

▪️जिल्हा जलसंधारण विभागाचे नगराध्यक्षांना पत्र ; लोकसहभागातून तलाव व नाल्यांची गाळ उपसा मंजुरी प्राप्त
✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)
साकोली(दि.11जून):-साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील तिन्ही जागी तलाव व बोळी खोलीकरणास नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी मिळाली. सदर काम प्रगतीपथावर असून जिल्ह्यात कुठेही तालुक्यात ही मंजुरी मिळाली नसून जिल्ह्यात पहिलीच मंजुरी ही साकोलीला प्राप्त झाली आहे हे विशेष.
लोकसहभागातून साकोली सेंदूरवाफा या दोन्ही शहरातील साकोली तलाव गट क्र. २३८ व सेंदूरवाफा गट क्र. ४४२ व २३०/१ तलाव मधून गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्याचे कार्य साकोलीत सुरू आहे. यासाठी नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांनी सतत पाठपुरावा करून नाम फाऊंडेशनशी संपर्क साधला व पत्रव्यवहार केला. लोकसहभागातून म्हणजे शुन्य अनुदानातून आज जवळपास तिन्ही बोळींवर ५० ते ६० ट्रॅक्टर लाऊन हे गाळ उपसण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे ६० युवकांना रोजगार सुद्धा प्राप्त झाला. या कार्याने साकोली सेंदूरवाफा परीसरातील तलाव व बोळींचे जलस्रोत वाढविण्यासाठी चांगली मदत होणार आहे. यात पंचशील वार्ड क्र. ५ एक बोळी, प्रगती कॉलनी १ बोळी व सेंदूरवाफा येथील मुख्य गावतलावात हे प्रगतीपथावर सुरू आहे.
विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात कुठेही बोळी कामांना मंजुरी मिळाली नाही. परंतु नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांनी सतत पाठपुरावा केला. आणि १९/०५/२०२६ ला जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि. प. लघु पाटबंधारे विभागाने साकोली सेंदूरवाफा येथील तिन्ही तलाव बोळी खोलीकरणास नाम फाऊंडेशनला मंजुरी देण्याबाबत उपविभागीय जलसंधारण अधिकारी साकोली यांना पत्र देत यांची प्रतिलिपीत नगराध्यक्ष देवश्री कापगते यांना सादर केले. याबाबत साकोली सेंदूरवाफा शहरातील समस्त युवा बेरोजगारांनी व शेतकऱ्यांनी या मंजुरीसाठी यशाबद्दल नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते यांचे आभार मानले आहे.







