

दि.१२
नागेश खुपसे-पाटील
(सोलापूर जिल्हा प्रतिनिधी) हृदयविकाराच्या तीव्र आघातानंतर हृदय फाटल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असते. अशा अत्यंत गंभीर अवस्थेतही मार्कंडेय रुग्णालयातील हृदय शल्यचिकित्सक डॉ. विजय अंधारे व त्यांच्या टीमने ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून रुग्णाचे प्राण वाचवले.
बार्शीतील एका रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची अवस्था अर्धशुद्धीत, रक्तदाब फक्त 60 आणि हृदयाभोवती रक्तस्राव अशी गंभीर झाली होती. सोलापूरला हलवल्यानंतर स्कॅनिंगमध्ये हृदयाच्या मागील भागातील रक्तवाहिनी बंद झाल्याने स्नायू खराब होऊन भोक पडल्याचे आढळले.
डॉ. अंधारे यांनी ‘बायो ग्लू’ व ‘ट्रिपल पॅच टेक्निक’चा वापर करून भोक बंद केले व खराब झालेल्या स्नायूंना पॅचने सपोर्ट दिला. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले 24 तास रुग्ण गंभीर अवस्थेत होता; पेसमेकर बसवून सात दिवसांच्या उपचारांनंतर तो पूर्ण बरा होऊन घरी परतला.
या यशामागे डॉ. मंजुनाथ डफळे (भुलतज्ञ), लहू सुपेकर (परफ्युजिनिस्ट), डॉ. सुप्रिया खिलारे, डॉ. आरती त्र्यंबके, डॉ. प्रज्वल कन्ना, डॉ. कोमल हटीकटी, डॉ. राजे पांढरे, डॉ. बबीता तसेच सिस्टर मुबीना, तेजस्विनी, केशव, अश्विनी यांचा मोलाचा सहभाग राहिला.
सोलापूरसारख्या शहरात अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेत यश मिळणे ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.



