नागभीड तालुक्यात जिल्हाधिका-यांची विविध प्रकल्पांना भेट

94

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 चंद्रपूर(दि.6जुलै):-क्षेत्रीय भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी नागभीड तालुक्यातील विविध प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना सुचनाही केल्या. यावेळी ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, बालविकास प्रकल्प़ अधिकारी शिला गेडाम, मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी विनोद मडावी, डॉ. आखाडे आदी उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिका-यांनी तळोधी येथील अंगणवाडी, कचरा विलगीकरण केंद्र, पळसगाव खुर्द येथील तलाठी कार्यालय बांधकाम, चिंधीचक येथील मुलींची शासकीय आश्रमशाळा (निवासी), नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी बांधकामास भेट, मानव विकास अंतर्गत प्राप्त निधीतून गांडुळ खत प्रकल्प, नवखळा पाणी पुरवठा योजना सोलर प्रकल्प आदी प्रकल्पांना भेट दिली. 

तळोधी येथील अंगणवाडीला भेट दिल्यावर जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वेळेवर लसीकरण पूर्ण करावे तसेच आहाराचा दर्जा व परिमाण राखावे. दोन अंगणवाडी एकत्र भरत असल्यामुळे एक अंगणवाडी त्वरीत नवीन इमारतीत स्थलांतरित करा. येथील घनकचरा व्यस्थापन प्रकल्प़ लवकरात लवकर कार्यान्वीत करावा. या प्रकल्पाबाबत त्यांनी महिलांशी संवाद साधला. पळसगाव येथील तलाठी कार्यालय बांधकाम वेळेत व दर्जेदार स्वरुपात करावे व बांधकामास तारेचे कुंपन करून घ्यावे. 

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी चिंधीचक येथील मुलींच्या शासकीय आश्रमशाळा नविन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. सदर बांधकाम जवळपास पूर्णत्वास असून ते त्वरीत हस्तांतरीत करून घ्यावे. यावेळी त्यांनी शाळेतील मुलांशी वर्गात संवाद साधून शिक्षणाचा दर्जा तपासला. तसेच भोजनाचा दर्जा उत्तम ठेवण्याच्या सुचना दिल्या. नवेगाव पांडव येथील स्मार्ट पीएचसी मध्ये पाण्याची गळती होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

नविन बांधकामामुळे खोल्यांची अंतर्गत उंची कमी होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. नागभीड नवखळा पाणी पुरवठा सोलर प्रकल्पाला जिल्हाधिका-यांनी भेट देऊन पाहणी केली. सदर प्रकल्प लवकर सुरळीत संचलित होईल, याबाबत सर्व यंत्रणानी समन्वय साधावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 या भेटीदरम्यान सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी,पोलीस पाटील आदी उपस्थित होते.