

नाशिक शांतारामभाऊ दुनबळे
नाशिक-: जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेचे विद्यापीठ स्थापण्याचा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा शुक्रवारी माजी सरचिटणीस निलिमाताई पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मविप्र संस्थेची वार्षिक सभा उद्या होत आहे. त्यात मविप्र विद्यापीठ स्थापण्याचा विषय आहे. त्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी श्रीमती पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या खासगी विद्यापीठ स्थापण्याच्या मनसुब्यांना तीव्र विरोध केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, माजी अध्यक्ष अरविंद कारे, संचालक माणिकराव बोरस्ते, मोहन पिंगळे, भाऊसोहब खातळे, सचिन पिंगळे, बाळासोहब कोल्हे, दिलीप पाटील, अनिल भालेराव, लक्ष्मीकांत कोकाटे, प्राची पवार, प्रणव पवार यावेळी उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या की, विद्यापीठ स्थापन झाले व कुलपती नियुक्त झाल्यावर कार्यकारी मंडळ आणि १० हजार सभासदांच्या अधिकारावरच गदा येईल. सर्वच विद्याशाखा त्यात जोडल्या जातील व खासगीकरणाकडे वाटचाल सुरु होईल. कर्मवीरानी महाप्रयासाने वाढविलेल्या मविप्र् या संस्थेत असे उद्योग होऊ नये म्हणूनच हा डाव हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे. रविवारच्या सभेत त्याचे प्रतिबिंब पहायला मिळेल यावेळी पवार यांनी मविप्र विद्यापीठ स्थापण्याला जाहीर विरोध, चारशे कोटीची स्थावर व मालमत्ता हातून जाण्याची भीती, अनुदाने बंद होतील, विद्याथ्यांचे शुल्क वाढेल, सभासदांना अंधारात ठेऊन निर्णय, संस्थेचे खासगीकरण झाल्यास शासनमान्य शिष्यवृत्ती, अनुदान व देयके बंद होतील विषय मंजूर केल्यास न्यायालयात त्याला आव्हान दिले जाईल असे श्रीमती निलिमा पवार यांनी स्पष्ट केले.



