पालकांनी आपल्या मुलांबद्दल जागरूक राहणे ही काळाची गरज – अशोक भैया

72

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26जुलै):– “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी आपल्या मुलांबाबत अधिक सजग राहणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट मत नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय अशोक भैय्या साहेब यांनी व्यक्त केले. ते नेवजाबाई हितकारिणी माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरी येथे दिनांक २५ जुलै २०२५ रोजी आयोजित पालक-शिक्षक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक भैय्या हे स्वतः होते. प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक मा. के. एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक एन. डब्ल्यू. नाकाडे सर आणि पर्यवेक्षक प्रा. पी. आर. जिभकाटे सर मंचावर उपस्थित होते. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य ठरले.

कार्यक्रमाची सुरुवात पालक-शिक्षक समितीच्या नव्या कार्यकारिणीच्या निवडीने झाली:

अध्यक्ष मुख्याध्यापक के. एम. नाईक सर

उपाध्यक्ष विजयजी बनपुरकर (माजी नगरसेवक)

महिला प्रतिनिधी रजनीगंधा मेंढे

सचिव कलकोटवार 

सहसचिव निशिकांत बोरकर यांची निवड करण्यात आली. बारापात्रे यांनी मागील वर्षाच्या पालकसभेचे इतिवृत्त सादर केले. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींवर सखोल चर्चा झाली. पालकांनी आपल्या अनुभवातून समस्या मांडल्या, तर शिक्षकांनी त्या प्रश्नांवर समर्पक उत्तरं देऊन समन्वयाचे सुंदर उदाहरण घालून दिले. मुख्याध्यापक नाईक सरांनी विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देत पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेच्या प्रयत्नांची कल्पना दिली.

आपल्या भाषणात अशोकजी भैय्या साहेबांनी विद्यार्थ्यांच्या भवितव्य घडवण्यासाठी पालक-शिक्षक यांच्यातील सलग समन्वयाची गरज अधोरेखित केली. “सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी अनेक गोष्टींमध्ये गुंततात, अशा परिस्थितीत पालकांनी केवळ अभ्यासापुरते न राहता त्यांच्या मानसिक, भावनिक आरोग्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कलकोटवार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री. बोरकर सर यांनी केले.

हा मेळावा शाळा, पालक आणि संस्था यामधील संबंध दृढ करण्यास मदत करणारा ठरला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असे संवादात्मक उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सर्व उपस्थितांनी मान्य केले.