किटकजन्य आजाराबाबत दक्षता घेण्याचे आवाहन

67

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9423608179

चंद्रपूर(दि.2जुलै):- पावसाळ्याला सुरवात झाली असून या दिवसांमध्ये अनेक प्रकारच्या किटकांची उत्पत्ती होत असते. तसेच दुषित पाणी पुरवठ्यामुळेसुध्दा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या रोगांपासून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांर्तगत डेंग्यू, हिवताप, जापणीस मेंदुज्वर, स्क्रब टायपस अशा विविध आजाराचा समावेश होतो. संक्रमित मादी डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या या आजाराबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी.

*हिवताप :* हिवतापाचा प्रसार अॅनाफिलीस डासाच्या मादीद्वारे होतो. डासाची मादी चावल्यास संक्रमित व्यक्तीच्या रक्तातील हिवतापाचे जंतु डासाच्या शरीरात प्रवेश करतात. डासाच्या शरीरात ह्या जंतुची वाढ झाल्यानंतर डासाची मादी निरोगी व्यक्तीला चावल्यास तिच्या शरीरातील हिवतापाचे जंतु इतर व्यक्तीच्या रक्तात प्रवेश करतात व हिवतापाची लागण होते.

*हिवतापाची लक्षणे :* एक दिवसाआड थंडी वाजून ताप येणे, डोके दुखी, अंग दुखी, मळमळ इत्यादी. यावर वेळेत उपचार न केल्यास तीव्र रक्ताक्षय, कावीळ, मुत्रपिंड निकामी होणे व मेंदुचा हिवताप होऊन रुग्णांचा मृत्यु संभवतो.

*निदान :* हिवतापाचे निश्चित निदान करण्याकरिता रुग्णांच्या रक्ताचा एक थेंब काच पट्टीवर घेण्यात येतो. त्यावर रंग प्रक्रिया करून सुक्ष्मदर्शक यंत्राखाली निरिक्षण केल्यास हिवतापाचे निश्चित निदान करता येते. रॅपिड डॉयग्नोस्टीक किटद्वारे गावपातळीवर आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांद्वारे सुध्दा हिवतापाचे प्राथमिक निदान केले जाते.

*उपचार :* जंतुच्या प्रकारानुसार (पी.व्ही / पी.एफ. नुसार) संपुर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. अर्धवट उपचार घेणे घातक ठरू शकते. हिवताप दुषित रुग्णांकरीता मोफत समुळ उपचाराची सोय सर्व शासकिय रुग्णालयात उपलब्ध आहे.

*डेंग्यूताप :* डेंग्यू तापाचा प्रादूर्भाव शहरी भागापूरता मर्यादित होता, मात्र अलिकडचे काळात ग्रामीण भागामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणावर प्रादूर्भाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाणी साठविण्याच्या प्रवृत्तीत झालेली वाढ आणि डासोत्पत्ती रोखण्यातील निष्काळजीपणा ही डेंग्यूताप उद्रेकाची प्रमुख कारणे आहेत. डेंग्यूतापाचे उद्रेक पारेपण काळापूर्वी तसेच पारेपण काळातही होतात. डेंग्यूतापाचा प्रसार एडिस एजिप्टाय प्रकारच्या डासांच्या मादीमार्फत होतो. डेग्यू आजाराचे मुख्यत्वे दोन प्रकार आहे. साधारण डेंग्यू ताप, रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप.

*डेंग्युचा प्रसार :* एडिस एजिप्टाय डासाची मादी चावल्यास तिच्या शरीरात डेंग्यूतापाचे विषाणू प्रवेश करतात. साधारणपणे 10 दिवसांत डासांच्या शरीरात डेंग्यू विषाणूंची पूर्ण वाढ झाल्यावर हा दूषित डास कोणत्याही निरोगी व्यक्तीला चावल्यास त्या व्यक्तीस डेंग्यूताप होऊ शकतो.

*साधारण डेंग्यूतापाची लक्षणे :* तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्थायू दूखी व सांधेदूखी, उलट्या होणे. डोळयांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे, डेंग्यूतापाची लागण ही साथ स्वरुपाची असून त्यातील रुग्णांची संख्या मोठी असते.

*रक्तस्त्राव युक्त डेंग्युतापाची लक्षणे :* साधारण डेग्यूतापाची सर्व लक्षणे या प्रकारात दिसतात. त्वचेखाली रक्तस्त्राव होणे. नाकातून रक्तस्राव होणे, रक्ताची उल्टी होणे, रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, काही रुग्णांमध्ये या दरम्यान रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो. रुग्ण बेशुध्द होऊ शकतो, गंभीर बेशुध्द अवस्थेला डेंग्यू शॉक सिंड्रोंम असे म्हणतात. यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते. रक्तस्त्रावासह डेंग्यूताप (डेंग्यू हेमोरेजिक फिवर) व डेंग्यू शॉक सिंड्रोमच्या रुग्णांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणे आवश्यक आहे.

*निदान :* डेंग्यु तापाचे निश्चित निदान करण्याकरिता शासकिय महाविद्यालयातील सुक्ष्मजिवशास्त्र विभागात निदान निश्चितीची व्यवस्था करण्यात आली आहे.

*उपचार :* डेंग्यूतापावर निश्चित असे उपचार नाहीत. वेदनाशामक औषधे व विश्रांती घेणे आवश्यक असते. या रुग्णांना अॅस्पीरिन, ब्रुफेन इत्यादी सारखी औषधे देऊ नये. डेंग्यूतापाच्या रुग्णांना वयोमानानुसार तसेच लक्षणांनुसार उपचार करण्यात येतो.