” समाजपरिवर्तनसाठी आंबेडकरी कवितांचे फार मोठे योगदान ” – प्रा.अरुण बुंदेले

20

▪️परिवर्तनवादी आंबेडकरी कविसंमेलनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध

▪️शब्दास्त्र विचार मंच,बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्टचे आयोजन

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.22मे):-“डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य,सामाजिक समानतेचे कार्य,राजकीय हक्कांसाठी केलेली आंदोलने, दलितांमधील अस्मिता जागृती या बाबासाहेबांच्या विचार व कार्याला साहित्यिक रूप देण्याच्या प्रेरणेतून आंबेडकरी साहित्याचा – कवितांचा जन्म झाला.समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आंबेडकरी कवितांचे फार मोठे योगदान आहे. “

असे विचार नुकत्याच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन,अमरावती येथे संपन्न झालेल्या तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी आंबेडकरी कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून परिवर्तनवादी अभंगकार व कवी प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.

प्रा.बुंदेले यांनी ” बाबा तुमच्या शब्दाने ” व ” निखारे ” या परिवर्तनवादी अध्यक्षीय कवितांचे दमदारपणे सादरीकरण केले. ते ‘ निखारे ‘ या कवितेत म्हणाले की,

” वेदना सोसता सोसता अश्रूंची होती निखारे ।

जीवनातील जखमा होती जेव्हा निखारे।

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे ।

वाहती मस्तकात वारे ॥ “

या अध्यक्षीय कवितेत त्यांनी उपमा अलंकारातून फुले-शाहू- आंबेडकरी विचारांचे मोल अधोरेखित केले आहे.

ज्येष्ठ कवी सुदाम सोनुले यांनी ‘सूर्य जाता काजव्याचे’ या गजलेतून

“टाकले ज्यांच्या गळी हार पुष्पाचे तरी ॥

गंध नसलेल्या कळ्यांचे लोक झाले सोबती ॥”

या गजलेतून आजच्या राजकीय परिस्थितीचा वास्तववाद रेखाटण्याचा प्रयास केला.

शब्दास्त्र प्रमुख ,गजलकार विद्रोही प्रवीण कांबळे आपल्या गजलेत म्हणाले की,

“संविधानाची प्रचिती येत आहे ॥ भारताचे बघ चमकले नाव आता ॥”

जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणजे भारतीय संविधान असल्यामुळे भारताचे नाव संपूर्ण जगात चमकत आहे हे सांगण्याचा येथे गजलकार प्रवीण कांबळे यांनी प्रयत्न केलेला आहे.

विद्रोही अविनाश गोंडाने ‘मित्रास पत्र’ या कवितेत म्हणाले की,

” प्रिय मित्रा तुला सापडलय घबाड,

तू झालास लबाड॥

मलाही सापडले घबाड

पण मी नाही झालो लबाड॥”

या कवितेतून त्यांनी आजच्या राजकारणातील वास्तववाद सांगण्याचा प्रयत्न केला.

कवी प्रा.देवानंद पाटील म्हणाले की,

“बाबांच्या कर्तव्याचा रथ पुढे नेऊ या ॥

बाबांच्या कर्तव्याला सर्व सलाम करू या ॥

बाबांचा कर्तव्यरथ मागे न नेता त्यांच्या अनुयायांनी पुढे नेण्यातच अर्थ आहे हे येथे सांगितले आहे .

कवी पद्माकर मांडवधरे ‘मार्गदाता’ या कवितेत म्हणाले की ,

“विश्व एक नभ एक प्रज्ञा सूर्य एक आहे ॥

झाला ज्ञानाचा सागर मार्गदाता बुद्ध एक आहे ॥”

येथे उपमा अलंकारातून केलेले वर्णन सर्वांनाच आवडले .

कवी दिलिप शापामोहन यांनी ‘ युद्ध नको बुद्ध हवा ‘ या कवितेतून जगाला शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

गझलकार देविलाल रौराळे यांनी,

“ते वेल शिक्षणाची कापावया निघाले ॥

वाटे मनू नव्याने आला अजून बाबा ॥

नव्या शैक्षणिक धोरणाचे येथे अचूक वर्णन त्यांनी केले आहे .

कवी सुशांत मेश्राम म्हणाले की,

“मनुवाद्यांनी बघा आमचा बुद्ध चोरला ॥ .

कपाळी टिळा लावून बुद्धाचा पांडुरंग केला ॥

या कवितेत आजच्या अहवाल वास्तववादाचे चित्र मोजक्या शब्दात रेखाटले आहे .

कवी गोवर्धन रामटेके यांनी ,

“भीमराया वाणी ॥

जगात नव्हता कोणी ॥

यातून जगात बाबासाहेबांचे कर्तृत्व कसे श्रेष्ठ हे सांगितले आहे .

कवयित्री जय मेहरा यांनी समता या कवितेतून,

” दिली वाट भीमाने नेक ध्येयाची ॥

कीर्ती करून गेले अमर कार्याची ॥

यातून त्यांनी बाबासाहबांचे ध्येय व अमर कार्य अधोरेखित केले आहे.

कवी रवि दलाल यांनी ‘नवरा’ या कवितेत नवऱ्याला गजऱ्यातील फुल, दुःख पेलणारा खांदा इत्यादी उपमा देऊन नवऱ्याचे अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे.

कवी ठवरे गुरुजी आपल्या कवितेत म्हणाले की ,” तथागताची वाणी ऐकून घ्या कानी ॥

सत्याचा मार्ग तुम्ही ठेवा ध्यानी मनी ॥”

कवी मधुकर हिरेकर म्हणाले की,

” लढा देऊनी सत्ता घ्या हाती ॥

सर्व प्रश्न बहुजनांचे सुटती ॥”

” मसानातले दिवे ” या कवितेत श्री.न.डोंगरे म्हणाले की,

“बाबासाहेब पुसून गेले नयनाची आसवे ॥

मसानातले दिवे आम्ही मसानातले दिवे ॥”

कवयित्री पद्माताई गजभिये आपल्या कवितेत म्हणाल्या की,

” ज्ञानज्योती सावित्रीचे अनंत उपकार ॥

शैक्षणिक कार्याने केला जीवनाचा उद्धार

कवी एम.बी.बागडे यांनी भीम जयंती मधील वास्तविकता सांगण्याचा प्रयास केला ते म्हणाले की,

” नको मिरवणुका नको देखावे ॥

वेळ आणि पैसा सत्कारणी लावू या ॥

तरुणांच्या तरुणाईला योग्य दिशा दाखवू या ॥

चला भीम जयंती साजरी करू या ॥”

कवी गणेश थोरात यांनी,

” हा वारा हे वादळ पुढे येत आहे॥”

यातून त्यांनी आजचे वास्तव चित्र मांडण्याचा प्रयास केला.

कवी मयुर गायकवाड,

” भीमा तुझ्या मताचे पाच माणसं शोधू कुठे भीमा ॥

लाचारी या समाजाची अजून संपलीच नाही ॥

प्रा.गजानन सोनोने ‘ वारकरी ‘ या कवितेत म्हणतात की,

” तव्यावर भाकरी जळताना पाहिली ॥

चितेवर स्वप्न मरताना पाहिली ॥

कवी पवन डोंगरे कवितेत म्हणतात की,

” चोरट्याच्या या बाजारात होती अत्याचार ॥

धर्म- जाती- अहंकार गेले उंचावर ॥

.कवी बनसोड यांनी आशयपूर्ण कविता सादर केली.

अशा या परिवर्तनवादी आंबेडकरी कविसंमेलनातील विद्रोही कवितांनी श्रोते विचारमग्न व मंत्रमुग्ध झाले होते.