

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.19जुलै):-जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करीअर सेंटर आणि विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 143 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
भद्रावती येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान होते. प्रमुख अतिथी म्हणून न.प. मुख्याधिकारी विशाखा शेळखी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरीश पद्यावार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शक गिरीश पद्मावार यांनी रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेऊन अनुभव संपादन करावा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान यांनी उमेदवारांनी स्वावलंबी होताना कोणतेही काम न्यूनगंड न बाळगता स्वीकारावे, असा सल्ला दिला. प्रास्ताविकात सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता हे चार महत्वाचे स्तंभ असल्याचे नमूद करून उमेदवारांनी विभागाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या रोजगार मेळाव्यात ओमेंट वेस्ट प्रा. लि., विदर्भ क्लिक वन सोल्यूशन, डिस्कॉन प्रा. लि. नागपूर, संसूर सृष्टी इंडिया प्रा. लि., वैभव इंटरप्रायझेस, उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक आदी नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सदर मेळाव्यात 407 उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यापैकी 143 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.



