दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखा पखाले

130

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा ) : दहिवडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदी सुरेखा पखाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दहिवडी नगरपंचायतीमध्ये नगरध्यक्षा आणि उपगराध्यक्षा पदी महिलांचीच वर्णी लागली असल्यामुळे आता येथे महिलाराज चालू झाला या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

मागील काही कालावधीत दहिवडी नगरपंचायतीत अनेक घडामोडी घडल्या. सागर पोळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर निलम जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यानंतर उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचालींनी वेग घेतला. राजेंद्र साळुंखे यांनी स्वतः राजीनामा दिल्याने नवीन उपनगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्याचवेळी शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नगरसेविका सुरेखा पखाले यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले होते.

बुधवारी सकाळी ना. जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी संदिप घार्गे यांच्याकडे दाखल केला. या अर्जावर सुचक म्हणून रुपेश मोरे यांनी सही केली. उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी सुरेखा पखाले यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी नगराध्यक्षा नीलम जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, सुरेखा पखाले यांनी बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनाली गोरे यांच्या हस्ते आपला पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बाळासाहेब सावंत, सभापती अतुल जाधव, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक राजेंद्र जाधव, सरपंच दत्तात्रय घाडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले.