ट्रम्प यांच्या हुकुमशाही विरोधात जनता रस्त्यावर 

150

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येऊन जेमतेम सहा महिने झाले. या सहा महिन्यातच अमेरिकन जनता त्यांना वैतागली असल्याचे दिसून येत आहे. ज्या अमेरिकन जनतेने सहा महिन्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना भरभरून मते देऊन राष्ट्राध्यक्ष बनवले तीच अमेरिकन जनता आता त्यांच्या विरुद्ध रस्त्यांवर उतरून आंदोलने करीत आहे. विशेष म्हणजे ही आंदोलने फक्त एका शहरात किंवा राज्यात होत आहेत असे नाही तर अमेरिकेतील सर्व शहरात होत आहेत आणि त्यात लाखो अमेरिकन नागरिक सहभागी होत आहेत.

नुकतेच स्थलांतरितांना हद्दपार करणे आणि गरिबांसाठी मेडिकेम सुविधा कमी करणे याविरोधात १६०० हून अधिक ठिकाणी अमेरिकन नागरिकांनी निदर्शने केली. आंदोलकांनी या आंदोलनाला गुड ट्रबल लाईव्हज ऑन असे नाव दिले. शिकागो हे या आंदोलनांचे मुख्य केंद्र होते. या आंदोलनात लाखो नागरिक रस्त्यावर जमले. सर्वांनी हातात मेणबत्ती घेऊन मोर्चा काढला. हे आंदोलन शांततेत पार पडले तरी या आंदोलनात आंदोलकांनी ट्रम्प यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. पब्लिक सिटिझन ग्रुपच्या सह – अध्यक्षा लिसा गिल्बर्ट यांनी सांगितले की आपण आपल्या देशाच्या इतिहासातील भयानक काळातून जात आहोत. सरकारमध्ये वाढत्या हुकूमशाही वृत्तीचा आणि कायद्याच्या उल्लंघनाचा सामना करत आहोत, जो आपल्या लोकशाही स्वातंत्र्याला आणि अधिकारांना आव्हान देत आहे.

या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध हे आंदोलन आहे. अर्थात ट्रम्प यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध अमेरिकन नागरिकांनी केलेले हे पहिलेच आंदोलन नाही. मागील महिन्यातच अमेरिकन नागरिकांनी असेच एक मोठे आंदोलन केले होते. आंदोलकांनी त्या आंदोलनाला ‘हॅण्डस ऑफ’ आंदोलन असे नाव दिले होते. ते आंदोलन लोकशाहीसाठी असल्याचे सांगितले गेले. त्या आंदोलनात अमेरिकेतील दीडशे पेक्षा जास्त गटांनी सहभाग घेतला होता त्यात सामाजिक हक्क संघटना, कामगार संघटना, एलजीबिटीक्यू प्लस समर्थक गट, सामाजिक आणि लोकशाहीवादी गटांचा समावेश आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील ते आंदोलनही शांततेत पार पडल्याने कोणालाही अटक करण्यात आली नव्हती मात्र त्या आंदोलनामुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांची जगभर अप्रतिष्ठा झाली होती. आताही तेच झाले. सह महिन्यांपूर्वी ज्या डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेने सत्तेवर बसवले त्यांच्याच विरोधात जनतेला रस्त्यांवर का उतरावे लागत आहे असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचे उत्तर आहे ट्रम्प यांचा एककल्ली आणि मनमानी कारभार. राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे पण हे निर्णय घेताना त्यांनी अनेकांना दुखावले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशातून आयात होणाऱ्या मालांवर भरमसाठ कर लावला आहे. हे करताना त्यांनी अमेरिकेचेच भले होणार असे जनतेला ठासून सांगितले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला मेक्सिको, चीन, भारत, कॅनडा या देशांनीही जशास तसे उत्तर देऊन अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालांवर तितकाच अतिरिक्त कर लावला आहे त्यामुळे जगात व्यापार युद्धाला तोंड फुटले आहे याचा परिणाम जितका जगावर होणार आहे तितकाच तो अमेरिकेवर देखील होणार आहे. या व्यापार युद्धामुळे अमेरिकन बाजारपेठेत मंदी येण्याची भीती तेथील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. जर अमेरिकेत मंदी आली तर अमेरिकेत महागाई वाढेल त्याचा फटका तेथील सर्वसामान्य नागरिकांनच बसेल त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय तेथील सर्वसामान्य लोकांना पटलेला नाही.

केवळ हा एकमेव निर्णय नाही तर गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या पचनी पडले नाहीत त्यात हजारो केंद्रीय कर्मचाऱ्यांची कपात, सामाजिक सुरक्षा व्यवस्थापन कार्यालये बंद करणे, मदत एजेंसी बंद करणे, स्थलांतरितांना हद्दपार करणे, तृतीय पंथीयांच्या कामाच्या संधी कमी करणे, आरोग्य कार्यक्रमांच्या निधीमध्ये कमी करणे हे आणि यासारखे अनेक निर्णय अमेरिकेतील जनतेला पटले नाहीत या निर्णयांना विरोध करण्यासाठीच अमेरिकन जनता रस्त्यावर उतरत आहे.

जनतेचा वाढता रोष कमी करण्यासाठी व्हाईट हाऊस पुढे सरसावली आहे मात्र त्याचा आंदोलकांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. आंदोलनाची धग वाढतच चालली आहे. एककल्ली, मनमानी कारभार केला तर जनता ती खपवून घेत नाही हेच या आंदोलनातून अमेरिकन जनतेने दाखवून दिले आहे. हे आंदोलन जर असेच चालू राहिले तर डोनाल्ड ट्रम्प यांना जनतेपुढे झुकावेच लागेल आणि आपल्या एककल्ली स्वभावाला मुरड घालून जनतेच्या हिताचे असे सर्वसमावेशक निर्णय घ्यावे लागेल.

✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५