हुमणी अळी नियंत्रणासाठी उपाययोजना

96

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11जुलै):-बहुभक्षीय हुमणी अळीच्या (Holotrichia serrata) प्रभावी व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. हुमणी अळी ही जमिनीमध्ये राहून विविध खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या मुळांवर उपजीविका करणारी कीड असून, वेळेवर उपाय न केल्यास मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते.

होलोट्रीचिया प्रजातीच्या या अळीमुळे विशेषतः कापूस, सोयाबीन, तूर, मका, भात, गहू, ऊस, मिरची, वांगी, सुर्यफूल व अन्य पिकांमध्ये नुकसान होताना आढळते.

पावसाळ्यात कीड नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढील उपाय सुचवले आहेत :

*शेतीतील निरीक्षण आणि प्रकाश सापळ्यांचा वापर*

पावसानंतर सायंकाळी शेतातील बाभूळ, कडुलिंब व बोर झाडांखाली प्रकाश सापळे लावावेत. एका मादी भुंग्याचा नाश झाल्यास पुढील ४० ते ५० अळ्यांचा नाश होतो.

*फवारणीची शिफारस*

ज्या भागात सतत हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो, तिथे संबंधित झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. प्रत्येक झाडावर २० किंवा त्यापेक्षा अधिक भुंगे आढळल्यास नियंत्रणासाठी मोहीम हाती घ्यावी.

*प्रादुर्भावाचे निदान कसे करावे?*

शेतात एकरी २० ठिकाणी (१ फूट x १ फूट x ६ इंच खोलीचे) मातीचे नमुने घेऊन अळ्यांचा शोध घ्यावा. झाडांची पाने पिवळी पडून सुकल्यास आणि झाड कोलमडले असल्यास, ती झाडे उपटून मुळे कुरतडलेली आहेत का ते पाहावे.

*जैविक नियंत्रण उपाय*

तुरळक प्रादुर्भाव आढळल्यास मेटॅरायझियम ही जैविक मित्र बुरशी ४ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवावी किंवा १ किलो मेटॅरायझियम १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टरमध्ये वापरावे.

रासायनिक उपाय योजना — गंभीर प्रादुर्भावासाठी*

जर प्रादुर्भाव लक्षणीय प्रमाणात असेल, तर खालीलपैकी एक रासायनिक उपाय करावा : फिप्रोनील ४०% + इमिडॅक्लोप्रिड ४०% (दानेदार) – ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाजवळ ओतावे. कार्बोफ्यूरॉन ३% दानेदार – ३३.३० किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम ०.४% + बायर्फेनथ्रिन ०.८% – १२ किलो प्रति हेक्टर, थायोमेथोक्झाम ०.९% + फिप्रोनिल २% – १२ ते १५ किलो प्रति हेक्टर

वरील सर्व रसायने पिकाच्या खोडांजवळ जमिनीत मिसळावीत आणि वापराच्या वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. तसेच मजुरांना योग्य सुरक्षा साधने पुरवावीत.

शेतकऱ्यांनी वेळेवर उपाययोजना केल्यास हुमणी अळीच्या नियंत्रणात यश मिळू शकते, असे आवाहन अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.