

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा : जवाहर नवोदय परीक्षा मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षासाठी बसणाऱ्या खाजगी अनुदानित शाळा आणि इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळेतील हिंदी, इंग्रजी व मराठी माध्यमांच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित एकदिवसीय तालुकास्तरीय नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षापूर्व मार्गदर्शन कार्यशाळा ॲड.यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय,राजुरा येथे आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन राजुरा पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण गोरे यांनी केले, प्रमुख अतिथी केंद्र प्रभारी प्रा.भरत कुमार , विषयतज्ज्ञ राकेश रामटेके, उपप्राचार्य प्रा. इर्शाद शेख, मार्गदर्शक अरविंद भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात प्रा.भरत कुमार यांनी केंद्राअंतर्गत नवोदय परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना विदर्भ,जिल्हा व तालुकास्तरीय विविध मार्गदर्शन शिबिर , प्रशिक्षण, कार्यशाळा व पालक समुदेशन कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनि नवोदय परीक्षेत यशस्वी होऊन आई_ वडिलांचे नवोदयचे स्वप्न पूर्ण करावे आणि शाळा तसेच तालुक्याचे नाव रोशन करावे असे आवाहन केले.
तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक अरविंद भगत यांनी शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रम ओळख ,प्रश्नपत्रिका स्वरूप आणि गणितातील सोप्या पद्धती या विषयावर सविस्तर उदाहरणासहीत मार्गदर्शन मार्गदर्शन केले. या शिबिराबद्दल विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करीत उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात राजुरा तालुक्यातील नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा व सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विविध खाजगी अनुदानित शाळा व इंग्रजी कॉन्व्हेन्ट शाळांमधील हिंदी, मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी केंद्र समन्वयिका आम्रपाली बागेसर, डॉ. झाडे, प्रकाश गावंडे, चमनलाल डोंगरे, कमलाकर पायफळे यांनी सहकार्य केले.



