

मोर्शी (तालुका प्रतिनिधी) :- मागील महिन्याभरापासून दापोरी गावामध्ये विविध आजाराच्या साथीने थैमान घातले आहे यात दापोरी येथील प्रकाशराव वाळके यांचा २ दिवसाच्या तापाने नाहक बळी गेला असून अनेक जण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत आहे तर काही जणांची प्रकृती खराब असल्याचे बोलले जात आहे. मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून डेंग्यूच्या साथीवर उपायोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने लोकप्रतिनिधींनी आता तरी त्यांना जाग आणण्याची गरज आहे.
मोर्शी तालुक्यातील दापोरी गावात मागील महिन्याभरापासून आजाराची साथ असून दररोज पंधरा वीस रुग्ण बाधित होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये १० सप्टेंबर रोजी प्रकाशराव वाळके यांना आपला जीव गमवावा लागला असून गावातिल अजुन काही जणांची प्रकृती खालावली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी हिवरखेड प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना या गंभीर विषयाबाबत माहिती दिली असता त्यांनी सुद्धा या प्रकाराची दखल घेतली नसल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आरोग्य विभागाप्रती रोष निर्माण होतांना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना दापोरी येथे आरोग्य तपासणी शिबिर लावून डेंग्यू तापावर, इतर साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता मोफत रक्त तपासणी करून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परंतु आरोग्य विभागाने अद्याप पावतो कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. दापोरी परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहे. यामुळे डास उत्पत्ती होत असून डेंग्यू, चिकन गूनिया, मलेरिया सारखी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दापोरी गावामध्ये प्रकाशराव वाळके यांचा नाहक बळी गेल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. आतातरी आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन उपाययोजना न केल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या दलांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी आरोग्य विभागाला दिला आहे.



