

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.25जुलै):-“नशा मुक्त भारत” या संकल्पनेच्या दिशेने ठाम पावले टाकत, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तसेच जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नशा मुक्त समाज निर्माण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीत शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बँड पथक, घोषणा फलक, बॅनर आणि पोलीस गाडीतील प्रभावी उद्घोषणाद्वारे नशा मुक्ती संदर्भात जनजागृती केली. कु. सृष्टी धावळे आणि कु. माही मेश्राम या विद्यार्थिनीच्या “नशा मुक्त भारत”, “व्यसनाला नाही म्हणूया”, “आरोग्याची निवड करूया” अशाउ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, शांतता समिती, लॉयन क्लब चे पदाधिकारी , जे.सी.आय चे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी तुमसर नगरीतील परिसरात भ्रमण करून जनतेशी थेट संवाद साधत नशा मुक्तीचे महत्त्व पटवून दिले. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांच्या हाती जनजागृतीची परिपत्रके देण्यात आली.
या अभियानात तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड, पोलीस सहाय्यक निरीक्षक विलास मुंडे, शारदा विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, अनिल जीभकाटे, विजया चोपकर, नितुवर्षा मुकुर्णे, दिपक गडपायले, रूपराम हरडे यांसह दोन्ही विद्यालयांचे शिक्षक, लॉयन क्लब व जेसीआयचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गिरीश पडोळे आणि सुनील सेलोटे यांनी विशेष परिश्रम घेऊन रॅली यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक विलास मुंडे यांनी मानले.
या प्रबोधनात्मक उपक्रमामुळे तुमसर शहरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, “नशा मुक्त समाजासाठी हे एक आदर्श पाऊल ठरेल”, अशा स्तुतिजनक प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. हे विशेष!



