

‘क्षमा’ हा छोटा शब्द मनातील कटुता, द्वेष दूर करून शांती आणतो. हा शब्द म्हणजे दयाळूपणा, सहानुभूती आणि नातेसंबंध दृढ करण्याचे महत्त्वाचे काम करतो. क्षमा करणे म्हणजे स्वतःला आणि इतरांना मुक्त करणे. ती अंतःकरण शुद्ध करते, तणाव कमी करते आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देते. क्षमा ही खरी ताकद आहे असे मोलाचे विचार सामूहिक क्षमापर्वाच्या आजच्या दिवसाच्या औचित्याने प. पू. डॉ. उदितप्रभाजी उषा म.सा. यांनी धर्मप्रवचन सभेत मांडले. श्रावक-श्राविकांनी भरगच्च भरलेल्या आर.सी. बाफना स्वाध्याय भवनात संयम स्वर्ण साधिका, श्रमणीसूर्या, राजस्थापन प्रवर्तीनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा., प.पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा., प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा, प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा., आणि नीलेशप्रभाजी म.सा. आदिठाणा सहा यांची उपस्थिती होती.
कुणी आपल्याशी गैरवर्तन केले असेल, दुखावले असेल त्याच्याबद्दल आपल्या मनात मळ नसावा, पूर्वग्रह नसावा, मनात वाईट विचार नसावेत त्याच्याबद्दल स्वच्छ मन असावे. ही बाब स्पष्ट करण्यासाठी गुरुकुलातील विद्यार्थी, गुरू आणि सिद्ध योगी यांची गोष्ट सांगितली. तुम्हाला दुखावले असेल तर त्यांच्याविषयी तुमच्या मनातला जो प्रदूषीत भाव असेल तो काढू या. त्यासाठी प्रत्येकाला काकडी देण्यात आली व ती सदैव जवळ बाळगण्यास सांगितली. १५ दिवसांनी काकडी सडली, त्यातून दुर्गंध बाहेर येऊ लागला. तेथील विद्यार्थ्यांनी गुरुंकडे तक्रार केली की या काकडीपासून मुक्ती द्यावी. गुरुंनी विद्यार्थ्यांना पटवून दिले की दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात ठेवणे हे तर सडलेल्या काकडीपेक्षा वाईट असते त्यामुळे प्रत्येकाविषयी निर्मळ मन असण्यासाठी क्षमापणा दिवस असतो. आपल्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी सकाळ सायंकाळ, आठवड्याचे, पंधरा दिवसाचे किंवा महिन्याचे प्रतिक्रमण करणे अत्यावश्यक असते. हे नाहीच झाले तर वर्षातून एकदा संवत्सरीच्या दिवशी तरी प्रतिक्रमण करणे अत्यावश्यक आहे. क्षमा हे शास्त्र आहे तसेच ते शस्त्र देखील आहे. क्षमा हे कटू झालेल्या नात्यांना जोडणारा पूल आहे. क्षमा करणे आणि क्षमा मागणे या गोष्टीतून आपले मन स्वच्छ करून घेऊ या असे आवाहन देखील प्रवचनात करण्यात आले.
(शब्दांकन – किशोर कुळकर्णी, मो. 94227 76759)



