हिंदी भाषा सक्तीचे राजकारण

89

✒️डॉ. मनोहर नाईक(नागपूर)मो:-९४२३६१६८२०

मराठी भाषा महाराष्ट्राची अस्मिता आहे. महाराष्ट्राच्या मातीचे वैभव आहे. मराठी येथील लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषेच्या रसा-कसावर महाराष्ट्राचे सांस्कृतिक भरणपोषण झाले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्र अधिक उदात्त,उन्नत व प्रगत आहे.मराठी मातीत अनेक संत, पंथ,महंत व विचारवंत जन्मास आले आहेत.मराठी साहित्याने भारताच्या प्रबोधन चळवळीचे नेतृत्व केले आहे.मराठीने अनेक भाषा, विचार, कला,कलावंत आणि संस्कृतीला स्वतःत सामावून घेतले.त्यामुळेच मराठी भाषा अधिक समृद्ध,संपन्न व वैभवशाली झाली.मराठीचा गौरवशाली इतिहास लक्षात घेऊन केंद्र सरकारने अलीकडेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला.मराठी भाषेच्या सन्मानार्थ दिल्ली दरबारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले.

संमेलनात सत्ताधाऱ्यांनी मराठीचा गुणगौरव करणारी भाषणे दिली.मराठी भाषेला अभिजात भाषेच्या रत्नजडीत मुकुटाने अलंकृत करण्यात आले.तेव्हा सर्व मराठी जनांना अपार आनंद झाला.परंतु अल्पावधीतच हे पाताळयंत्री सत्ताधीश या सम्राज्ञीच्या हाती भिकेचा कटोरा देतील याची कुणालाही कल्पना नव्हती. महाराष्ट्र सरकारने शालेय स्तरावर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य केली आहे. त्यामुळे मराठी भाषा आपल्याच घरात परकी होणार आहे. हळूहळू ती दुर्लक्षीत व दुय्यम ठरणार आहे.मराठी भाषेसोबत सवतीमत्सर वाढणार आहे. आणि मराठी भाषेची अवस्था दिवसेंदिवस दीनवाणी होणार आहे.  

# कोणतीही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसते.तर, भाषा ही संस्कृती निर्माणाचे व उन्नयनाचे साधन असते.भाषा व्यक्तीला व्यक्तीशी जोडते. व्यक्तीला समूहाशी जोडते. समूहाला समूहाशी जोडते. भाषिक साम्यामुळे त्यांच्यात भावनिक,व्यावहारिक, वैचारिक व सांस्कृतिक नातं निर्माण करते.कोणतीही भाषा समाजाची फार मोठी शक्ती असते.ती समाजाला संघटित ठेवते.प्रतिभावंतांच्या व प्रज्ञावंतांच्या नवनिर्माणातून ती स्वतः अधिक उन्नत व प्रगत होत जाते.आणि समाजाला प्रगतीची नवी दिशा देते.महाराष्ट्रात संत नामदेव,ज्ञानेश्वर,तुकाराम, जनाबाई,मुक्ताबाई अशा अनेक संतकवी व कवयित्रींनी मराठी भाषेला, समाजाला आणि महाराष्ट्र संस्कृतीला समृद्ध,संपन्न तद्धतच प्रगल्भ केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मावळ्यांना एकत्र करुनच महाराष्ट्र धर्म जागविणारे रयतेचे राज्य स्थापन केले. पुढे अव्वल इंग्रजी राजवटीच्या नवयुगात सत्यशोधक दृष्टीने महात्मा जोतिराव फुलेंनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली.भारतात पहिली मुलींची मराठी शाळा सुरू केली. धर्माज्ञा झुगारून सावित्रीमाई फुलेंना आद्य शिक्षिका बनविले. महाराष्ट्रात परिवर्तनाच्या प्रयोगशाळेचा पाया घातला . गो.ग.आगरकर, लोकहितवादी, शिंदे, कर्वे इत्यादी सुधारकांनी परिवर्तनाला चालना दिली. महात्मा गांधींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र महाराष्ट्रच होते.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातच विषमतेविरुद्ध रणशिंग फुंकून संपूर्ण भारतात क्रांतिपर्व साकार केले.या सर्व घडामोडीत महाराष्ट्र अग्रेसर आहे.त्यामुळेच महाराष्ट्र आधुनिक भारताच्या जडणघडणीत मार्गदर्शक ठरला आहे.

# महाराष्ट्राची एकूणच संस्कृती सभ्यता,शालीनता व विवेकाच्या अधिष्ठानावर उभी आहे.मराठी भाषेने महाराष्ट्राच्या मातीत सहिष्णुता पेरली आहे.संत नामदेवांच्या नीतीने,तुकोबांच्या गाथेने,शिवरायांच्या शौर्याने, ज्योतीबांच्या सत्य शोधनाने, सावित्रीच्या शिक्षणज्योतीने आणि आंबेडकरांच्या क्रांतिकार्याने महाराष्ट्र जीवन तेजोमय झाले आहे. महाराष्ट्रातील संतांचे व विचारवंतांचे विचार-कार्य संपूर्ण भारतासाठी प्रेरक आणि उद्‌बोधक ठरले आहे. भारतातील इतर सर्व राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा इतिहास असा देदीप्यमान आहे.मराठीने महाराष्ट्राच्या समाजमनावर शौर्याचे व धैर्याचे संस्कार केले. तसेच सभ्यतेचे, शालीनतेचे, बुद्धिवादाचे व पुरोगामी जीवनदृष्टीचे संस्कार केले आहेत. हाच मराठी भाषेचा विचारवारसा शिक्षणाच्या माध्यमातून बालमनांवर बिंबविण्यात आला.२०१४ पर्यंतच्या महाराष्ट्र शासनाने मराठी मातीची स्वाभिमानी व पुरोगामी वृत्ती कसोशीने जपली. महाराष्ट्राचा व मराठीचा माथा उन्नत होईल अशी शैक्षणिक ध्येयधोरणे राबविली.त्यामुळे महाराष्ट्रात स्वतंत्र व प्रगत विचारांच्या पिढ्या निर्माण झाल्या.त्यातूनच येथे अनेक पुरोगामी चळवळी उदयास आल्या.आणि प्रतिगामी विचारसरणी पिछाडीवर गेली… 

# परंतु २०१४ पासून प्रतिगामी विचारसरणी सत्तास्थानी आली.आणि संपूर्ण भारतात राजकीय,सामाजिक,आर्थिक, धार्मिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड उलथापालथ सुरू झाली.लोकसत्ता दुबळी करून धर्मसत्ता प्रबळ करता यावी. हातात आलेली सत्ता कायम ताब्यात ठेवता यावी.आणि येणाऱ्या पिढ्यांना अधिक धर्मांध बनविता यावे.यासाठी संघ-भाजपा सरकारने शिक्षण क्षेत्राला प्रमुख लक्ष्य केले आहे. शिक्षणाच्या नावावर धार्मिक संस्कार करणे,विपर्यस्त इतिहास शिकविणे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे.शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून भारतीय समाज अधिक अंधश्रद्ध व धर्मांध बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करणे हा या योजनेचाच एक भाग आहे.

# भाषा ही केवळ भाषा नसते. ती संस्कृती असते.भाषेला लोकजीवनाचे भक्कम अधिष्ठान असते.भाषेतून वेदना,संवेदना, भावना,विचार,संस्कार व्यक्त होतात.भाषा मातीचे सत्व आणि मातेचे ममत्व घेऊन प्रकटते. भाषा संस्कृतीचे जतन आणि निर्वहन करते.भाषा लोकांच्या स्थानिक अस्मितांसह प्रादेशिक पृथगात्मता जपते.त्यामुळेच एका प्रदेशातील भाषा दुसऱ्या प्रदेशावर थोपवणे म्हणजे तेथील लोकसंस्कृतीवर,अस्मितेवर आणि प्रादेशिक पृथगात्मतेवर अतिक्रमण असते.भाषेचा एक स्वभाव असतो.भाषेतून वृत्ती, प्रवृत्ती व्यक्त होत असते. कारण भाषा ही लोकांच्या वृत्ती-प्रवृत्तीचीच उत्पत्ती असते. भाषेची एक ओळख असते. जसे- संस्कृत या भाषेत अनेक गुण असले तरी,संस्कृत भाषा लोकभाषा नाही.ही विशिष्ट लोकांची भाषा आहे.भेदभाव, विषमतेचे उगमस्थान अशी सुद्धा या भाषेची ओळख आहे. अध्यात्म हा या भाषेचा मूळ स्वभाव आहे. हिंदी ही उत्तर भारतातील बहुसंख्य लोकांची मुख्य भाषा आहे.संवाद व्यवहाराचे मुख्य माध्यम आहे. समान भाषेमुळे उत्तर भारतातील धार्मिक व सांस्कृतिक जीवन बहुअंशी मिळतेजुळते आहे.पंजाब, हरियाणा वगळता उत्तर भारतात धार्मिक साम्यता आहे. लोकजीवनामुळे हिंदी भाषेवर आणि हिंदी भाषेमुळे उत्तर भारतीय लोकजीवनावर हिंदुधर्माचा पगडा अधिक आहे. जातीय मानसिकता,टोकाची विषमता,सामाजिक भेदभाव, अन्याय,अत्याचार,शोषण, उत्पीडन,कर्मकांड,अंधश्रद्धा, स्त्रीदास्य, द्वेष,अरेरावी,मग्रुरी, गुन्हेगारी,आक्रमकता, हडपशाही,दडपशाही वृत्ती इत्यादी बाबी उत्तर भारतीय समाजजीवनाची स्वाभाविकता आहे.

हिंदुधर्माच्या बाहुल्यामुळे आणि प्राबल्यामुळे उत्तर भारताची गायपट्टा (cow belt) अशी सुद्धा ओळख आहे. उत्तर ध्रुवाकडून आलेल्या आर्यांच्या गो-पालक टोळ्या याच भागात स्थिरावल्या.इथूनच मालकी हक्क गाजवू लागल्या. जोर-जबरदस्तीने व आक्रमक वृत्तीने आपली रानटी संस्कृती रुजवू लागल्या.पुढे ही रानटी, आक्रमक व हिंसक प्रवृत्ती येथील संस्कृतीत मिसळली. अनेक धर्मग्रंथांमधून या शोषक, आक्रमक,हिंसक व विध्वंसक विकृतीचे उदात्तीकरण करण्यात आले.त्यामुळे या अपप्रवृत्तीला धार्मिक पवित्रता प्राप्त झाली. इतर सर्व बाबींपेक्षा धर्म हेच जीवनाचे सर्वस्व आहे.ही उत्तर भारतीय समाजमनाची मुख्य धारणा बनली.त्यामुळे उत्तर भारत तुलनेने अधिक धर्मश्रद्ध, धर्मपरायण व धर्माभिमानी झाला.

# उत्तर भारतीय समाजजीवनात धर्मभावना अधिक प्रबळ आहे.धर्म त्यांच्या निष्ठेचा व आस्थेचा भाग आहे. त्यामुळेच संघ-भाजपाने आपल्या धर्मांध राजकारणाची सुरुवात उत्तर भारताकडून केली.आणि संघ-भाजपाच्या धर्माधिष्ठित राजकारणा भोवती उत्तर भारत एकवटला. संघ-भाजपाच्या धर्मकेंद्री राजकारणाला खरे बळ उत्तर भारताने दिले.गाय गोबर पट्टयाने म्हणजेच हिंदी भाषिक पट्टयाने दिले.उत्तर भारतातील हिंदी भाषिक संस्कृती अधिक धर्मनिष्ठ आहे.त्यामुळे संघ-भाजपाला भारताची राजकीय सत्ता हस्तगत करणे शक्य झाले आहे. उत्तर भारत ते मध्य भारत (मध्यप्रदेश) हा टापू हिंदू धर्म आणि हिंदी भाषा या बळावर त्यांनी ताब्यात घेतला आहे. महाराष्ट्रात हिंदी विरोधी भूमिका घेवून मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेच्या सोबतीने भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव केला.शिवसेनेची मदत घेवून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.शिवसेनेची गरज संपताच मराठी माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला उद्ध्वस्त केले. हिंदीचा जप करणे सुरू केले. महाराष्ट्र राज्य हे उत्तर भारतातून दक्षिण भारतात शिरण्याचे प्रवेशद्वार आहे ! हिंदीच्या माध्यमातून कट्टर हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपाला मऱ्हाठी बाण्याच्या महाराष्ट्राने मध्येच रोखून धरले आहे. अजूनही दक्षिण भारतात भाजपाला घट्टपणे पाय रोवता आले नाही. दक्षिण भारताने आजही अपेक्षित प्रमाणात हिंदीला स्वीकारलेले नाही.हा केवळ प्रादेशिक मुद्दा नाही.येथे भाषिक भेदासह भाषाधिष्ठित सांस्कृतिक भेद सुद्धा महत्त्वाचा आहे, ही बाब येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

# संघ-भाजपा हे एकचालकानुवर्ती प्रवृत्तीचे पक्ष- संघटन आहे.या प्रवृत्तीला संपूर्ण भारतात एक धर्म,एक भाषा, एक संस्कृती,एकहाती सत्ता अशी व्यवस्था निर्माण करायची आहे.या देशातील ऐतिहासिक व गौरवशाली विविधता संपुष्टात आणायची आहे.अनिर्बंध शोषणसत्ता स्थापित करायची आहे.त्यांचे अनेक गुप्त मनसुबे आहेत.त्यासाठी ते वेगवेगळे हातखंडे वापरित आहेत.अनेक निर्णय थोपवित आहेत.पुढे रेटत आहेत.महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यामागे हाच उद्देश दडला आहे.महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वाला राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान भक्कम करायचे आहे.या हव्यासापोटी ते अनेक निर्णयात महाराष्ट्राचा बळी देण्यास तयार आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातच्या झोळीत टाकले आहेत.मुंबई ते अहमदाबाद मेट्रो ट्रेन महाराष्ट्राच्या पैशाने सुरू करून गुजरातला आंदण दिली आहे.पुढे हिंदी भाषेचे व हिंदी भाषिकांचे प्राबल्य वाढवून मुंबई गुजरातला जोडण्याचा गुप्त करार झाला असण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राच्या मराठी मुलखावर तशीही हिंदी भाषिकांची पकड मजबूत होवू लागली आहे.उद्योग,व्यवसाय व रोजगाराचे क्षेत्र हिंदी भाषिकांनी बऱ्यापैकी काबीज केले आहे. २०१४ नंतरचे महाराष्ट्राचे राजकारण हिंदी भाषिकांनी बऱ्यापैकी व्यापले आहे. 

# कोणत्याही भाषेचा अथवा भाषिकांचा विरोध करणे अपराध आहे.तसेच कोणत्याही राज्याच्या स्वतंत्र अस्मितेवर, त्याच्या पृथगात्म अस्तित्वावर व संस्कृतीवर अतिक्रमण करणे आणि त्या प्रदेशाचा सांस्कृतिक इतिहास पुसण्याचा प्रयत्न करणे हे देखील अनुचित आहे.सर्व भारतीयांना भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जाण्याचा,उद्योग,व्यवसाय करण्याचा सांविधानिक अधिकार आहे.परंतु तेथील भाषा,संस्कृती व जीवनशैली स्वीकारून त्या प्रदेशाशी एकरूप होणे हे परप्रांतीयांचे कर्तव्य आहे.अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदी लॉबी वरचढ होऊ लागली आहे. हिंदी भाषिकांच्या बाहुल्याने महाराष्ट्र संस्कृती झपाट्याने बदलू लागली आहे.दबंगशाही वाढू लागली आहे.वाढदिवसाला तलवारीने केक कापणे. लग्नाच्या मिरवणुकीत बंदुकीचा बार उडवणे.कमरेला पिस्तुल लटकवून फिरणे.या अशा घटना महाराष्ट्रात सर्रास घडू लागल्या आहेत.अशा विकृतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर कलम बांधले जावू लागले आहे.शिव- फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी होवू लागला आहे.

# संघ-भाजपाला दक्षिण भारताच्या राजकारणात हिंदीच्या माध्यमातून मुसंडी मारायची आहे.त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या दारावर धडका देणे सुरू केले आहे.सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्राला वेठीस धरल्या जात आहे.संघ-भाजपा आपल्या हिणकस राजकारणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा वापर करू लागला आहे.त्यांच्यावर नवे शैक्षणिक धोरण,नवनवे निती नियम थोपवून आपला राजकीय मार्ग प्रशस्त करू लागला आहे. विद्यमान सरकारला महाराष्ट्र संस्कृतीशी,विद्यार्थ्यांच्या मानसिकतेशी,त्यांच्या हिताशी व शैक्षणिक विकासाशी काही देणे घेणे नाही.हीच बाब या हिंदी भाषा सक्ती धोरणावरून अधिक स्पष्ट झाली आहे…!

—————————————