

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा – रोटरी क्लब राजुराचा वार्षिक पदग्रहण सोहळा राजुरा येथील हॉटेल शुभममध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे 2027-28 चे प्रांतपाल किशोर राठी, राजुरा तालुक्याचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, माजी उपप्रांतपाल श्रीकांत रेशीमवाले आणि वर्तमान उपप्रांतपाल मनीष मूलचंदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. रोटरी क्लब राजुराचे मावळते अध्यक्ष सारंग गिरसावळे, नवीन अध्यक्ष निखिल चांडक, सचिव राजू गोखरे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात अध्यक्षीय भाषण करताना किशोरजी राठी यांनी रोटरीच्या त्रिसूत्री तत्त्वांची — सेवा, सांघिकता व नैतिक मूल्ये — माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, समाजातील आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी आणि महिलांचे सक्षमीकरण यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोटरीचे कार्य महत्त्वाचे असून, विविध क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून समाजासाठी सामूहिक प्रयत्नांचे हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. त्यांनी व्यवसाय, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात उच्च नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या वेळी तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, श्रीकांत रेशीमवाले आणि मनीष मूलचंदानी यांनीही आपले विचार व्यक्त करत रोटरीच्या कार्याची प्रशंसा केली.
या कार्यक्रमात डॉ. ओमप्रकाश गोंड यांना रोटरी क्लब राजुराचे मानद सदस्यत्व देण्यात आले. त्यांना रोटरीचा टॅग लावून औपचारिकरित्या क्लबमध्ये सामावून घेण्यात आले. यासोबतच स्नेहा चांडक यांनाही रोटरी सदस्यत्व देण्यात आले.
गेल्या वर्षभरात रोटरी क्लब राजुराला विनामूल्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि शिक्षिकांचा – डॉ. ज्योती बजाज-सारडा, डॉ. सलोनी बजाज, ओमप्रकाश गुप्ता, छाया मोहितकर मॅडम आणि आश्लेषा वैरागडवार पाटील मॅडम – यांचा रोटरी क्लबच्या वतीने सन्मान करण्यात आला.
तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शिक्षणासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देणे हा होता.
प्रास्ताविक भाषणात मावळते अध्यक्ष सारंग गिरसावळे यांनी आपल्या कार्यकाळातील उपक्रमांचा आढावा घेतला, तर नविन अध्यक्ष निखिल चांडक यांनी आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत त्यांच्या कार्यकारी मंडळाची घोषणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केतन जुंनघरे यांनी केले आणि नवीन सचिव राजू गोखरे यांनी आभार प्रदर्शन केले. रोटरी क्लब राजुराचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



