

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.10ऑक्टोबर):-बांधकाम क्षेत्रातील व्यावहारिक समस्या समजून बांधकाम सामग्रीची किंमत उपलब्ध असलेल्या पर्यायी बांधकाम सामग्रीच्या साह्याने कमी करून तसेच बांधकाम गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता बांधकाम क्षेत्रातील अभियंता तसेच हितधारक यांनी पर्यावरण पूरक आणि शाश्वत असे बांधकाम करावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मध्ये केले. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स नागपूर शाखेच्या वतीने उत्तर अंबाझरी रस्त्यावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या परिसरात ‘फॉरेन्सिक सिविल इंजीनियरिंग’ या विषयावरील दोन दिवसीय अखिल भारतीय चर्चासत्राचे उद्घाटन गडकरींच्या हस्ते झाले, त्यावेळी ते संबोधित करताना बोलत होते.
या प्रसंगी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स एमएसईचे अध्यक्ष ए. डब्ल्यू जवंजाळ तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष कोठारी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी इमारत बांधकाम क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाविषयी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आताच्या काळामध्ये ‘रोड फॅक्टरी’ ची गरज असून ‘प्री-कास्ट’ मटेरियल च्या असेंबलींगच्या साह्याने आता रोड आणि इमारती बनणे आवश्यक आहे. यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्री कास्ट टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यास ते उद्योगाला फायदेशीर ठरेल. उड्डाणपुलामध्ये स्टील फायबरच्या उपयोगामुळे दोन पीअर मधील अंतर कमी झाले आहे त्यामुळे बांधकाम खर्चात देखील कपात झाली आहे. वणी वरोरा जाम येथे बांबूचे क्रॅश बॅरियर्स लावल्यामुळे सुद्धा खर्च वाचला असून बायो बिटुमीनच्या साह्याने मनसर येथे 1 किलोमीटर लांबीचा रस्ता देखील नुकताच बनवण्यात आला आहे अशा प्रकारच्या शाश्वत तंत्रज्ञानाच्या साह्याने तसेच पर्यावरण पूरक आणि भविष्यातील दृष्टिकोन ठेवून बांधकाम केल्यास अपघाताच्या घटनांमध्ये सुद्धा कमतरता येईल असं गडकरी यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी गडकरी यांना इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. या दोन दिवसीय परिषदेमध्ये आघाडीच्या बांधकाम कंपन्या, फॉरेन्सिक सल्लागार आणि तंत्रज्ञान पदाच्या कडून नावीन्यपूर्ण उपाय आणि तंत्रज्ञान प्रदर्शित केले जात आहेत.
10 ते 11 ऑक्टोबरदरम्यान नागपूमध्ये आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात भारतातील सिव्हिल इंजिनिअरिंग व्यावसायिक, शिक्षण तज्ञ संशोधक सल्लागार आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे जे फॉरेन्सिक सिविल इंजिनिअरिंगच्या बहुविद्याशाखीय क्षेत्राच्या ज्ञानाच्या देवाण-घेवा मंच म्हणून या चर्चासत्राचा फायदा घेत आहेत.



