कांग्रेस मध्ये नेते नाहीत, राजे आहेत!

206

कांग्रेसची आजची पडिक, नापिक अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो आहे. त्याची कारणे शोधण्यासाठी मी स्वतः कांग्रेस नेत्यांना भेटतो. आतापर्यंत असे दिसले कि हे नेते नाहीत, राजे आहेत. तो महाल, तो थाट, तो मिजाज, तो रुबाब, तो लवाजमा पाहून डोळे दिपून गेले. अरे!मी राजकीय नेत्याकडे आलो आहे कि राजाकडे? हा तर गांधीजींचा पक्ष आहे. यांच्या महालात (घर नाही, महाल) गांधीजींचे फोटो लावलेले दिसतात. कृश देहयष्टी, पंचा, काठी. भींतीला टांगलेले. जसे यहुदींनी मुद्दाम येशूचे चित्र क्रुसावर लावलेले आणि टांगलेले.

      मला वाटते, कांग्रेस जरी गांधीजींची मानली तरीही येथे मात्र दस्तुरखुद्द कांग्रेस जनांनी गांधीजींना अरेस्ट करून ठेवलेले असावे. गांधीजी, तुम्ही जे केले ते केले आता मात्र चूप बसा! आता आम्हाला ऐशआरामात जगायचे आहे. तर तुमची ती साधी राहाणी, उच्च विचारसरणी सांगू नका. आता साधी विचारसरणी आणि उच्च राहाणीचा काळ आहे. म्हणून शांत बसा. आता तुमचे तत्वज्ञान कोणी ऐकून घेणार नाही. आम्ही तर मुळीच नाही.

       आता कांग्रेस नेत्यांची चौथी पिढी राज करीत आहेत. काही ठिकाणी तिसरी पिढी. तीन पिढ्या सत्ता असल्यावर कोणी गांधीजी सारखे राहाण्याची शक्यता उरलेली नाही. त्याचा हा परिणाम आहे.

    कांग्रेस आज सत्तेवर नसली तरीही त्या राजपुत्रांनी सत्ताधारी भाजपशी संगनमत करून जुडवून घेतलेले दिसते. काहींनी तर तिकडे उडी घेऊन सत्तेचे सोपान प्राप्त करून घेतलेले आहे. म्हणे,भाजपची सत्ता आहे तोपर्यंत इकडे. जर कांग्रेसची सत्ता आली तर घरवापसी. जेणेकरून आपले गड, गढी, बुरूज, किल्ले शाबूत राखता येतील.

        मी मुद्दाम सेवाग्राम स्थित गांधीजींच्या आश्रमात दोन वेळा जाऊन आलो. तेथे सुद्धा आश्रम म्हणजे आठवणींचा ठेवा किंवा संस्कारांचा हेवा राहिला नसून दौलतीचा मेवा झालेला आहे. अभिप्राय नाही, मुक्त विचारांची चर्चा नाही. मी तर प्रयत्न केला. कि, हा आश्रम पाहून मला काय वाटते, तुम्हाला काय वाटते? अशी चर्चा करण्याचा. पण हटकले. यहां ऐसी चर्चा नहीं कर सकते.सिर्फ देखो और जाओ.

      गांधीजी स्वतंत्र विचारांना महत्त्व देत असत. पण येथे विचारांना स्वातंत्र्य नाही आणि स्वतंत्र विचारही नाही.

      मला वाटते, कांग्रेसमधे पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली तर त्या माणसाने आपला कांचमहाल, संगमरवरी महाल, दगडी महाल सोडून भ्रमण केले पाहिजे. गांधीजी सारखी साधी राहाणी ठेवून प्रचार, प्रसार केला पाहिजे. अशी तयारी ज्याची असेल त्यांनाच पदाधिकारी नियुक्त केले पाहिजे.

    पण आज तसे होतांना दिसत नाही. शाळा, कॉलेज, पतपेढी, कारखाना, दारू गुत्ता, परमिट रूम अशांचे धनी असलेल्या लोकांनाच पदाधिकारी नियुक्त केले जात आहे. इतके साम्राज्य, सुख चैन सोडून जायला ते काही भगवान महावीर किंवा महात्मा गौतम बुद्ध आहेत का? ते काही गांधीजी, विनोबाजी, नेहरूजी, शास्रीजी, साने गुरुजी आहेत का?तितका त्याग करू शकतात का?

     असा त्याग करणाऱ्यांची टिम बनवून प्रत्येक जिल्ह्यात मुक्कामाला गेले पाहिजे. त्या शहरातील कांग्रेस भवन मधेच खानपान, आराम, झोप घेतली पाहिजे. नसेल भवन तर मंदिर किंवा मठात थांबले पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, तरूण, व्यापारी, उद्योजक यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. तेथेच थांबून त्या सोडवण्यासाठी सरकारी कार्यालयात, मंत्रीचे संपर्क कार्यालयात फोन करून सोडवल्या पाहिजे. रॉयल पॅलेस किंवा सिल्वर पॅलेस मधे बसून हे शक्य नाही. त्या स्थळांचा त्यात बसलेल्या माणसांवर परिणाम होतो.

    असा त्याग,अशी तयारी असेल तरच कांग्रेस घरघरात पोहचू शकते. दिल्लीत किंवा मुंबईत बसून कलगीतुरा करून, टिवल्याबावल्या करून वेळ घालवू नये. ते असे म्हणाले, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? याचे उत्तर देण्याऐवजी नागरी समस्यांचे उत्तर शोधले पाहिजे. तरच कांग्रेस हा प्रजेचा पक्ष आहे असे वाटेल. नाहीतर हा राजपुत्रांचा पक्ष आहे, असा समज दृढ होईल.      

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२