

▪️वरुड मोर्शी तालुक्याचा दुष्काळामध्ये समावेश करून विशेष पॅकेज जाहीर करा !
✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
वरूड(दि.10ऑक्टोबर):-वरुड मोर्शी तालुक्याचा दुष्काळामध्ये समावेश करून विशेष पॅकेज जाहीर करून सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मोर्शी वरूड तालुक्यात सर्व महसूल मंडळाचा समावेश करून व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
मोर्शी वरूड तालुक्यामध्ये जुलै २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे व नंतर आलेल्या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे, कपाशी, तूर, सोयाबीन मिरची यासह विविध शेती पिकांचे, प्रचंड नुकसान झाले. मोर्शी वरूड तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा व सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून अद्याप मोर्शी वरूड तालुक्यातील सर्वच मंडळातील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याची बाब माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
या पार्श्वभूमीवर देवेंद्र भुयार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मोर्शी वरूड तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत तात्काळ निर्णय घेऊन मोर्शी वरूड तालुक्यातील सततच्या पावसामुळे ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील प्रचंड संत्रा गळती होऊन संत्रा पीक बाधित झाल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जिल्हाधिकारी येरेकर यांचे फोन द्वारे संभाषण करून दिले असता मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा फळगळ ३३% पेक्षा जास्त नुकसान असल्याचा सुधारित अहवाल तात्काळ शासनाकडे पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना दिले.
यावेळी माजी आ. देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी यांना मोर्शी वरूड तालुक्यातील संपूर्ण महसूल मंडळातील तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्तरित्या सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवून अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे बाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी निवेदन देऊन केली असता माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या सकारात्मक मागणीला प्रतिसाद देत तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी यावेळी दिले.



