

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.9जुलै):- राज्यातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन घेऊन इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा ठरावी, तसेच राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा सन 2025-26 आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेतून अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, त्यांच्या यशस्वी प्रयोगांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व स्वीकार होण्यास मदत होईल. त्यामुळे शेती उत्पादन वाढीस चालना मिळेल.
पीक स्पर्धेतील समाविष्ट पिके: खरीप हंगाम: भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग,सुर्यफूल रब्बी हंगाम: ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस आहेत. त्या करीता अर्ज करण्याची अंतिम तारीख खरीप हंगाम मूग व उडीद पीक करीता 31 जुलै 2025 तर इतर पीक 31 ऑगस्ट 2025 आहे. रब्बी हंगाम: सर्व पिकांसाठी अंतीम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे.
पारितोषिक तालुका पातळीवर प्रथम 5 हजार, द्वितीय 3 हजार, व तृतीय 2 हजार असून जिल्हा पातळीवर प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार, व तृतीय 5 हजार पारितोषिक आहे व राज्य पातळीवर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार, व तृतीय 30 हजार पारितोषिक पारितोषिक वितरीत करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून स्पर्धेसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शक तत्त्वे पाहून आपले अर्ज सादर करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.



