म्हसवड पोलिसांच्या धडक कारवाईत सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

161

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)

म्हसवड/सातारा(दि.15जून):-अवैध दारू विक्रीसाठी दारूच्या बाटल्या घेवून जाणाऱ्या एका इसमावर कारवाई त्याच्याकडील सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या एका कारवाईत मटका व्यवसाय करणाऱ्यावर छापा टाकून त्याच्याकडील जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील पोलीस ठाणे हद्दीतील अवैध दारू विक्री बंद व्हावी व त्याचे समूळ नष्टीकरण व्हावे या उद्देशाने त्याचबरोबर पळशी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेल्या दारूबंदी ठरावाच्या अनुषंगाने अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्या लोकांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या उद्देशाने पळशी येथील काही इसम अवैध दारू विक्री व वाहतूक अजूनही करत असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्यामुळे पळशी येथे पेट्रोलिंग करत असताना पळशी ते मार्डी रोड वरून पळशी येथील नदीच्या पुलावर एक मोटरसायकल चालक त्याच्या गाडीला पिशवी लावून भरधाव वेगात जात असताना त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो न थांबल्यामुळे त्याचा पाठलाग करून, त्यास पकडून त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या.

त्याला त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव धनाजी मुरलीधर गुजले, वय ३५, रा. पळशी, ता.माण असे सांगितले. तो पळशी गावामध्ये अवैधरित्या दारू विक्री करण्याकरिता दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ अ आणि ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून १ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भालवडी येथील सनी नंदकुमार बनसोडे हा कल्याण नावाचा मटका चालवत असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्यावर छापा टाकून त्यास मटका घेताना पकडल्यामुळे त्याच्यावर देखील म्हसवड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पो-लीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, देवानंद खाडे, अमर नारनवर, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, विकास बोडरे, विकास ओंबासे यांनी केली आहे.