राजुरा दौऱ्यात गुरुजींच्या गृहप्रवेशाला दिली माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांनी सदिच्छा भेट- सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरली उपस्थिती

488

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा-राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराज भैय्या अहिर यांचा राजुरा तालुक्यातील जनसंपर्क दौरा सामाजिक संवाद आणि आपुलकीच्या क्षणांनी समृद्ध ठरला. या दौऱ्यात त्यांनी स्वप्नपूर्ती कॉलनी येथे विदर्भ गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे नागपूर जिल्हा सल्लागार तथा निवृत्त केंद्रप्रमुख श्री. सुधाकर चंदनखेडे गुरुजी यांच्या नव्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

ही भेट केवळ एक सामाजिक शिष्टाचार नव्हे, तर लोहार समाजाच्या अस्तित्व आणि अभिमानाचे प्रतिक ठरली. चंदनखेडे गुरुजी हे आपल्या सेवावृत्ती, शिक्षणप्रेम आणि सामाजिक योगदानामुळे विदर्भातील लोहार व तत्सम घटकांमध्ये विशेष सन्मानाने पाहिले जातात. अशा व्यक्तीच्या गृहप्रवेश सोहळ्याला केंद्र सरकारच्या माजी मंत्र्याची हजेरी हा समाजासाठी गौरवाचा क्षण होता.

यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भीमराव पाटील मडावी, भाजप नेते अरुण मस्की, राजू घरोटे, बाबुराव मडावी, विमाशि चे माजी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, कळमना ग्रामपंचायत चे सरपंच नंदकिशोर वाढई, लोहार समाजाचे कार्यकर्ते मोहनदास मेश्राम, संतोष चंदनखेडे सह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वरूप औपचारिक नसले तरी, उपस्थित मान्यवरांमधील संवादातून सामाजिक एकात्मतेचा सूर स्पष्टपणे उमटत होता. हंसराज अहिर यांनी चंदनखेडे गुरुजींना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि लोहार समाजाच्या प्रश्नांवर केंद्रस्तरीय पातळीवर सकारात्मक विचार केला जाईल, असा विश्वासही व्यक्त केला.

राजकीय सौजन्य, सामाजिक आत्मीयता आणि स्थानिक नेतृत्वाचा गौरव यांचे हे एकत्रित प्रतिबिंब असलेली ही भेट, राजुरा तालुक्यातील ओबीसी समाजासाठी प्रेरणादायक ठरली आहे.