

मानवतावादी दृष्टिकोन जोपासणारे,अंधश्रद्धा व सामाजिक विषमता यावर पुरोगामी वैचारिक शस्त्राने वार करणारे समाजप्रबोधनकर्ते, संयमी व मितभाषी स्वभावाचे धनी असलेले, पथनाट्याचे प्रयोग व पथ कविसंमेलन चौकात चौकात घेऊन जनप्रबोधन करणारे, संकल्प बहुउद्देशीय संस्था अमरावतीचे माजी सचिव व आजीवन सदस्य असलेले, शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणारे,आदर्श अध्यापनातून व शैक्षणिक मार्गदर्शनातून हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे,प्रोफेसर डॉ.संजय खडसे सर यांना सेवानिवृत्तीनिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा ॥
प्रो.डॉ.संजय खडसे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व अधोरेखित करण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
प्रो.डॉ.संजय भीमराव खडसे यांचा जन्म मामाच्या गावी बोरगाव धर्माळे,ता.जि.अमरावती येथे १९६५ सालातील जूनच्या बारा तारखेला झाला.आई सौ.पार्वताबाई व वडील श्री भीमराव त्यांनी दिलेल्या सुसंस्कारातून संजय यांचे बालपण घडत गेले.
पार्वता मातोश्री । भीमराव पिता ।
सुसंस्कार दाता ।मातापिता ॥
वडील सहनिबंधक लेखा परिक्षण,सहकारी संस्था,मुंबई येथून सेवानिवृत्त झाले.सरांचे धाकटे बंधू श्री किशोर हे इंद्रायणी विशेष मुलांची शाळा,अकोला येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.थोरली बहीण सौ.आशा लक्ष्मणराव तायडे या उल्हास विद्यालय, उल्हासनगर, मुंबई येथून मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त झाल्या तर धाकटी बहीण सौ.संगीता श्रीकृष्ण वानखडे या आदर्श गृहिणी आहेत.सरांच्या धर्मपत्नी सौ.अनिता संजय खडसे यांनी वाहेदखान शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथून प्राध्यापिका या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे. प्रा.डाॅ.संजय खडसे यांना दोन सुपुत्र असून थोरला अनिरुद्धचे एमबीए इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट,लाट्रोब युनिव्हर्सिटी, मेलबर्न,ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण सुरू आहे.धाकटा सुपुत्र सिद्धांतचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय,अमरावती येथे बारावी विज्ञानच्या मार्च २०२५ च्या परीक्षेतील घवघवीत यशानंतर तो आता B.Sc . forensic चे शिक्षण घेत आहे. त्याला क्रिकेटमध्ये विशेष रुची आहे.१९ वर्षाखालील होणाऱ्या अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेकरिता त्याची २०२४ – २०२५ या वर्षाकरिता निवड झालेली आहे तसेच महाराष्ट्राच्या क्रिकेट संघातही त्याचा समावेश झालेला आहे.भविष्यात भारताच्या क्रिकेट संघात त्याचा समावेश होवो,ही सदिच्छा व्यक्त करतो.
सरांचे वडील आयु.भीमराव पांडुजी खडसे सुपर क्लास वन अधिकारी असतानाही तळागाळातील सर्व लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क होता. प्रामाणिक अधिकारी म्हणून अनेक ठिकाणी ते पुरस्कृत झाले होते.आदर्शवत अधिकारी म्हणून सहकारी लेखापरीक्षण विभागात महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.वडिलांचा हा वारसा जपण्याचा प्रो.डॉ. संजय खडसे सतत प्रयत्न करीत असतात.आई आयुष्यमती पार्वताबाई संस्कारक्षम गृहिणी आहेत.आई-वडिलांच्या सुसंस्कारामुळे आम्हा चारही भावंडांना नैतिक मूल्यांचे पाठ मिळाले ; म्हणूनच आम्ही घडू शकलो.असे ते म्हणतात.
सरांचे माध्यमिक शिक्षण प्रशांत विद्यालय ,रामनगर, अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय,अमरावती व पदव्युत्तर शिक्षण विदर्भ महाविद्यालय,अमरावती येथे झाले.व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर शिक्षण श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय,अमरावती येथे झाले.
वडील शासकीय उच्च पदावर असल्याने त्यांना विशेष अशी झळ पोचली नाही . महाविद्यालयीन जीवनात विविध क्षेत्रात कार्यरत असल्याने डॉ .संजय खडसे सतत व्यस्त असत. महाविद्यालयात असताना विद्यापीठ विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी नंतर विद्यापीठ कार्यकारिणीमध्ये विद्यार्थी सांस्कृतिक प्रतिनिधी, एनएसएस, एनसीसीमध्ये
सक्रीय सहभाग,विद्यार्थी दशेत असतानाच तत्कालीन अमरावती विद्यापीठात पदवीधर मतदारसंघातून सिनेट सदस्य. विशेष म्हणजे सर वयाने सर्वात लहान पण सर्वाधिक मताने विजयी झाले होते .विजयासाठी प्रथम क्रमांकाची १८०० मते हवी होती पण सरांना मिळाली प्रथम क्रमांकाची २१०० मताच्या वर मतं असे सरांचे आदर्श व्यक्तिमत्व.
साहित्यिक उद्धव ज.शेळके, कवी सुरेश भट, अभंगकार प्रा.मधुकर केचे, डॉ.भाऊ मांडवकर, डॉ.सिंधुताई मांडवकर त्यांच्याशी सरांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्यासोबत राहता
राहताच साहित्य लेखनाची आवड निर्माण झाली.बुद्ध -फुले – शाहू -आंबेडकरी आणि डॉ . पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची विचारधारा सरांच्या लेखनाची प्रेरणा होती.त्यातून सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून कथा,कविता,लेख व इतर साहित्याची निर्मिती झाली आणि जेव्हा साहित्य निर्मिती सुरू केली तेव्हा त्याचे सादरीकरण विविध साहित्य संमेलन,कवी संमेलन व साहित्य क्षेत्रात सहभाग घेऊन केले. अमरावतीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती येथे झालेल्या ६२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक प्रदर्शनीत सचिव म्हणून सरांचा सहभाग होता.
प्रा. बी.रंगराव यांच्या शंभुक पथनाट्यात रामाची भूमिका प्रा.डॉ.संजय खडसे सर करायचे तर शंभुकाची भूमिका दिवंगत विद्रोही कवी सतेश्वर मोरे करायचे.अमरावती शहरातील विविध महाविद्यालयात व विविध चौकांमध्ये पथनाट्याचे प्रयोग सरांनी करून अमरावतीकरांचे प्रबोधन केलेले आहे. चौका – चौकामध्ये पथनाट्याचे प्रयोग करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न असावा .त्यांच्यापूर्वी असे पथनाट्य प्रयोग अमरावतीमध्ये कोणी केले असेल याचे स्मरण होत नाही.
नाटकात एक । सहभागी पात्र ।
भूमिकेचे सत्र । दमदार ॥
व्यावसायिक नाटक – कैवारी मध्ये रामूची भूमिका सरांनी दमदारपणे केली. महाविद्यालयात ती पाहताच बाला आणि इतर विविध नाटकात सरांना विविध भूमिका साकारण्याच्या संधी प्राप्त झाल्या.सरांनी या सर्व भूमिकांचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले.
सादरीकरण । नाटकात केले ।
श्रोतेही रमले । बघताना॥
नावीन्यपूर्ण पथ कविसंमेलनाचे आयोजन सरांनी केले.अमरावती शहरात पथकवी (रस्त्यावरचे) संमेलन घेतले. शहरवासीयांसाठी नावीन्यपूर्ण कल्पना होती. वेगवेगळ्या महाविद्यालयातील कवी विद्यार्थी मित्रांना एकत्र करून शहरातील विविध महाविद्यालय व चौकात या विद्यार्थ्यांचे पथकविसंमेलन सरांनी घेऊन पथकवी संमेलनाचा एक नवीन प्रकार रसिकांना चौका चौकात बघायला मिळाला.रसिकांचा या पथकवी संमेलनाला उत्तम प्रतिसादही मिळाला होता.
प्रथितयश साहित्यिक – कथाकार – कांदबरीकार उद्धव ज. शेळके यांची प्रदीर्घ मुलाखत प्रा.डाॅ.संजय खडसे सरांनी घेतली होती. ही मुलाखत दैनिक नागपूर पत्रिकेच्या साहित्य मैफिल या साहित्यिक पुरवणीमध्ये चार भागात प्रकाशित झालेली होती .सरांचे विविध वर्तमानपत्रात शैक्षणिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत .भारतातील महापुरुषांवर प्रासंगिक लेखन विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत .
प्रा.डाॅ.संजय खडसे सरांनी लिहिलेलं विविध पुस्तकांचे समीक्षण तसेच सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक कार्यक्रमांचे विश्लेषणात्मक लेखन विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहे .
तसेच विविध वर्तमानपत्र व दिवाळी अंकात सरांच्या कथा,कविता,लेख प्रसिद्ध झालेली आहेत.विविध स्मरणिकांचे संपादनही सरांनी केलेले आहे.माजी कुलगुरू स्वर्गीय प्रा.डॉ.दिलीप मालखेडे सार्वजनिक वाचनालय, अमरावती येथे सचिव म्हणून डॉ .संजय खडसे सध्या कार्यरत आहेत.
प्रोफेसर डॉ.संजय खडसे यांच्या शैक्षणिक जीवनात प्रथम येण्याचा मान अनेक वेळा त्यांना प्राप्त झालेला आहे.अमरावती विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर अर्थात दि.१ मे १९८३ ला विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील मार्च १९८६ मधील *पहिले* पदवीधर प्रो.डाँ. संजय खडसे होते.अमरावती विद्यापीठ प्रथम सिनेट (अधिसभा) स्थापना झाली तेव्हा पहिले अधिसभा सिनेट सदस्य सर होते. विशेष म्हणजे वयाने सर्वात लहान आणि सिनेट निवडणुकीत सर्वाधिक मतांनी १९९० मध्ये विजयी झाले होते.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी आयोजित केलेली अमरावती विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विषयातील *पहिली* सेट परीक्षा जानेवारी १९९५ मध्ये सर उत्तीर्ण झाले होते.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयांपैकी ( संख्या ४५ महाविद्यालय) *सर्वात पहिला* प्रोफेसर ग्रेड प्राप्त करणारे प्राध्यापक ( मे २०२१) म्हणजे डॉ.संजय खडसे सर होते.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सर माजी सिनेट सदस्य होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे डॉ.खडसे सर सदस्य आहेत. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, जिल्हा नागपूर शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे सर सदस्य आहेत.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर विद्याशाखीय अभ्यास मंडळाचे सर सदस्य आहेत,असे प्रो.डॉ.संजय खडसे यांचे शैक्षणिक जीवनापासूनच बहुआयामी व्यक्तिमत्व घडत गेले.ते त्यांच्या खडतर बौद्धिक परिश्रमामुळे .
विविध संस्थेतर्फे प्रकाशित झालेल्या अनेक पुस्तकांचे सर संपादक आहेत. संपादक मंडळावर आजही सर कार्यरत आहेत.अमरावती विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. के. जी. देशमुख यांच्या षष्ट्यब्दिपूर्तीनिमित्त मार्च – १९९२ मध्ये प्रकाशित झालेल्या गौरव ग्रंथाच्या अर्थात अभिनंदन ग्रंथाच्या संपादक मंडळा मध्ये सर सदस्य होते.श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातर्फे शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त डिसेंबर १९९७ – ९८ मध्ये प्रकाशित झालेल्या वार्षिकांक ‘ज्ञानज्योती’ च्या संपादक मंडळामध्ये सर सदस्य होते. श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातर्फे डिसेंबर १९९८ – ९९, डिसेंबर १९९९-२०००,डिसेंबर २०००-२००१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ज्ञानज्योती’ वार्षिकांकच्या संपादक मंडळामध्ये सर सदस्य होते. डिसेंबर -२००२ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रथितयश कादंबरीकार उद्धव ज. शेळके स्मृती विशेषांक ‘उद्धव पर्व’ च्या संपादक मंडळामध्ये सर सदस्य होते. विदर्भ महाविद्यालय अमरावती चे प्रबंधक दिवंगत वासुदेव श्रावण मोटघरे स्मृती विशेषांक ‘स्मृती संकल्प’ हा प्रो.डॉ.संजय खडसे यांच्या संपादनाखाली सन – २००४ मध्ये प्रकाशित झाला होता .श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण शिक्षण परिषदेत नोव्हेंबर -२००४ मध्ये प्रकाशित झालेल्या पर्यावरण विशेषांकाचे सर संपादक होते.श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती तर्फे आयोजित माध्यमिक शिक्षक प्रशिक्षक परिषदेच्या २७ व्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनानिमित्त डिसेंबर – २००६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘शालेय नवप्रवाहः विचार मंथन’या विशेषांकाचे सर संपादक होते.मराठी मनाचं मराठी स्पंदन नोव्हेंबर – २०१२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मुक्तछंद’ वार्षिकांकाच्या संपादक मंडळाचे सर सदस्य होते .श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांनी राष्ट्रीय चर्चासत्रानिमित्त आयोजित केलेल्या जानेवारी – २००९ मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनपर पुस्तकाच्या संपादक मंडळाचे सर सदस्य होते. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचा वार्षिक अहवाल २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ या वर्षीच्या संपादकीय अहवाल समितीचे सर सदस्य होते.एकता रॅली अमरावती तर्फे आयोजित भारतरत्न – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक ‘भीम पर्व ‘ चे एप्रिल २०१४ पासून एप्रिल -२०२० पर्यंत सतत सात वर्ष डॉ .संजय खडसे संपादक होते.सुप्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार स्व. उद्धव ज. शेळके यांच्या रौप्य महोत्सवी स्मृतिदिनानिमित्त स्व. उद्धव ज. शेळके यांच्या साहित्यिक कार्यावरील ‘उद्धवधन’ या एप्रिल – २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या स्मृती विशेषांकाचे सर संपादक होते .
श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती यांनी प्रकाशित केलेले वार्षिकांक ज्ञानज्योतीच्या संपादक
मंडळाचे सर २०१९-२०२१, २०२०-२०२२ मध्ये समिती सदस्य होते .राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आयुष्यमान पी. बी. इंगळे यांच्या अमृतमहोत्सवा वर्षानिमित्त जुलै – २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘अमृत महोत्सव पी. बी. इंगळे’ या विशेष अंकाचे सर संपादक होते.
प्रो.डॉ.संजय भीमराव खडसे यांची अनेक शैक्षणिक पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यामधील ” महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळेतील शैक्षणिक योजनांचे अध्ययन ” हे आदिवासी आश्रम शाळेबाबतचे महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित झालेले आहे.या पुस्तकात त्यांनी सहा प्रकरणातून अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे.
” समकालीन भारतातील शिक्षण ”
“Contemporary Education in India” हे प्रो. डॉ . संजय भीमराव खडसे यांचे समकालीन भारतातील शिक्षणाबाबतचे हे पुस्तक अतिशय अनमोल आहे .या पुस्तकात त्यांनी भारतीय समाज, वैदिक काळातील शिक्षण, भारतातील सामाजिक विविधतेच्या कसोट्या, शिक्षणातील समता व समानता,
भारतीय संविधान व शिक्षण, जागतिकीकरण,मुदलियार आयोग,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – १९८६, सर्व शिक्षा अभियान,
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान,बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम ,राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० या विषयाबाबत अभ्यास पूर्ण आणि सविस्तर माहिती बारा प्रकरणातून दिलेली आहे.तसेच त्यांनी लिहिलेल्या ” भारतीय शैक्षणिक विचारवंत ” या पुस्तकामध्ये अनेक शैक्षणिक विचारवंतांची शैक्षणिक विचारधारा मांडण्याचा प्रयास अभ्यासपूर्ण आणि प्रासादिक भाषेत केलेला आहे.
प्रो.डॉ.संजय खडसे यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील कार्यामुळे त्यांचा सन्मानही झालेला आहे .राहुल व्यायाम प्रसारक मंडळ,अमरावती तर्फे सरांना दि.१४ एप्रिल २०१४ रोजी मानवता पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता . दि .१४ एप्रिल २०१६ रोजी एकता रॅली पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. दि . २१ मे २०१७ रोजी कै. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान गौरवपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले होते. रविवार दि . २९ सप्टेंबर २०१९ रोजी जागतिक पर्यटन मिनी मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर पुरस्कृत झाले होते.
अशा अनेक पुरस्कारांनी प्रा.डाॅ.संजय खडसे सरांना सन्मानित करण्यात आले आहे.
श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे सरांनी आपली २८ वर्षे कार्यसेवा दिली असून गुणवंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय पुसद जिल्हा यवतमाळ व शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून एकूण ३३ वर्ष त्यांनी शैक्षणिक सेवा केलेली आहे. सरांचे हजारो विद्यार्थी उच्च पदावर आज विराजमान झाले आहेत . त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांचे आजही त्यांना फार मोठ्या प्रमाणात आभाराचे फोन येतात. कारण
विद्या मंदिरात । शिक्षक हाडाचे ।
दातृत्व गुणांचे । विद्यादानी ॥
संजय गुरुजी । पूजक तत्वांचे ।
विद्यार्थी सत्वांचे । दीपस्तंभ ॥
असे विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ असलेले प्रा.डाॅ.संजय खडसे सर आज सेवानिवृत्त होत आहेत . त्यामुळे त्यांच्या सर्वच विद्यार्थ्यांचे चक्षू पाणावलेले आहेत कारण असे हाडाचे शिक्षक विद्यार्थ्यांना मिळणे आज दुर्लभ झालेले आहे .
संजय खडसे । आदर्श शिक्षक ।
तेजस्वी रक्षक । संस्कृतीचे ॥
संजय खडसे । प्रकाश विद्येचा ।
लय तिमिराचा । करितसे ॥
अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या जीवनातील तिमिराचे रूपांतर प्रकाशात करणारे प्रोफेसर डॉ .संजय भीमरावजी खडसे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा ॥
आणि सरांना पुढील सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,साहित्यिक कार्यासाठी उदंड आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९



