

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा आज स्मृतिदिन. पाच वर्षापूर्वी ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता कारण प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एक ऋषितल्य व्यक्तिमत्व होते. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांपासून ते पंतप्रधानांपर्यंत आणि सत्ताधारी पक्षांपासून विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनाच कमालीचा आदर होता. भारतीय राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले प्रणव मुखर्जी यांना भारतीय राजकारणातील भीष्म पितामह म्हणावे लागेल कारण जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय राजकारणात घालवले. त्याचा जन्म ११ डिसेंबर १९३५ चा. त्यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. त्यासाठी त्यांनी दहा वर्ष कारावासही भोगला. प्रणव मुखर्जी यांचे वडील काँग्रेस कमिटीचे सदस्य होते तसेच पश्चिम बंगाल विधानपरिषदेचे अध्यक्ष होते त्यामुळे लहानपणीच त्यांच्यावर देशभक्तीचे संस्कार झाले. प्रणव मुखर्जी यांनी कोलकाता येथील विद्यासागर विद्यापीठातून एम ए आणि एल एल बी केले. राजकारणात येण्याआधी त्यांनी काहीकाळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली तर काहीकाळ पत्रकारिताही केली. पण लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने त्यांनी १९६९ साली राजकारणात प्रवेश केला आणि अल्पावधीतच आपल्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या जोरावर मंत्रिपदापर्यंत मजल मारली. आपल्या तल्लख बुद्धीने आणि दूरदृष्टीने त्यांनी त्या पदावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. नियोजन आयोगाचे अध्यक्ष, राज्यसभेचे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच विविध संसदीय समित्यांची अध्यक्षपदे अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. या सर्व पदांवर त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. प्रणव मुखर्जी हे त्यांच्या विविध लोकाभिमुख निर्णयाने देशभर चर्चेत राहिले. राष्ट्रपतीपद ग्रहण करण्यापूर्वीपासूनच संसदीय लोकप्रणालीत अद्ययावत माहिती ठेवणारे नेते म्हणून प्रणव मुखर्जी यांची ख्याती होती. लोकसभेत विविध पदे भूषवताना संसदेच्या आवारात अगदी विरोधी पक्षातील दिग्गज नेतेही त्यांच्याशी महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करताना आढळत. नव्या खासदारांसाठी त्यांचे भाषण, संसदीय आयुधे वापरून प्रश्न उपस्थित करणे हे प्रशिक्षणच होते. गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण याबाबतचे त्यांचे ज्ञान चकित करणारे होते त्यामुळेच त्यांना भारतीय राजकारणात व ज्ञानी वर्तुळात संसदीय प्रणालीची एक चालती बोलती लायब्ररी संबोधले जायचे म्हणूनच राष्ट्रपतीपदी त्यांची निवड झाल्यावर एका योग्य नेत्याची निवड झाली अशीच भावना संपूर्ण देशाची झाली होती. राष्ट्रपतीपद हे घटनेतील सर्वोच्चपद आहे. या पदाला एक मान आहे, प्रतिष्ठा आहे. एक वेगळा शिष्टाचार असलेले हे पद आहे. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवण्याचेच काम केले. प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या पूर्वी लावले जाणारे महामहीम हा शब्द न वापरण्याची प्रशासनाला सूचना केली. हे पद आणि त्याची समावेशकता वाढवण्याचा हा महत्वाचा निर्णय होता. भारतीय लोकशाहीचा इतिहास जगाला सांगणारा, जगाची भाषा समजणारा एक ऋषितुल्य वक्ता याठिकाणी विराजमान असल्याचे समाधान देशाला मिळाले. ३१ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाली. त्याच्या निधनाने भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले. भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले माजी राष्ट्रपती स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५



