

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.15जुलै):-केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान 2025-26 अंतर्गत तेल काढणी युनिट (10 टन क्षमता) तसेच तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व उपकरणे, प्रमुख आणि दुय्यम तेलबिया प्रक्रिया युनिट स्थापनेसाठी जिल्ह्यास 1 लक्षांक प्राप्त झाला आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर तेल प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देणे, उत्पादन मूल्यवर्धन करणे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा आहे.
सदर योजनेत प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लक्ष 90 हजार (जे कमी असेल त्यानुसार) अनुदान अनुज्ञेय आहे. ज्या भागांमध्ये गळीतधान्य (तेलबिया) पिकांचे उत्पादन होत असले तरी प्रक्रिया युनिट उपलब्ध नाही, अशा ठिकाणी प्राधान्याने तेल काढणी युनिट स्थापन करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सीपेट, लुधियाना किंवा तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मील / ऑईल एक्सपेल्लर उत्पादकनिहाय मॉडेलला सदर अनुदान मिळू शकते. शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी व इच्छुक संस्था अर्ज करू शकतो.
सदर घटक बँक कर्जाशी निगडीत असून अर्जदार संस्थांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपला प्रकल्प प्रस्ताव बँकेकडे सादर करावा. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच अर्जदार संस्थेला योजनेचा लाभ मिळण्यास पात्रता प्राप्त होईल. तालुका कृषी अधिकारी यांनी अशा पात्र अर्जदारांचे अर्ज पूर्वसंमतीसाठी 30 जुले 2025 पर्यंत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.
तेलबिया उत्पादन करणाऱ्या भागांतील शेतकरी उत्पादक संस्थांनी किंवा इतर पात्र संस्थांनी आपला प्रकल्प प्रस्ताव बँकेकडे सादर करून, आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यांनी केले आहे.



