प्रजाहितदक्ष महाराणी अहिल्याबाई होळकर 

91

महाराष्ट्र राज्याच्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी ग्रामात दि. ३१ मे १७७५ रोजी महाराणी अहिल्यादेवीचा जन्म झाला आणि दि. १३ ऑगस्ट १७९५ ला त्या अनंतात विलीन झाल्या.आज ३१ मे २०२५ ला असलेल्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

          आई सुशीलाबाई आणि वडील माणकोजी शिंदे यांच्याकडून सुसंस्काराचे धडे मिळाल्यामुळे अहिल्याबाईंचे बालपण संस्कारमय झाले होत .

     आई-वडिलांनी बालपणी केलेल्या या सुसंस्कारामुळे राज्यकर्ती झाल्यावर अहिल्याबाई जनकल्याणकारी कार्य फार मोठ्या प्रमाणात करू शकल्या. महेश्वरातील जनतेचा विकास करू शकल्या.तत्कालिन काळात स्त्रियांना घराच्या बाहेर जाण्याचा सुद्धा अधिकार नव्हता त्याकाळी वडील माणकोजी यांनी अहिल्यादेवीला शिक्षण देऊन साक्षर केल्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून झाला.अहिल्यादेवी जवळ विलक्षण प्रतिभा होती.त्या प्रतिभेचा योग्य तो उपयोग त्यांनी जीवनात पुढे केला.वडिलांच्या सुसंस्कारामुळे बलपणीच त्यांच्यात धैर्य,साहस जबाबदारीपणा, विवेकशीलता,प्रेमळता,करुणा, भूतदया हे गुण असलेल्या अहिल्यादेवीचे दर्शन माळवा प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांना झाल्यामुळे ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तत्काळ माणकोजीकडे आपल्या खंडेराव या सुपुत्रासाठी अहिल्यादेवीची मागणी केली. गावचे पाटील असलेल्या माणकोजींनी मल्हारराव होळकर यांची ही मागणी मान्य केली आणि वयाच्या आठव्या वर्षी बालवयातच अहिल्यादेवीचा खंडेराव सोबत विवाह संपन्न झाला.आता त्यांची ओळख होळकर या राजकीय घराण्याची सुनबाई अशी निर्माण झाली होती.

    सुभेदार मल्हारराव होळकर यांचा आपल्या सुनेवर,सुनेच्या कर्तुत्वावर,योग्यतेवर परिपूर्ण विश्वास होता म्हणून ते अहिल्यादेवींना राज्यकारभारासोबतच पत्रव्यवहार,सैन्य,रणनीती, प्रशासन,प्रजापालन,न्यायदान या व इतर अनेक गोष्टींची शिकवण सतत देत होते.अहिल्यादेवींनी सुद्धा मल्हाररावांना आपले राजकीय गुरूस्थानी मानले होते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वर्तणूक करीत.अहिल्यादेवी आणि खंडेराव यांच्या जीवनात सन: १७४५ ते १७४८ पर्यंत दोन रत्न जन्मास आले.पुत्ररत्न मालेराव आणि कन्यरत्न मुक्ताई.

        संसारात मोदमय वातावरण असतानाच अहिल्यादेवीच्या जीवनात मोदमय वातावरणाचे दुःखमय वातावरणात परिवर्तन झाले कारण दि.१९ मार्च

 १७५४ रोजी कुंभेरीच्या लढाईमध्ये पती खंडेराव शहीद झाले.पतीला वीरमरण आल्यामुळे अहिल्यादेवींना २८ व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झाले.तत्कालीन काळात पती निधनानंतर 

पत्नीला सती प्रथेला बळी पडावे लागत असे.त्या वेळच्या या प्रथेनुसार सती जाण्याचा निर्णय अहिल्याबाईंनी घेतला,पण मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ न देता ते अहिल्याबाईला म्हणाले,” तूच माझा खंडू आहेस.मला म्हाताऱ्याला टाकून तू कुठे चाललीस.प्रजाहितासाठी तरी तू सती जाऊ नये.हे राज्य तुला सांभाळायचे आहे.” सासर्‍यांच्या या मार्गदर्शनाचा – मधुर वाणीचा अहिल्यादेवींनी मान राखला. त्यांच्या विनंतीला मान दिला.अशा प्रकारचे सासरे आणि अशा प्रकारची सून ज्यांनी प्रजेसाठी परिवर्तनवाद स्वीकारला असे जनकल्याणकारी व्यक्ती होते.

   सती जाण्याऐवजी अहिल्याबाई राजकारणात सक्रीय होऊन राज्यकारभार करू लागल्या.दौलतीचा कारभार मोठा असलेल्या इंदूर संस्थानाची जहागिरी पेशव्यांनी मल्हाररावांकडे सोपविली होती. पण दुर्दैवाने सन : १७६६ या वर्षी मल्हारराव पंचतत्त्वात विलिन झाल्यामुळे मावळा प्रांताची जबाबदारी अहिल्यादेवींच्या नेतृत्वात त्यांचे सुपुत्र मालेराव होळकर यांच्यावर सोपविण्यात आली,पण सन : १७६७ ला मालेराव सुद्धा पंचतत्वात विलिन झाले.या पुत्र विरहाचा अहिल्यादेवीवर खूप मोठा परिणाम झाला.त्या खूप दुःखी झाल्या,पण खचल्या नाहीत. अखेर माळवा प्रांताची सूत्रे अहिल्यादेवींनी सन : १७६७ यावर्षी आपल्या हाती घेतली . सुधारणावादी विचारांच्या अहिल्यादेवींनी राज्याच्या विकासाकरिता पूर्वीच्या कायद्यामध्ये परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या.

      ” शेतकरी सुखी तर जग सुखी ” या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांची जाचक कराच्या अटीतून मुक्तता करून त्यांना दुःखमुक्त केले. गो – पालनाचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितल्यामुळे शेतकरी वर्ग सुखी होऊ लागला.

           सती प्रथेला कडाडून विरोध केला,अंधश्रद्धेचे निर्मूलन केले.प्रवासाच्या दरम्यान उपद्रव करणाऱ्या भिल्ल,गोंड आणि अन्य आदिवासी लोकांचे मतपरिवर्तन केले .

           महेश्वर दरबाराचा थाट हा त्याकाळी एखाद्या स्वतंत्र 

राज्यासारखा होता म्हणून सन : 1772 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राजधानी इंदूरहून नर्मदा तीरी महेश्वरला हलविली.त्याठिकाणी अनेक मोठ मोठया वास्तू बांधल्या.नदीला घाट बांधले. मंदिराचाही जीर्णोद्धार केला.योग्य न्यायदान करून जनतेला सुखी केले.    

        अहिल्याबाईंनी पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.महेश्वर विणकरांचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे त्यांनी वस्त्र उद्योगांना प्रोत्साहन दिले. राजाश्रय दिला.युद्धासाठी लागणाऱ्या दारूगोळ्याच्या कारखान्याबरोबरच त्यांनी अनेक उद्योगांना राजाश्रय दिला.राजश्री दिल्यामुळे अनेक उद्योगांना चालना मिळेल व उद्योगांचा फार मोठ्या प्रमाणात विकास होऊ लागला. 

          महाराणी अहिल्या बाईंनी 

वर्ण – जाती -धर्म -भेद न मानता समानतेवर आधारित अनेक प्रकारची लोककल्याणकारी कार्ये 

तत्कालीन काळात त्यांनी केली. त्यांची लोककल्याणकारी कार्य बघून व कीर्ती ऐकून अनेक विद्वान पंडित त्यांची भेट घेण्यासाठी महेश्वरला येत असत. अनेक विषयांचे शास्त्री,

कीर्तनकार,व्याकरणकार,

ज्योतिषी,पूजारी,वैद्य,हकीम यांनाही अहिल्यादेवी मुद्दाम बोलावून घेत असत,त्यामुळे महेश्वरनगरी तत्कालीन काळात संस्कृती,विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून ओळखली जात असे.अहिल्याबाई कर्तृत्ववान

आणि पराक्रमी राज्यकर्त्या तर होत्याच शिवाय त्या दानशूरही होत्या.द्वारका,रामेश्वरम, बद्रीनाथ,सोमनाथ,अयोध्या,

जगन्नाथपुरी,काशी,गया,हरिद्वार अशा वेगवेगळ्या ठिकाणांच्या मंदिरांचा जिर्णोद्धार अहिल्यादेवींनी केला.धर्मशाळा बांधल्या,घाट बांधले,रस्त्याची कामे केली.पुणे ते महेश्वर टपाल सेवा सुरू केली.सरकारी तिजोरीतून एक कवडीही खर्च न करता वरील सर्व कामे आपल्या स्त्रीधनातून करणाऱ्या अहिल्याबाई होळकर या दानशूर व उदार शासक होत्या.कुशल प्रशासक आणि पराक्रमी राज्यकर्ती म्हणून ४१ वर्षे राज्य कारभार समर्थपणे

 सांभाळणाऱ्या महाराणी अहिल्याबाई या दि. १३ऑगस्ट १७९५ रोजी अनंतात विलीन झाल्या.

                 आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा सामना करून त्यांनी ज्या पद्धतीने दुर्दम्य इच्छाशक्तीने स्त्री शक्तीचा वापर केला.तो खूप प्रशंसनीय आहे. स्त्रियांकरिता त्या कायम आदम्य नारीशक्ती, वीरता,पराक्रम,न्याय आणि राजतंत्रांचा एक अद्वितीय नमुना म्हणून कायम स्मरणात राहणार आहेत.त्या बाणेदार, स्वाभिमानी आणि उत्तम राज्यकर्ती होत्या. त्यांचे विचार,कार्य आणि त्यांच्या पराक्रमाची गाथा ही आजही मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे,म्हणूनच इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी महाराणी अहिल्यादेवीची तुलना रशियाची राणी कॅथरिन,डेन्मार्कची राणी मार्गारेट व इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांच्याशी केली,अशा या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांना ३०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(रुक्मिणी नगर,अमरावती)भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९