हिंदूंनो.. मग मुस्लिम धर्म स्वीकारायचा का?

179

आज आपल्या देशात हिंदू-मुस्लिम वाद सद्यस्थितीत शिगेला पोचलेला आहे. वाद करू नका म्हंटल तर आपल्यालाच सुनावतात की हिंदूंनाच का सांगता? मुस्लिमांबद्दल बोलण्याची हिम्मत नाही वगैरे. . 

             हे कट्टरवादी हिंदू संघटनांचे लोक जेव्हा सरसकट मुस्लिम धर्माविरोधात बोलतात तसंच आपल्या धर्माविरुद्ध जेव्हा एखाद्या मुस्लिम आतंकवादी संघटनेचा नेता भाषणात बोलतो तेव्हा आपल्या मनात काय भाव उत्पन्न होतात? त्या धर्माविषयी प्रेम निर्माण होते की घृणा? त्याच्याबद्दल आपुलकी वाटते की द्वेष उफाळून येतो? ते लोक जे बोलत आहेत तेच जर तुम्हाला बोलायचे-करायचे आहे तर तुम्हीही त्यांचाच धर्म स्वीकार करून व्हा ना त्या आतंकवादी संघटनांमध्ये सामील. भारताला हिंदूंचा तालिबान बनविण्याच्या का मागे लागलात? का हिंदू धर्मासारख्या प्रेमळ आणि सर्वसमावेशक धर्माला दहशत, भय निर्माण करणारा धर्म बनविण्याच्या मागे लागलात? इराण, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान सारख्या कट्टर धार्मिक देशांची अवस्था आपण बघतच आहोत, आपल्या देशाला का त्या मार्गावर नेताय? 

           बर ह्या महाभागांना काहीही सांगितलं की यांची उत्तरे ठरलेली असतात. समाजात विखारी प्रचार करतानाही यांची वाक्ये 

१) ते मुस्लिम बघा न एकमेकांसाठी कसे एकत्र येतात,

२) ते मुस्लिम लोक त्यांच्या धर्माला बघा न किती महत्व देतात,

३) ते मुस्लिम कसे आपल्या मुलांना धार्मिक शिक्षण देतात, 

४) आपल्या धर्मासाठी बघा न मुस्लिम लोक कशी वर्गणी देतात, 

५) बसमध्ये त्यांची महिला उभी असली की कसे स्वतः उभे राहून तिला पटकन जागा करून देतात, 

६) मुस्लिमांसोबत आपले भांडण झाले की कसे त्यांचे लोक पटकन एकत्र जमतात

७) ते बघा न कसे ५ वेळ नमाज पढतात.

८)दर शुक्रवारी मस्जिदमध्ये जातातच, आपण तर वर्षातून 4-5 वेळाच देवळात जात नाही, 

९) आपले लोक असे का वागत नाहीत?

१०) आपल्या लोकांमध्ये मुस्लिमांसारखी जागृती नाही वगैरे वगैरे. (ही सर्व मी स्वतः ऐकलेली वाक्ये आहेत, इतर अनेक असतील)

     अश्यांना प्रत्येकच गोष्ट परधर्मीय जशी करतात तशीच पाहिजे म्हणतांना आपण आपल्याच धर्माची बदनामी करत आहोत असं यांना का वाटतं नसेल? तुलना करताना हे लोक अप्रत्यक्ष म्हणत असतात की आपल्या धर्मापेक्षा तो धर्म किंवा तो धर्म पाळणारे लोक अधिक उत्तम आहेत.

   वरून कहर म्हणजे कोणतीही मिरवणूक असो यांना मस्जिदिसमोरच नाचायचं असत, मंदिरासमोर यांना नाचावसं वाटत नाही. मस्जिदिवरच भगवे झेंडे लावायचे असतात, मस्जिदिवरच गुलाल फेकायचा असतो. आपली जी मंदिरे अस्तित्वात आहेत तिथे आयुष्यात कधी जाऊन पूजा-अर्चा करणार नाहीत पण मस्जिदिखालीच मंदिरे शोधायची असतात. ह्याच सर्व गोष्टी दुसऱ्या देशात दुसऱ्या धर्मियांनी हिंदूंसोबत केल्या तर यांना आवडतील का? 

   रंग किंवा गुलालाबद्दल मला नेहमी वाटत की मुस्लिमांनी मस्जिदिवर गुलाल उडाला म्हणून चिडून जाऊ नये. गुलाल घाण वस्तू नाही, आनंदाच्या वेळी उधळायची पवित्र वस्तू मानली जाते त्यामुळे उधळा किती उधळता तर आम्ही साफ करून घेऊ अशीच भूमिका घेतली पाहिजे. हिंदूंनीही मंदिरावर हिरवा रंग उडाला म्हणून संतापण्याचे कारण नाही, ती काही शेणासारखी किंवा मांसासारखी घाण नाही की मंदिर अपवित्र होईल. आणि अशा क्षुल्लक गोष्टींनी जर आपला देव-अल्लाह-धर्म अपवित्र होत असेल तर आपण स्वतःच्याच देव-धर्माला अशक्त आणि असमर्थ म्हणून जगासमोर मांडत आहोत हे लक्षात घ्या.

       मग वर दिल्याप्रमाणे सर्व गोष्टी जर आपल्याला मुस्लिमांसारख्याच पाहिजेत तर मग तुम्हीच मुस्लिम धर्म स्वीकारा ना. म्हणजे कसं सगळं मुस्लिम जसे करतात तसे होईल. कशाला हिंदू धर्म महान असल्याचे गोडवे गाता? आपल्याच भावांच्या मनात त्यांच्याबद्दल द्वेष का भरताय? प्रत्येकाच्या धर्मातील पद्धतींमध्ये तफावत असली तरी प्रत्येकच धर्माची शिकवण-सार एकच आहे ते म्हणजे माणुसकी जपणे. 

        प्रत्येकच धर्मात वाईट प्रवृत्तीची माणसे (समाजकंटक) कमी-जास्त प्रमाणात असतातच. आणि कोणत्याही समाजाची स्थिती त्याच्या धार्मिक कट्टरतेवर नाही तर त्यांच्या सामाजिक सुधारनेवरून ठरत असते. कट्टरता कोणतीही असो ती माणुसकीला रसातळालाच नेणार. आज सरसकट सर्व मुस्लिमांना शिव्या घालताना, त्यांना आतंकवादी जमात म्हणताना आपण विचार करत नाही की आज आपल्या देशात २० कोटी मुसलमान आहेत. यापैकी फक्त १% मुस्लिम म्हणजे फक्त २० लाख मुस्लिम जरी आतंकवादी असते तर या देशाची काय अवस्था असती? आपल्या देशाचे सक्रीय सैन्य जे आहे ते साडे १४ लाख आहे. देश कोणत्या अवस्थेत असता आपला? आपण हे समजून घेत नाही. स्वातंत्र्यलढ्यात लाखो मुस्लिमांनी सहभाग घेतला, हजारो फासावर गेले, हजारो आझाद हिंद फौजेत भरती होऊन ब्रिटिशांविरोधात या देशासाठी लढले, अशा अनेक पिढ्या देशाशी प्रामाणिक असणाऱ्यांना वारंवार आतंकवादी म्हणून हिणवले गेल्यावर त्यांची मानसिकता काय होईल? त्यांना या देशातील हिंदू आणि हिंदू धर्माबद्दल प्रेम उत्पन्न होईल की घृणा? 

                        आपण काय बोलतो, कसे वागतो त्यावरून आपल्या धर्माची प्रतिष्ठा ठरत असते. मध्यंतरी एका वैद्याने शेण खाल्ल्याने कोरोना आणि अनेक रोग दूर होतात असे सांगून रोज शेण खायला सांगितले, स्वतः सुद्धा खाल्ले, त्यातून त्याला इन्फेक्शन झाले आणि दवाखान्यात भरती करावे लागले. कुणीही मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे उठतो आणि म्हणतो आंबे खाल्ल्याने पोरं होतात. कुठे तर कृष्णाला शाळेत घातले जाते आणि त्याच्या परीक्षेचा निकालही येतो. जगन्नाथ पुरी मंदिरात भगवान जगन्नाथाची तब्बेत खराब होते आणि डॉक्टर देवाच्या मूर्तीला तपासतात, इलाज करतात. दिल्लीतील एक कुलगुरु मॅडम कॉलेजच्या भिंतींना शेण फासतात. ह्या अशा आपल्या कृतींनी-वक्तव्यांनी आपण जगासमोर आपल्याच धर्माचं हासं करून घेतो. पण अशा हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्यांविरोधात हे कट्टर हिंदुत्ववादी कधीच बोलत नाहीत की तुमच्यामुळे हिंदू धर्माची खिल्ली उडवली जाते तुम्ही ही धर्माची बदनामी थांबवा म्हणून. यावर काही महाभाग म्हणतात बाकीच्या धर्माचे लोक पण काही-बाही बोलतात, त्यांना तुम्ही काही म्हणत नाही. पण अहो, ते शेण खातात म्हणून आपण पण खाल्लंच पाहिजे काय? त्यांच्यात आपल्यात फरक आहे की नाही? ते जसं करतात आपल्यालाही सगळं तसच करायचं आहे काय? 

                        प्रत्येक व्यक्तीला आपण कुणाचा प्रचार करावा, कुणाला समर्थन करावे ह्याचे स्वातंत्र्य आहे. परंतु आपल्या स्वार्थाकरिता करीत असलेल्या गोष्टीमुळे आपला धर्म तर बदनाम होत नाही ना ह्याचेसुद्धा भान ह्यांना राहात नाही. लाखो हिंदूंना फसवणारा, स्वतःच्याच भक्त असणाऱ्या हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या आसाराम सारख्या ढोंगी साधुमुळे यांचा धर्म बदनाम होत नाही तर ह्यां आसाराम ला वाईट म्हणणाऱ्यांमुळे ह्यांचा धर्म बदनाम होतो. वाईटाला वाईट म्हंटल्याने कधीच कोणता धर्म बदनाम नाही. निदान आमचा हिंदू धर्म तरी नाहीच. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे मानणारा आमचा वारकऱ्यांचा हिंदू धर्म आहे. परंतु एकीकडे वसुधैव कुटुंबकम म्हणायचे आणि दुसरीकडे परधर्मियांना शिव्यांची लाखोली वाहायची. त्यांना मारून टाकण्याच्या वल्गना करायच्या मग तुमच्यात आणि तालिबान्यांमध्ये फरक तो काय?

     काही बेरोजगार हिंदू युवक गोवंश वाचविण्यासाठी धडपडताना दिसतात. त्यासाठी प्रसंगी मारामारी करून स्वतः वर गुन्हे दाखल करून घ्यायलाही ते तयार असतात. पण अशांना मला विचारावं वाटतं की भावांनो या देशात सर्वात मोठे ५ कत्तलखाने हिंदूंचे आहेत जिथे रोज लाखो गायी कापल्या जातात. संपूर्ण जगात जितकी बीफची (गायीचे मांस)मागणी आहे त्यातील ५०% गोमांस हा आपला भारत देश जगाला पुरवतो. त्यामुळे तुम्ही आधी सरकारला कडक कायदा करून हे कत्तलखाने बंद करायला लावा. म्हणजे रोज लाखो गायी कटण्यापासून वाचतील. हे काय ८-१५ दिवसातून २-४ गायी वाचवता? रोज लाखो गायी कापुनही त्या कत्तलखान्यांच्या हिंदू मालकांचा धर्म बुडत नाही, मग तुमचा धर्म २-४ गायींमुळे धोक्यात का? तुम्हाला ह्या राजकारण्यांकडून मूर्ख बनवलं जातंय हे समजून घ्या. 

                  

      ह्या कट्टर हिंदुत्ववादाच्या नावाखाली हिंदू धर्म बदनाम केला जातोय. ह्या तथाकथित धर्माच्या ठेकेदारांनाच आधी हिंदू धर्म नेमका काय आहे याची शिकवण देण्याची गरज आहे. तालिबानी संघटनेवाले जसे विखारपुर्ण भाषा वापरत नवीन प्रशिक्षण घेत असलेल्या आतंकवाद्यांसमोर भाषणे देण्याचा व्हिडीओ बनवतात बस त्याच प्रकारची भाषणे हे कट्टरवादी देतात, हिरवा आणि भगवा इतकाच काय तो कपड्यांचा फरक.

               हिंदू धर्म कधीच खत्र्यात नव्हता. हिंदू धर्माचे कोणतेच परधर्मीय शत्रू नाहीत तर हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत. कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर काय बोलले हो? हिंदू धर्म सोडून द्या आणि इस्लाम स्वीकार करा म्हणाले काय? की ख्रिश्चन धर्म स्वीकारा म्हणाले? आपल्याच धर्मातल्या वाईट प्रथा-परंपरा, चालीरीती काढून टाकून आपला हिंदू धर्म अधिक सशक्त-समृद्ध बनवा जेणेकरून उद्या कुणाला हिंदू धर्मावर बोट दाखवायला जागा उरायला नको. इतकंच ते सांगत होते. आपल्याच धर्मातील लोकांना आपल्यामुळेच त्रास व्हायला नको हेच म्हणत होते. या सर्व खऱ्या हिंदूंच्या हत्या करणारेच हिंदू धर्माचे खरे शत्रू आहेत. ५०० वर्षांपूर्वी जो हिंदू धर्म अस्तित्वात होता तो जसाच्या तसा आजचे हे स्वयंघोषित सनातनी हिंदू स्वीकारू शकतात? नवरा मेळा की त्याच्याच चितेत जिवंत जळायचं, विधवांनी विवाह करायचा नाही, केशवपन, स्त्रियांना-शूद्रांना (sc, st, obc) शिक्षणाचा अधिकार नाही, समुद्र ओलांडायचा नाही, वेदातील मंत्र ऐकले की कानात शिसे ओतायचे, उच्चवर्णीयांनी गुन्हा केला की साम्य शिक्षा, तोच गुन्हा शूद्रांनी केला की कठोर शिक्षा हे सर्व आजचे स्वतः ला कितीही कट्टर सनातनी म्हणविणारे sc, st, obc आणि सर्व वर्णातील महिला मान्य करतील? यांना वरील समाजसुधारकांनी ज्या सुधारणा सांगितल्या त्या स्विकारायच्या असतात पण त्यांचं श्रेष्ठत्व मान्य करायचं नसतं.

   इतकंच कट्टर व्हायचंय तर आजपासून मुस्लिम राष्ट्रातून येणाऱ्या पेट्रोल-डिझेलवर बहिष्कार टाका ना? फेकून द्या गाड्या, सायकल-बैलगाड्यांनी फिरा. बस, ऑटो, विमान, जहाज पेट्रोल-डिझेलवर चालतात म्हणून बहिष्कार करा. एकाही मुस्लिम राष्ट्रासोबत व्यापार किंवा व्यवहार करणार नाही अशी सरकारला शपथ घ्यायला लावा. कोणत्याच मुस्लिम व्यक्तीचे रक्त/प्लाझ्मा घेणार नाही घ्या शपथ. हे काहीच करायचं नाही, फक्त कुणाच्यातरी राजकिय स्वार्थाकरिता स्वतःचा धर्म बदनाम करायचा बस. आज मुस्लिम-ख्रिश्चनांना त्रास देतोय उद्या मुस्लिम-ख्रिश्चन राष्ट्राकडून आपल्या तिथे असलेल्या हिंदूंना त्रास सुरू झाल्यास त्याला जबाबदार कोण असेल? 

       आजकाल स्वयंघोषित साधू-संतांची नवीनच जमात आली आहे. साधू-संत कुणाला म्हणायचे? जो माणसा -माणसात भेद करत नाही. ज्यांना तुम्ही हिंदू-मुस्लिम, बौद्ध-ख्रिश्चन, शीख, जैन कोणत्याही धर्माचे असल्याने त्यांच्या वागणुकीत फरक पडत नाही. जे कधीच कोणत्या एका धर्माची री ओढत नाहीत. जे कधीच इतर धर्मियांबद्दल वाईट बोलणं तर दूर चिंतत सुद्धा नाहीत. संत तुकोबाराय स्पष्ट शब्दात सांगून गेलेत की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा. ही खऱ्या संतांची व्याख्या. परंतु आज कोणते साधू आहेत? तर स्वतः च स्वतः ला संत-महंत घोषित केलेले, आपण समाजाने त्यांना हा दर्जा दिलेला नसतो. ते स्वतः च आपसात आपली पदे ठरवत असतात. हे साधू म्हणजे राजकारणात रस असलेले. सत्तेच्या लोभापायी निवडणूका लढणारे. जिभेवर ताबा नसणारे. पूर्वग्रहदूषित. उन्मत्त. ह्यांच्यावर जर तुकोबारायांनी कीर्तनकारांना जो नियम सांगितला आहे की, “जिथे कीर्तन कराल त्याठिकाणचे पाणीसुद्धा पिऊ नका” हा नियम लागू केला तर एकही साधू ह्या मठांमध्ये/आखाड्यांमध्ये दिसणार नाही. निस्वार्थपणा, त्याग, सर्व ईश्वराचीच लेकरे आहेत त्या नात्याने या जगातील प्रत्येक मनुष्य माझा भाऊच आहे हा हिंदू धर्मात सांगितलेल्या कारुण्याचा -समतेचा भाव ह्या स्वयंघोषित संतांमध्ये कधीच येऊ शकत नाही. कारण संताला कधीच धर्म नसतो आणि ज्याला धर्म असतो तो कधीच संत नसतो. माणुसकी-करुणा हाच संतांचा धर्म.

             शबरीची उष्टी बोरे खाणारे राम, ज्या नावाड्याने वनवासात मदत केली होती त्या नावाड्याला आपल्या राज्याभिषेकात सन्मानाने बोलवणारे श्रीराम, आपल्या सर्व जाती धर्माच्या सवंगड्यांसह सर्वांनी आणलेले पदार्थ एकत्रित करून त्याचा गोपाळकाला करून खाणारे श्रीकृष्ण, अठरा पगड जातींच्या मावळ्यांना व इतर धर्मातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय ह्या सर्वांनी आपल्या आचरणातून जो मांडला तो आमचा हिंदू धर्म. 

    पण दलित मुलगा माझ्या माठातील पाणी पिला म्हणून मारहाण करून त्याचा जीव घेणारा, कुणी दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून त्यांना मारहाण करणारा, मस्जिद किंवा जैन मंदिर पाडल्यावर खुश होणारा, चर्चमध्ये जाऊन धमकवणारा, ख्रिस्ती पाद्रीला त्याच्या मुलांसकट जिवंत जाळून टाकणारा, शेतकऱ्यांच्या मृत्यूवर असंवेदनशील वक्तव्ये करणारा खरा हिंदू असूच शकत नाही. हेच लोक अशा सर्वसमावेशक हिंदू धर्माला इतरांचा द्वेष करणारा कोत्या मानसिकतेचा धर्म म्हणून मान्यता मिळवून देत आहेत.

      कोणत्याही एका धर्माचा हा देश झाला तर काय इथे वाद होणार नाहीत? इराण-इराक, पाकिस्तान-बांग्लादेश, रशिया-युक्रेन, द.कोरिया-उ.कोरिया अशी अनेक उदाहरणे आहेत जे एकाच धर्माचे असून त्यांच्यात वाद आहेत. ते जाऊद्या मुघल या देशात येणापूर्वी देशात ३५० संस्थाने होती. त्यात काय हिंदू-हिंदू राज्यांमध्ये युद्ध होत नव्हती? रामायण -महाभारतात राम-लक्ष्मण हिंदू होते तर रावण-बिभीषण काय मुस्लिम होते? पांडव हिंदू होते तर कौरव काय मुस्लिम होते? त्यामुळे हे वाद निरर्थक आहेत. 

             अशा धार्मिक द्वेषातून- कट्टरवादातून आपल्या धर्माची बदनामी होऊ नये, आपला धर्म खुजा सिद्ध होऊ नये, जगात आपल्या धर्माचा सन्मान कमी होऊ नये हि काळजी घेणे, त्याकरिता कार्य करणे हे या देशातल्या प्रत्येक हिंदूचे प्रथम कर्तव्य आहे. ह्या धर्मांध ढोंगी हिंदीत्ववाद्यांवर/ढोंगी साधू-संतांवर आताच बंधने आणली गेली नाहीत तर उद्या हे या देशाची दुसरी फाळणी घडवून आणतील आणि आपल्या देशाचासुद्धा अफगाणिस्तान करतील यात शंका नाही. 

 ✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666