

मारुती भुजंगराव चितमपल्ली हे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक, निसर्ग लेखक आणि “अरण्यऋषी” म्हणून ओळखले जाणारे,पाच लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून निसर्गाचा अभ्यास करणारे, तेरा भाषांचे जाणकार असलेले,वन्यजीव आणि निसर्गसंवर्धनाचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करणारे अरण्यऋषी दि.१८ जून २०२५ ला संध्याकाळी अनंतात विलिन झाले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शब्दांजलीचा ओनामा करतो .
मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म १९३२ सालातील नोव्हेंबरच्या पाच तारखेला सोलापूर येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण सोलापूरमधील टी. एम. पोरे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेज, सोलापूर येथे झाले. त्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण कोईमतूर,बंगळूरु,दिल्ली,कान्हा राष्ट्रीय उद्यान आणि डेहराडून येथील वन व वन्यजीव संस्थांमधून त्यांनी वन आणि वन्यजीव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात महत्त्वपूर्ण पदांवर ३६ वर्षे कार्यसेवा केली आणि १९९० मध्ये ते उपमुख्य वनसंरक्षक म्हणून सेवेतून जरी निवृत्त झाले तरी त्यांचा वन्यजीवांचा अभ्यास आणि निसर्गाभ्यास सुरूच होता. अरण्यऋषींनी फार मोठ्या प्रमाणात अभयारण्यांचा विकास केलेला आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्य,नवेगाव राष्ट्रीय उद्यान,नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे.त्यांनी नागझिरा आणि मेळघाट येथे विस्थापित वन्यजीवांसाठी अनाथालये उभारण्यास मदत केली. वन्यजीवांचा अभ्यास केला व संशोधन केले.वन्यजीव व्यवस्थापन,वने,वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी फार मोठ्या प्रमाणात संशोधन केले. त्यांच्या ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी ५ लाख किलोमीटरहून अधिक प्रवास करून निसर्गाचा अभ्यास केला हे विशेष. त्यांना तेरा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास करून ज्ञान प्राप्त केले होते, ज्यामुळे त्यांना विविध आदिवासी जमातींशी संवाद साधताना कोणतीही समस्या निर्माण झाली नाही आणि त्यामुळे पर्यावरणाशी संबंधित मौल्यवान व अनमोल मोती त्यांना वेचता आले.
मारुती चितमपल्ली हे एक व्यासंगी व वास्तववादी लेखक होते. त्यांनी आपल्या वनक्षेत्रातील अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनातून त्यांनी निसर्गाची,वन्यजीवांची आणि आदिवासी संस्कृतीची सखोल माहिती दिली आहे.त्यांना ‘अरण्यऋषी’ ही उपाधी त्यांच्या सर्जनशील आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे मिळालेली आहे. त्यांनी जे कोशवाङ्मय निर्माण केले त्यात पक्षीकोश, पाणीकोश आणि मत्स्यकोश आहेत यामध्ये त्यांनी पक्ष्यांची अठरा भाषांतील नावे दिली आहेत आणि अनेक मराठी नावे नवीन स्वतः तयार केली आहेत. त्यांनी चैत्रपालवी , जंगलाची दुनिया,रातवा, त्यांच्या रानवाटा ला १९९१-९२ चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार १९९१ चा भैरुरतन दमानी साहित्य पुरस्कार ,१९९१ चा मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेला आहे, निळावंती, त्यांच्या जंगलाचं देणं ला १९८९ चा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार व विदर्भ साहित्य संघ पुरस्कार प्राप्त, सुवर्ण गरुड, निसर्गवाचन, शब्दांचे धन, मृगपक्षीशास्त्र,केशराचा पाऊस, घरट्या पलिकडे,आनंददायी बगळे,पक्षी जाय दिगंतरा, चकवा चांदण : एक वनोपनिषद (आत्मचरित्र).
मारुती चित्तमपल्ली यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना अनेक संस्था आणि संघटनांकडून पुरस्कार मिळाले आहेत. ‘रातवा’ या त्यांच्या पुस्तकाला १९९३-९४ साली महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता,२००६ साली सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते,त्यांना २०२० मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार त्यांनी अलीकडेच, म्हणजेच २०२५ मध्ये स्वीकारला.रानवाटा या पुस्तकाची १९९३ साली आकाशवाणी पुणे केंद्रावर वाचण्यासाठी निवड झाली होती तसेच पाठ्यपुस्तकात देखील यातील अरणी ही कथा होती . पुणे येथील ॲड – व्हेंचर फाउंडेशन ही संस्था २००६ पासून निसर्ग संशोधनाचे काम करणाऱ्या व्यक्तीला मारुती चितमपल्ली यांच्या नावाचा निसर्ग मित्र पुरस्कार देत असते. महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाकडून दिलेला विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना २०१७ ला प्राप्त झालेला आहे . बाराव्या किर्लोस्कर चित्रपट महोत्सवाचा जीवन गौरव पुरस्कार आठ जानेवारी २०१८ ला प्राप्त झालेला आहे .मारुती चितमपल्ली यांच्याविषयी काही पुस्तकांचे संपादन सुद्धा झालेले आहे . त्यांच्या वरील ‘रानावनातला माणूस’ हे पुस्तक लेखक डॉ.सुहास पुजारी यांनी लिहिलेले असून पद्मगंधा प्रकाशनाने ते जानेवारी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे.’मारुती चित्तमपल्ली : व्यष्टी आणि सृष्टी’ या पुस्तकाचे संपादक डॉ.सुहास पुजारी असून साहित्य प्रसार केंद्र नागपूर यांनी हे पुस्तक डिसेंबर २०१२ ला प्रकाशित केले आहे.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्ग, वन्यजीव आणि साहित्याला समर्पित केले. त्यांचे कार्य निसर्गप्रेमींसाठी आजही प्रेरणादायी आहेअशा या आरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
अरण्यऋषीला । माझी शब्दांजली ।
माझी श्रद्धांजली । भावपूर्ण ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८९८७७४८६०९



