चोखिया समजून घ्यायला हवाः डॉ. विलास खंडाईत

94

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड (सातारा) : डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून मौलिक योगदान देऊन सांस्कृतिक परिवर्तनाला नवी दिशा आणि चालना दिली आहे. त्यांच्या साहित्यकृती म्हणजे संशोधनाच्या पातळीवरील ऐतिहासिक वास्तवाचा अस्सल ठेवा असतो. हे ‘चोखिया’ या त्यांच्या नव्याकोऱ्या ग्रंथाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. म्हणूनच चोखिया हा ग्रंथ समजून घ्यायला हवा, असे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांनी केले.

प्राच्यविद्यापंडित डॉ. आ. ह. साळुंखे लिखित चोखिया या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक दालनात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. विलास खंडाईत बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे होते. भंते दीपंकर, विलासराव कांबळे, नारायण जावलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. विलास खंडाईत आपल्या भाषणात पुढे म्हणाले, त्र्यांऐशी वर्षाचे असणारे डॉ. आ. ह. साळुंखे यांचे लेखनकार्य आजही अविरपणे सुरू आहे, ही खरोखरच नव्या पिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारी बाब आहे. आपल्या साताऱ्यात जागतिक कीर्तीचा साहित्यिक – विचारवंत आहे ही आपल्यासाठी भूषणावह अशी बाब आहे. त्यांचे असंख्य ग्रंथ विद्यापीठ स्तरावर संशोधानासठी संदर्भ म्हणून अभ्यासले जातात. त्यांच्या साहित्यातून ऐतिहासिक व सांस्कृतिक संघर्ष समजतात आणि मानवी मूल्याच्या लढ्यासाठी झगडलेले नायकही आपणाला भेटतात. म्हणूनच आ. ह. केवळ व्यक्ती नाही तर चालतेबोलते विद्यापीठ होय, असेही गौरवोदगार डॉ. विलास खंडाईत यांनी काढले.

अध्यक्षीय भाषणात साहित्यिक अरुण जावळे म्हणाले, चोखियाचे प्रकाशन करताना आणि तो समजून घेताना एक विशेष आनंद होतोय. चोखामेळा हे व्यक्तिमत्त्व संत म्हणून जरी परिचित असले तरी त्यांना सोसाव्या लागलेल्या यातना – वेदना याही समजून घेतल्या पाहिजेत. डॉ. आ. ह. यांनी चोखिया या ग्रंथातून चोखामेळासंदर्भातील अनेक दाखले, घटना, पैलू पुढे ठेवून महत्त्वपूर्ण काम केले आहे.

प्रारंभी शाहीर श्रीरंग रणदिवे यांनी ग्रंथासंबधी गीतगायन केले. प्रास्तविक विलासराव कांबळे यांनी केले. नारायण जावलीकर यांनी सूत्रसंचालान तर आभार लोकायत प्रकाशन संस्थेचे सर्वेसर्वा राकेश साळुंखे यांनी मानले. कार्यक्रमास विजयराव गायकवाड, चंद्रकांत खंडाईत, गणेश कारंडे, प्रशांत पोतदार, प्राचार्य रमेश जाधव, प्राचार्य अरुण गाडे, अरविंद यादव, डॉ. शरद गायकवाड, डॉ. केशव पवार, मधुकर आठवले, डॉ. प्रदीप शिंदे, विवेक म्हस्के, पी. डी. साबळे, सुदर्शन इंगळे, अनील वीर, भगवान अवघडे, प्रज्वल मोरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.