17मे):-येथील उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले असले,तरी प्रत्यक्षात रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे चित्र समोर येत आहे.कागदोपत्री गौरव आणि वास्तवातील अपुऱ्या सुविधा यामधील तफावत आता नागरिकांच्या तीव्र नाराजीचे कारण बनली आहे.

सामान्य व गंभीर रुग्णांना अंबाजोगाई,परभणी येथे रेफर करण्याच्या घटनांत वाढ,नागरिकांत तीव्र नाराजी अत्यावश्यक वैद्यकीय तपासण्यांसाठी लागणाऱ्या एमआरआय,सिटी स्कॅन,अत्याधुनिक रक्ततपासणी यांसारख्या सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने सामान्य तसेच गंभीर रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अनेक रुग्णांना पुढील तपासणी व उपचारांसाठी परभणी, अंबाजोगाई किंवा इतर शहरांतील मोठ्या रुग्णालयांकडे रेफर केले जात आहे.परिणामी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून,वेळेअभावी अनेक रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

अपघातग्रस्त,हृदयरोग,मेंदूविकार तसेच गंभीर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांना वेळेत निदान मिळत नसल्याने जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे नागरिक सांगत आहेत.दरम्यान,रुग्णालय प्रशासनाकडून दहा खाटांचे सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू होत असल्याचा गवगवा केला जात असला,तरी मूलभूत तपासणी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ कितपत मिळणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उपचाराआधी आवश्यक तपासणीच होऊ शकत नसेल,तर आयसीयू आणि अन्य सुविधा केवळ दिखावा ठरतात,अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.याशिवाय रुग्णालयात संबंधित तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याच्या तक्रारीदेखील वाढत आहेत.अनेक वेळा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासनतास थांबावे लागत असून आलेल्या रुग्णांना परिचारिका कढूनच प्रथमोपचार केल्या जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या आरोग्य व्यवस्थेकडून अपेक्षित सेवा मिळत नसल्याची खंत सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

गंगाखेड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री ना.मेघना बोर्डीकर यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.रुग्णालयात अत्याधुनिक तपासणी यंत्रणा, आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

आरोग्य ही जनतेची मूलभूत गरज आहे की केवळ जाहिरातीचा विषय?असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात असून,राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळालेल्या रुग्णालयातच जर मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील,तर हा किताब जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.प्रशासनाने याबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.