

✒️नागेश खुपसे-पाटील(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)
सोलापूर(दि.13जुलै):-काल रात्री तांबवे येथे रामहरी गोडसे यांच्या शेतातील घरी रात्री नऊच्या दरम्यान बिबट्याने गाईच्या वासरा वरती हल्ला केला.रामहरी गोडसे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत आरडाओरड व आवाज करून बिबट्याला पळवून लावले. त्यातून वासरू बचावले आहे.
परंतु मानवी वस्तीतील बिबट्याचा वावर चिंताजनक आहे. बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा यासाठी वन विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे.
*बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचायचे तर ही काळजी घ्या*
1- शेतात जर जायचे असेल तर हातामध्ये कोयता किंवा कुऱ्हाड तसेच काठी किंवा एखादे हत्यार ठेवणे कधीही चांगले आहे.
2- जर तुम्ही एखाद्या उंच वाढणाऱ्या पिकातून किंवा उसाच्या फडातून जात असाल तर मोठ्याने आवाज करत गाणे गात जाणे गरजेचे आहे. कारण मोठ्या आवाजाला बिबट्या घाबरतो व कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली तर तो पळून जातो.
3- तसेच शेतात जायचे असेल तर बॅटरी सोबतच ठेवावी. कारण बॅटरीच्या उजेडामुळे बिबट्या लांब जातो.
4- तसेच तुमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असेल आणि तुम्हाला शेतात काही काम असेल तर वाकून काम करणे टाळणे गरजेचे आहे. कारण तुम्ही वाकून काम करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता काही पटींनी वाढते.
5- तसेच तुमच्या शेतामध्ये जनावरे असतील किंवा पशुधन असेल तर त्या ठिकाणी बंदिस्त गोठा आणि प्रकाशाची व्यवस्था असणे गरजेचे आहे. कारण बिबट्या अंधारातच जास्त शिकार करतो. प्रकाशामध्ये बिबट्याचा हल्ला होण्याची शक्यता खूपच कमी असते.
6- बिबट्याची थोडीजरी चाहूल लागली तरी कुत्रे भुंकायला लागतात त्यामुळे तुम्हाला देखील अलर्ट मिळतो. त्यामुळे बिबट्या पासून संरक्षण करता येऊ शकते.
7- तसेच तुम्हाला बिबट्या दिसून आला किंवा बिबट्याचा वावर वाढलेला दिसल्यास तुम्ही तात्काळ वन विभागाला कळवणे गरजेचे आहे.
शेतात फिरताना गळा व मानेभोवती टॉवेल किंवा जाड कापड गुंडाळा. शिकार करताना बिबट्या पहिल्यांदा मान किंवा गळा पकडतो.
सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी.
बिबट्या पाण्याच्या शोधात निमगाव तळ्याकडे किंवा सापटणे तळ्याकडे प्रवास करू शकतो. त्यामुळे तांबवे सापटणे निमगाव पिंपळनेर वेणेगाव कन्हेरगाव या भागातील शेतकरी बंधूंनी सतर्क रहावे.



