Home महाराष्ट्र एनटीए रद्द करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा- कॉ. योगेश फड यांचे केंद्रीय...

एनटीए रद्द करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा- कॉ. योगेश फड यांचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

45

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.18मे):-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) मार्फत घेतल्या जाणाऱ्या नीट,जी,यूजीसी-नेट यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये वारंवार होत असलेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप करत एनटीए एजन्सी तात्काळ रद्द करून पारदर्शक पर्यायी परीक्षा यंत्रणा निर्माण करण्याची मागणी कॉ.योगेश फड यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याकडे गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे.गेल्या काही वर्षांत नीट-यूजी,जी-मेन, आणि

यूजीसी-नेट परीक्षांमध्ये पेपरफुटी,तांत्रिक चुका,निकालातील घोळ तसेच गुणांमध्ये फेरफार यांसारखे गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.विशेषत २०२४ मधील नीट-युजी परीक्षेतील पेपरफुटी आणि ग्रेस मार्क्स वादामुळे एनटीएच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचेही फड यांनी आरोप केले आहे.

परीक्षा केंद्रांचे वाटप,उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल प्रक्रिया यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची टीकाही करण्यात आली आहे.घोटाळे उघडकीस येऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे निवेदनात म्हटले आहे.वारंवार परीक्षा रद्द होणे,न्यायालयीन प्रक्रिया आणि निकालातील गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढत असल्याची चिंता देखील व्यक्त करण्यात आली.या पार्श्वभूमीवर कॉ. योगेश फड यांनी एनटीए तात्काळ बरखास्त करणे,परीक्षा प्रक्रियेत डिजिटल सुरक्षा,थर्ड पार्टी ऑडिट आणि विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश करणे तसेच एनटीए कार्यकाळातील सर्व घोटाळ्यांची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य हे देशाचे भविष्य आहे.त्यामुळे अकार्यक्षम आणि अविश्वसनीय यंत्रणा कायम ठेवणे देशासाठी घातक ठरू शकते,असे मत कॉ.फड यांनी व्यक्त केले आहे निवेदनावर फड यांची स्वाक्षरी आहे.