ओटीटी प्लॉटफॉर्मसाठीही सेन्सॉरबोर्ड हवे

99

कोरोना काळात लॉकडाउन असल्याने चित्रपटगृहे बंद होती अशावेळी नवीन चित्रपटांच्या प्रसारणासाठी निर्माते, दिग्दर्शकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली. प्रेक्षकांनाही हा नवा पर्याय खूप आवडला कारण चित्रपटगृहात न जाता घरात बसून आपल्या लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर किंवा अगदी हातातल्या मोबाईलवर देखील नवा चित्रपट पाहायला मिळू लागला त्यामुळे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती देऊ लागले. ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता जशी वाढत गेली तसे निर्माते दिग्दर्शक या प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करू लागले.

त्यातही सलग तीन तास छोट्या स्क्रीनसमोर प्रेक्षकांना बसणे शक्य होत नाही हे लक्षात आल्यावर निर्मात्या दिग्दर्शकांनी त्यालाही पर्याय शोधून काढला तीन तासांचे चित्रपट सहा ते दहा भागात वेबसिरीजच्या रूपात प्रदर्शित करू होऊ लागले. ओटोटीच्या या वेबसिरीजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हिंदी वेबसिरीजने तर कमालीची लोकप्रियता मिळवली. या वेबरीजममध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वच दिग्गज कलाकार भाग घेऊ लागले. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉरबोर्डची मान्यता आवश्यकता असते. तशी वेबसिरिजना नसते त्यातही या वेबसिरीजचे सर्वाधिक प्रेक्षक हे २० ते ४० या वयोगटातील म्हणजे तरुण असतात. सेन्सॉरबोर्ड नाही आणि प्रेक्षक तरुण मग काय निर्माते दिग्दर्शकांनी वेबसिरीजद्वारे ओटीटी ॲप्सवर अश्लीलतेचा भडिमार सुरू केला. अश्लीलतेचा भडिमार असलेल्या अशा शेकडो ॲप्स ओटोटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालू लागल्या. अलीकडील काळात तर अश्लील ओटोटी ॲप्सचा इंटरनेटवर महापूर आला.

या ओटोटी ॲप्सवर अश्लीलतेचा अक्षरशः नंगानाच चालू झाला. फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया साईटवर या ओटीटी ॲप्स आणि वेबसिरीजची अश्लील दृश्ये मुद्दामहून प्रसारित केली जाऊ लागली जेणेकरून तरुण मुले ही ॲप्स आणि वेबसिरीज पाहतील. तरुण मुलांना अश्लीलतेकडे घेऊन जाणाऱ्या या अश्लील ॲप्सवर आणि वेबसिरीजवर बंदी आणावी अशी मागणी होऊ लागली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र ही मागणी होऊ लागली. संसदेत देखील काही खासदारांनी अश्लील ॲप्सवर बंदी घालावी अशी मागणी केली. काही सुजाण नागरिकांनी त्यासाठी न्यायालयाची दारे देखील ठोठावली. सुजाण नागरिकांच्या या मागणीला अखेर यश मिळाले. मागील आठवड्यात केंद्र सरकारने देशातील २५ ओटीटी ॲप्स वर बंदी घातल्याची घोषणा केली. बंदी घालण्यात आलेल्या ओटीटी ॲप्समध्ये उल्लू, एएलटीटी आणि डिसिफ्लिक सारख्या काही मोठी नावे समाविष्ट आहेत.

माहिती प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की या निर्णयाचा मुख्य उद्देश अश्लील सामग्रीचा प्रसार रोखणे हा आहे. अशी सामग्री भारतीय कायदेशीर आणि सांस्कृतिक मानकांचे उल्लंघन करणारी मानली जातात. बंदी घालण्यात आलेल्या अन्य ॲप्समध्ये बिगशॉट, बूमएक्स, नवरासा लाईट, गुलाब ॲप, बुल ॲप, जलवा ॲप, कंगन ॲप, वॉव एंटरटेनमेंट, लुक एंटरटेनमेंट, हिट प्राईम, फेनियो, शोएक्स, सोल टॉकिज, अड्डा टीव्ही, हॉट एक्स, व्हीआयपी, हलचल ॲप, मूड एक्स, निऑन एक्स, फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स यांचा समावेश आहे. सरकारने इंटरनेट सेवा प्रदात्यांना भारतात या वेबसाइटवर सार्वजनिक प्रवेश थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या अश्लील ॲप्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागतच होत आहे. केवळ या २५ ॲप्सवरच नाही तर यासारख्या ज्या ज्या ॲप्सवर अश्लीलतेचा नंगानाच चालू आहे अशा सर्वच ॲप्सवर सरकारने बंदी घालायला हवी. याशिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या सर्वच अश्लील वेबसिरिजवर देखील बंदी घालायला हवी. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू असलेल्या अश्लील वेबसिरिज समाजाचा समतोल बिघडवत आहेत.

या वेबसिरीज मोबाईलवर पहायला मिळत असल्याने अल्पवयीन मुलेही या वेबसिरीज चवीने पाहत असतात. वेबसिरिजसाठी सेन्सॉरबोर्ड नसल्याने यात काहीही दाखवले जाते. आक्षेपार्ह, अश्लील, लोकांच्या भावना दुखावणारे, भावना चाळवणारे, हिंसेला, व्यसनाला प्रोत्साहन देणारे असे सर्व ज्यांच्यावर सर्वसाधारण स्थितीत बंदी घातली जाऊ शकते किंवा प्रौढांसाठी म्हणून बिरूद लावले जाऊ शकते असे सर्वकाही दाखवले जाते. सेन्सॉरबोर्ड नसल्याने निर्माते दिग्दर्शक आक्षेपार्ह दृश्ये दाखवतात. वेबसिरिजना चित्रपटासारखे स्वतंत्र सेन्सॉरबोर्ड लागू केले तर या गोष्टींना आळा बसेल चित्रपट असो की वेबसिरीज सेन्सॉरबोर्डने मान्यता दिल्याशिवाय ओटोटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येऊ नये.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५