संसद लोकशाहीची हवेली की हिझड्यांचा दरबार?-शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे.

227

 

 

 

प्रखर लेखनीतून वास्तवाचे विस्तव करून सत्याच्या निखाऱ्यातून सत्याचा शोध घेऊन मानवी उत्क्रांतीचा विचार पेरणारा शिवशाहीर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या अनुषंगाने आजच्या युगातील काही प्रसंगिक वेदना मांडण्याचा छोटासा प्रयत्न
भारताचे मॅगझीन गोर्की साहित्य सम्राट शिवशाहीर अण्णाभाऊ साठे
असे म्हणतात कीं,”ये आझादी झुठी है देश कीं जनता भूखी है? “जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव” इथली न्याय व्यवस्था कैकाची रखेल झाली इथली संसद देखील हिझड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली.
“ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है…” अण्णाभाऊ साठेंनी गोंगाटात फेकलेली ही टोकदार घोषणा आजही अंगावर काटा आणते. स्वातंत्र्याच्या नावाखाली नुसते फटाके उडवून घेणाऱ्या व्यवस्थेला एका झटक्यात उघडे पाडणारे हे वाक्य, आज इतक्या वर्षांनंतरही, कालबाह्य ठरत नाही. कारण सत्य आजही उपाशी आहे, आणि खोटं गुटगुटीत मेजावर बसलं आहे.
साठेंचा “जग बदल घालूनी घाव” हा नारा आज वाऱ्यावर उडवून लावला जातोय. परिवर्तनाच्या आशेने पेटलेल्या शब्दांना, आज मूकपणे गिळावं लागणारं विष बनवलं गेलंय. शोषण, अन्याय, भ्रष्टाचार, आणि खोटारडेपणाच्या या चौकटीत आपण सगळे कैद झालो आहोत.
न्याय…पण कोणासाठी?
इथली न्यायव्यवस्था आज पिळवटलेल्या जनतेच्या वेदनांवर फुंकर घालण्याऐवजी राजकीय आकस आणि धनशक्तीच्या छायेत नाचतेय.
गोरगरिबांसाठी कोर्ट म्हणजे फक्त एक जिथं तारखा मिळतात, निर्णय नाही.
पांढरपेशा गुन्हेगारांसाठी मात्र न्याय म्हणजे दिलासादायक सवलत!
हा खेळ न्यायाचा आहे की सौद्याचा?
संसद लोकशाहीची हवेली की हिझड्यांचा दरबार?
संसदेच्या भिंतींवर आवाज घुमतो, पण तो जनतेसाठी नाही, तर पक्षांतील मांडवलीसाठी असतो.
विचारांच्या लढाईऐवजी, खुर्च्यांच्या संख्येवर युद्ध ठरतं.इथं पाण्याच्या टंचाईवर चर्चा होत नाही, पण निवडणूक फंडाच्या वाटपावर आरडाओरडा होतो.ही संसदेची अवस्था हिझड्यांच्या हवेलीप्रमाणे झालीय.ना लाज उरली, ना धडपड.
मी माझ्या व्यथा कुणाकडे मांडू?
जेव्हा एक सामान्य माणूस उपाशी झोपतो, आणि त्याच रात्री संसदेत एक गाजरपुडीवर कोट्यवधींचा निधी पास होतो तेव्हा त्या उपाशीपणाची तक्रार कुणा समोर मांडायची? कोण ऐकेल शेतकऱ्याच्या कुडकुडणाऱ्या मुलीचा रडका आवाज? कोण धावेल दलितावर झालेल्या अन्यायासाठी? कोण उभं राहील असंघटित कामगारांच्या हातातल्या फुटलेल्या घामाच्या फोडांसाठी? कोणी नाही. कारण सगळ्यांच्या डोळ्यांवर झाकणं आहे मीडिया विकली गेली,नेते गप्प झाले, आणि सामान्य माणूस थकून गेला.
शब्दच शस्त्र होतील का पुन्हा?
अण्णाभाऊंची लेखणी झुरपांच्या जमिनीवर जन्म घेते आणि महालांची भिंती हादरवते.आज त्या लेखणीची गरज आहे जी फक्त भाषणं करत नाही, तर समाजाला हलवते.जेव्हा कवी विद्रोह लिहतो, तेव्हा क्रांती उभी राहते.
जेव्हा साहित्यकार वास्तव सांगतो, तेव्हा व्यवस्थेची झोप उडते. आजच्या काळात पुन्हा तशाच प्रखर, बेधडक आणि न घाबरणाऱ्या लेखणीची आवश्यकता आहे. या देशात स्वातंत्र्य मिळालं पण सर्वांसाठी नाही.लोकशाही आहे पण लोकांना दूर ठेवून.न्याय आहे पण गरिबांना त्याचं तोंडही दिसत नाही.
म्हणूनच, अण्णाभाऊंचे शब्द आजही तितकेच सत्त्वशील आहेत:
“जग बदल घालुनी घाव.”
पण हे घाव आता फक्त तलवारीने नव्हे, तर शब्दांच्या धारदार लेखणीने घालाव लागतील.कारण खरी क्रांती मनं हलवते आणि मनं हलवण्यासाठी अजूनही साहित्यच सर्वांत प्रभावी अस्त्र आहे.
अण्णा तुम्ही इथल्या वर्णवादी आणि वर्गवाद्याची चामडी सोलून आपली डफ मडवली आन शाळेची पायरीही न चढता
तुम्ही अनेक विद्यापीठे घडवलीत तुम्ही गात होतात लिहीत होतात माणसांचे दुःख आणि आसवांच्या कथा महालाच्या मुकाबल्यात त्या झोपड्यांची व्यथा,तुमचं गाणं साऱ्या जगाने ऐकले पण कुणीही तुम्हाला पोटाशी नाही धरलं
बरं केलंत आण्णा शेवटी तुम्ही आपली नाळ निळाईशी जोडलात आणि म्हणालात
*जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव*

प्रा. एम. एम. सुरनर, गंगाखेड
9822074491