महापुरुषांच्या नावाने स्वार्थ साधणाऱ्यांची खरी जागा कोण दाखवणार? 

65

महापुरुषांचा सन्मान म्हणजे केवळ त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणे नव्हे. त्यांच्या विचारांचे खरे अनुकरण करणारेच त्यांचे खरे अनुयायी असतात. पण आज समाजात बऱ्याच लोकांनी महापुरुषांचे नाव केवळ स्वतःचे स्वार्थ साधण्यासाठी वापरण्याचा एक विकृत प्रवाह निर्माण केला आहे. ते लोक समाजाला भ्रमात ठेवतात, भावनिक ब्लॅकमेल करतात आणि स्वतःसाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय लाभ मिळवतात. हे सत्य समाजाने ओळखले पाहिजे आणि अशा लोकांना वेळीच त्याची जागा दाखविली पाहिजे.

महापुरुषांचे विचार, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांच्या संघर्षातून उभा राहिलेला समाज आज नेमका कुठे आहे? महापुरुषांचा जयजयकार करणारे लोक काय करत आहेत? अनेकांना हे माहिती आहे की, काही लोक महापुरुषांच्या नावाच्या आडमार्गाने स्वतःसाठी संपत्ती कमावतात, राजकीय लाभ घेतात, आणि समाजाला मूर्ख बनवतात. काही लोक स्वतःला मोठे समाजसेवक, नेते, किंवा समाजहितैषी म्हणवतात, पण त्यांची हाव, त्यांचा भ्रष्टाचार आणि त्यांचा स्वार्थ समाजाच्या प्रगतीसाठी घातक ठरतो.

अशी लोक महापुरुषांचे नाव फक्त भाषणात आणि जाहिरातींमध्ये वापरतात या लोकांना महापुरुषांचे तत्त्वज्ञान कळत नाही, पण त्यांच्या नावावर मोठे मोठे कार्यक्रम करायचे असतात. समाजासाठी काहीही न करता हे लोक गाजावाजा करून समाजाला मूर्ख बनवतात. महापुरुषांचे नाव घेऊन स्वतःला मोठे सिद्ध करून लोकांच्या भावनांशी खेळणे हा त्यांचा मुख्य धंदा असतो. प्रसंगी या लोकांनी महापुरुषांच्या नावाचा फायदा घेत, सत्ता सुद्धा संपादित केलेली आहे. हे लोक समाजाची सेवा करण्याच्या नावाखाली राजकीय फायद्यासाठी दिखावा करतात आणि तो स्वार्थ साध्य झाल्यावर सामान्य माणसाचा विचारही करत नाहीत. समाजासाठी लढत असल्याचे म्हणणारे हे लोक आपल्या कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती गोळा करतात, धनसंपत्ती गोळा करून विलासी जीवन जगतात आणि समाज मात्र तसाच दारिद्र्यात दुर्लक्षित राहतो. महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करणाऱ्यांना हे लोक संपवण्याचा प्रयत्न करतात आणि नवा विचार येऊ नये यासाठी जनतेला चुकीच्या माहिती देऊन समाजाला अंधारात ठेवतात. हे या लोकांमध्ये असलेले दुर्गुण आहेत.

जर आज आपण गप्प राहिलो, तर उद्या आपल्या पुढच्या पिढ्यांना महापुरुषांचा खरा इतिहास कळणार नाही. त्यांचे नाव फक्त राजकीय आणि आर्थिक स्वार्थासाठीच वापरले जाईल. त्यामुळे, आता वेळ आली आहे अशा संधीसाधू लोकांचा पर्दाफाश करण्याची. जोपर्यंत सामान्य जनता अशा भंपक लोकांना त्यांच्या जागी बसवत नाही, तोपर्यंत समाजाच्या नशिबात फक्त फसवणूकच आहे.

      आता प्रत्येक सुज्ञ नागरिकाने महापुरुषांच्या नावाने निव्वळ राजकारण करणाऱ्या लोकांना ओळखून उघडे पाडले पाहिजे, भावनिक ब्लॅकमेल करणाऱ्यांना तोंडावर उत्तर दिले पाहिजे, खऱ्या समाजसेवकांना ओळखा आणि त्यांना पाठिंबा द्या, भ्रष्ट आणि फसव्या लोकांना वेळीच विरोध करण्याची जवाबदारी प्रत्येक जबाबदार, विचारी लोकांनी घेतली पाहिजे.

*महापुरुषांचे खरे अनुयायी कोण?*

महापुरुषांचा सन्मान करायचा असेल, तर त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी खऱ्या कार्यकर्त्यांना ओळखले पाहिजे आणि समाजाला खऱ्या आणि खोट्या समाज सुधारकांमधला फरक सांगितला पाहिजे. जे लोक समाजासाठी वास्तवात झटतात. त्यांना कोणताही राजकीय, आर्थिक किंवा वैयक्तिक स्वार्थ नसतो. समाजाच्या भल्यासाठी काम करणारे लोक स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाज हितासाठी लढा देतात. सामान्य जनतेचे खरे प्रश्न सोडवणारे बोलत बसत नाहीत, तर समाजाच्या समस्या करिता अविरत झटतात. हे खऱ्या अनुयायांचे लक्षण आहेत.

*महापुरुषांचा विचार सत्यात उतरवूया*

महापुरुषांचा आदर करायचा असेल, तर त्यांच्या तत्त्वांचा स्वीकार करावा लागेल. निव्वळ जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करून काहीही साध्य होणार नाही. जे लोक समाजाची दिशाभूल करतात, त्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे. अन्यथा, आपणही त्या फसवणुकीचा एक भाग होऊ. त्यामुळे आता वेळ आहे जागरूक होण्याची, खऱ्या विचारांचा पुरस्कार करण्याची आणि संधीसाधू स्वार्थी लोकांना त्यांची जागा दाखवण्याची.

✒️राहुल श्रीराम भोयर(ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर)व्हॉट्सअँप:-९४२१८१५११४

 rahulbhoyar766@gmail.कॉम

 

(आपल्या प्रतिक्रिया आणि मते कळवा)