बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणारे पुस्तक-‘मनोरंजनातून विज्ञान

78

इ. १ ली च्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ज्यांची ‘खार’ नावाची कविता अभ्यासक्रमात आहे असे प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचे ‘मनोरंजनातून विज्ञान‘ हे नुकतेच बाळगोपालांसाठी प्रकाशित झालेले पुस्तक. या पुस्तकाचे मुखपृष्ठ बालकांना आकर्षित करणारे असून मलपृष्ठावर पुस्तकाविषयी मोजक्या शब्दात माहिती लिहिली आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा परिचय आहे. या पुस्तकात सुंदरशा सहा विज्ञान बालकथा आहेत. निसर्गात घडणा-या विविध घटनांमागील वैज्ञानिक कारणे अत्यंत सोप्या, साध्या व मनोरंजक स्वरूपात कथा रुपात सांगितली आहेत. विज्ञान साहित्यातील विज्ञानकथा मुलांना खूप आकर्षित करतात. मुलांच्या विज्ञानकथा कशा असाव्यात या प्रश्नाच्या उत्तरात असे म्हटले जाते की मुलांच्या विज्ञानकथा या मनोरंजक शैलीत लिहिलेल्या काल्पनिक कथा असतात. कधीकधी विज्ञानाची तत्वे कठीण आणि कंटाळवाणी वाटतात. ती वर्गात समजत नाहीत, परंतु जेव्हा आपण ती विज्ञानकथेद्वारे समजावून सांगतो तेव्हा ती समजून घेणे सोपे होते. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया मनोरंजक बनते. मुलांमध्ये शोध घेण्याची प्रवृत्ती आणि तर्कशक्ती विकसित होते. अशाच काल्पनिक कथा या पुस्तकात आहेत. 

 या विज्ञान कथा खूप मोठ्या आणि कंटाळवाण्या नाहीत सोबत प्रत्येक कथेत आकर्षक चित्रे देखील आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याने लेखकाने असे विषय शोधले आहेत जे मुलांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड आणि जिज्ञासा वाढविण्यास मदत करू शकतात. पहिल्या ‘हि-याची पारख’ या कथेत नकली हिरे असली कशामुळे दिसत होते व ते चतुर सरदाराने कसे ओळखले हे सहजतेने प्रतिपादित केले आहे. दुस-या ‘सप्तरंगी कमान’ या कथेद्वारे गुरु-शिष्यांच्या प्रवाही व रसाळ संवादाद्वारे इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते हे सांगितले आहे. सोबत प्रकाशाशी संबंधित विविध संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. तिस-या ‘चंद्राचा प्रकाश’ या कथेत लोभी धनकची होणारी फजितीसह चंद्राची निर्मिती, त्याच्या कला, अमावस्या व पोर्णिमा कशा होतात तसेच अवकाशात असंख्य चांदण्या कोठून येतात याची माहिती दिली आहे.

‘पावसाची सरी’ या चौथ्या कथेमध्ये ढगांचा गडगडात कसा होतो, विजा कशा चमकतात, निसर्गातील जलचक्र याची माहिती दिली आहे. ‘थंडीची किमया’ या पाचव्या कथेत थंडी कशी पडते, अंगात हुडहुडी का भरते, अंगावर काटे कशे येतात आदि थंडीबद्दलची रोचक माहिती आळशी असणा-या गणू नावाच्या बालकाच्या रूपक कथेद्वारे दिली आहे. शेवटच्या ‘तेलाचे तवंग’ या कथेद्वारे घरातील चोरून खाऊ खाणा-या नरेन नावाच्या बालक पात्राच्या कथेद्वारे चोरी करणे वाईट असते या बोधासह तेल पाण्यात का मिसळत नाही व तेलाचे तवंग गोलाकारच का असतात याची कारणमीमांसा केली आहे.  

                                                  आपली बौद्धिकता आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर गुंतागुंतीचे सिद्धांत थेट बालकथेत रूपांतरित करण्यात ‘मनोरंजनातून विज्ञान‘ या पुस्तकाचे लेखक यशस्वी झाले आहेत. जे सत्य फक्त प्रयोगशाळेत तपासले जाते ते सत्य नसते. साहित्यात अनुभूत सत्यालाही तितकेच महत्त्व दिले जावे जितके प्रयोगशाळेत तपासलेल्या विज्ञानाला दिले जाते. या पुस्तकातील विज्ञानकथा मुलांच्या कल्पनाशक्तीला नवीन आयाम देऊ शकतात.

या पुस्तकातील विज्ञानकथा बालकांना मनोरंजन देण्याव्यतिरिक्त त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणा-या आहेत. या विज्ञानकथा वाचल्याने मुलांची विचारप्रक्रिया बळकट होईल आणि दूरदृष्टी देखील विकसित होईल. बालकांमध्ये मूळ समस्या ओळखण्याची आणि तिचे मूळ कारण शोधण्याची प्रवृती निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनासुद्धा निसर्गातील घटनांमागील वैज्ञानिक कारणे समजून घेण्यास हे पुस्तक हमखास उपयोगी पडणारे आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने, पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक विकत घेवून वाचायला हरकत नाही.

पुस्तक : मनोरंजनातून विज्ञान-(किंमत : १४२ रूपये)

लेखक : प्रा. देवबा शिवाजी पाटील

लेखक संपर्क : ९४२०७९५३०७

प्रकाशक : रजत प्रकाशन, संभाजीनगर

                                               पुस्तक परीक्षण-सुरेश मंत्री, अंबाजोगाई, मो.९४०३६५०७२२