✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगाव(दि.27एप्रिल):- आजच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलेला आहे व त्याचा वापर मनोरंजना करिता तर काही प्रसंगी भावना भडकविण्या करिता केला जातो त्यामुळे लोकांना पुस्तकातून खरी माहिती मिळावी व त्याच्या ज्ञानात भर पडावी या करिता वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत आमदार राजू मामा भोळे यांनी व्यक्त केले .
सारा फाऊंडेशन तर्फे वाघ नगर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करतांना आमदार भोळे बोलत होते . त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर , भगवान बुद्ध यांच्या जीवनातील काही प्रसंगाचा उल्येख करून या पासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असेही सांगितले . या प्रसंगी आमदार राजू मामा भोळे यांनी या वाचनालयास पाच सिमेंटचे बाकं व वर्षभराकरिता पाच दैनिकं देण्यात येत असल्याची घोषणा केली .
ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज भारतात वाचन संस्कृती वाढावी म्हणून मोठ्याप्रमाणात लोक प्रयत्नशील आहे . भारतात हजारो वर्षांपासून दोनच वर्ग वाचन प्रिय असून ते आजही तेवढेच वाचन करतात . बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी १०० कोटींची पुस्तकं विकली गेली यातून हा वर्ग किती वाचन प्रिय आहे हे दिसून येते . तिसरा वर्ग वाचनाच्या जवळ आला हे खरे आहे मात्र तो आता दूर दूर जात असल्याचे दिसत आहे .
नंदुरबारचे तहसीलदार डी. पी. सपकाळे यांनी सांगितले की आज व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी तयार झाली आहे . यामुळे यातून जे विद्यार्थी बाहेर पडतात ते व्हॉट्स व्हॉट्स करत राहतात . आज पुस्तकं विकत घेणे , ती वाचणे कालबाह्य होऊ पाहत आहे मात्र पुस्तकं , वर्तमानपत्र हेच माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे देत असतात . ती वाचणे , अभ्यासणे काळाची गरज आहे . त्याचा वापर आपले ज्ञान विस्तारित करण्या करिता होतो हे आपण समजून घ्यावे .
नगरसेवक सुरेश सोनवणे , री. पा. ई. चे अनिल अडकमोल , ॲड. राजेश गवई , ग्राम विस्तार अधिकारी प्रीतम शिरतुरे यांची समयोचीत भाषणे झाली .
प्रास्ताविकपर भाषणात वाचनालयाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत भालेराव यांनी सांगितले की आज या वाचनालयात तीनशे पुस्तकं असून पाच दैनिकं लावण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सपकाळे , स्वागत डॉ. अशोक सैंदाणे यांनी तर आभारप्रदर्शन बापू साळुंके यांनी केले . कार्यक्रमास वाघ नगरातील स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सुरवातीस भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.