गंगाखेड पालिकेवर कावड मोर्चा काढण्याचा कॉंग्रेसचा ईशारा 🔹पाणी, स्वच्छतेसाठी कार्यालयात ठिय्या आंदोलन

283

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
एका बाजूस दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदी आणि दुसऱ्या बाजूस १०० टक्के भरलेले मासोळी धरण. असे असतानाही शहराला आठ ते पंधरा दिवसाला एकदा पाणीपुरवठा केला जातो. योग्य नियोजन करून शहराला दररोज पाणीपुरवठा केला जावा या प्रमुख मागणीसह ईतर नागरी समस्यांच्या सोडवणूकीसाठी गंगाखेड कॉंग्रेसने आक्रमक होत आज पालिकेत कार्यालयात महिलांसह ठिय्या आंदोलन केले. या समस्या तात्काळ न सोडवल्यास कावड मोर्चा ने गोदावरीचे पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खूर्चीस जलाभिषेक करण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.
सततच्या पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. ऐन पावसाळ्यात धरण ऊशाला आणि कोरड घशाला अशी नागरिकांची अवस्था झाली आहे. हे केवळ प्रशासनाच्या नियोजन शुन्यतेमुळे होत असल्याचा आरोप आज करण्यात आला. पाण्याबरोबरच शहरातील कचरा व्यवस्थापनाचाही पुरता बोजवारा ऊडाल्याचे चित्र आहे. मोकाट जनावरांचा संपूर्ण शहरभर मुक्त संचार सुरू असून खांबांवरून गायब झालेले विज दिवे नागरिकांच्या गैरसोयीत भर घालत आहेत.
या सर्व समस्या घेवून गंगाखेड येथील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच नगर परिषद कार्यालय गाठले. जुन्या शहर भागातील महिलांचीही यावेळी लक्षणीय उपस्थिती होती. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालय अधिक्षक सुरेश मणियार, पाणीपुरवठा विभागाचे साळवे, स्वच्छता निरीक्षक सागर जगतकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. सर्वच विभाग प्रमुखांनी येत्या आठ दिवसांत परिस्थितीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. असे न झाल्यास कॉंग्रेस व समविचारी पक्षांचा कावड मोर्चा काढण्यात येईल. गोदावरी नदीतून खांद्यावरून पाणी आणून नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या खूर्चीस जलाभिषेक केला जाईल. मोकाट जनावरे नगर परिषद कार्यालयात आणून बांधली जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष मुंडे, माजी नगरसेवक राजकुमार सावंत, प्रमोद मस्के, अ. जा. विभागाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, डॉ. शैलेश कदम, योगेश फड, अल्पसंख्यांक विभागाचे मुश्रफ खान, युवक कॉंग्रेसचे सिद्धोधन भालेराव, माधवराव चव्हाण, शिवाजी घोबाळे, सुभाष शिंदे, करीम भाई, सुधाकर चव्हाण, भाऊराव बाबर, बाळासाहेब सोनटक्के, यांचेसह महिला प्रतिनिधी माजी न. प. सदस्या वर्षा यादव, अपूर्वा गळाकाटू, शोभा जाधव, मिरा गोरे, लक्ष्मीबाई डमरे, अर्चना गोरे, भागुबाई गिराम, स्वाती गिराम, यशोदा गोरे, मनिषा वाघमारे, भागुबाई गिराम, सिमा गोरे, शकुंतला जोगदंड, हरीबाई डमरे, मुक्ताबाई गिरी , रंगूबाई यादव, सुनीता डमरे, भामाबाई यादव, रंजनाबाई गोरे आदिंसह बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते.