

✒️सुनील शिरपुरे(यवतमाळ प्रतिनिधी)
झरीजामणी(दि.29ऑगस्ट):- पवन कुळसंगे मित्रपरिवार तर्फे सुरु असलेल्या आदिवासी समाज गाव भेट दौरा व आढावा बैठकीत डुबलीपोड येथे सर्व आदिवासी समाज राहत असल्याचे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी असल्याचे दिसून आले. या बैठकीत ग्रामस्थांनी गावातील अनेक समस्या मांडल्या.
त्यात मुख्यत्वे रस्त्यांची अतिशय दयनिय अवस्था समोर आली असून ही एक गंभीर समस्या आहे. गावातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात चिखल व पाणी साचते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आरोग्यासह वाहतुकीचाही त्रास सहन करावा लागतो. यात दोन चाकी वाहनांना घसरगुंडीचा धोका तर चारचाकी वाहनांना मोठे नुकसान होण्याची भीती कायम असते.
शाळकरी मुलांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण झाले, तर रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. तसेच शेतक-याना शेतमाल बाजारात पोहोचवताना देखील मोठा त्रास सहन करावा लागतो, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. गावातील रस्ता हीच जीवनरेखा असल्याने शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डुबलीपोड गावातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी या बैठकीतील उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आहे.
या दौ-यात पवन कुळसंगे मित्रपरिवाराने ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित विभागापर्यंत आवाज पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मित्रपरिवारातील प्रशांत निमसरकर, बापूराव टेकाम, किशोर टेकाम, नितेश टेकाम, रवीभाऊ टेकाम, प्रभाकर कुमरे, सुधाकर टेकाम, आकाश आत्राम, क्रिष्णा आत्राम उपस्थित होते.



