देशी वृक्षांची लागवड करा 

71

मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती आणि टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड करण्यात आली नाही. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडले. त्याचा परिणाम तापमान वाढीवर झाला. तसेच बेसुमार वृक्षतोडीमुळे अनियमित पाऊस, उष्णता अशा संकटांना तोंड द्यावे लागले. यावर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्र सरकारने वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी या मोहिमेअंतर्गत लाखो वृक्षांची लागवड केली जाते. या मोहिमेत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, तरुण मंडळांनी यात हिरीरीने भाग घेतला.

नागरिकांनीही आपल्या घराजवळ, बागेत, शेतात मोकळ्या जागेत, माळरानावर वृक्षारोपण केले. यावर्षीही ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे. या वृक्षारोपण मोहिमेत परदेशी वृक्ष मोठ्या प्रमाणावर लावण्यात येतात. जास्तीतजास्त देशी वृक्षांची लागवड करणे आवश्यक असताना ज्या परदेशी वृक्षांची आपल्याला आवश्यकता नाही ; त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परदेशी वृक्षांमुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे वाढते तापमान, वातावरणातील बदल दूर करण्यातही परदेशी वृक्ष अपयशी ठरत आहे. देशी वृक्षांमुळे पावसाचे पाणी भूगर्भात टिकून राहते. विदेशी वृक्षांमुळे जमिनीची पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता नाहीशी होते.

दुष्काळामागे हे ही एक महत्वाचे कारण आहे. विदेशी झाडांच्या आम्लयुक्त पानांमुळे जमिनी नापीक होत आहे. विदेशी झाडांच्या फुलात परागकण नसतात त्यामुळे त्यावर फुलपाखरे किंवा भुंगे यासारखे कीटक येत नाहीत. विदेशी झाडांच्या पानांनी आणि सावलीने जमीन निकृष्ट होत आहे. या वृक्षांच्या फांद्यांचा आणि बुंद्याचा काहीही उपयोग होत नाही. विदेशी वृक्षांमुळे रातकिडे, वटवाघूळ, घारी, गिधाडे, चिमण्या कावळे, घुबड, कबुतरे, पोपट यासारखी सरास् दिसणारे पक्षी दिसेनासे झाली आहेत. एकंदरीत अशा विदेशी वृक्षांमुळे होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्षांद्वारे होणाऱ्या बिजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गाची अन्न साखळी कुमकुवत होत आहे.

देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा परिसरात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या आस्तित्वशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव अवस्थेत मनुष्य, पशुपक्षी, कीटक सामावले असतात. देशी वृक्षांमुळे पक्षांना कीटकांना, किड्यांनाही निवारा मिळतो. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा वृक्षाकडे पाठवण्याचे काम वृक्षांची दूरवर पसरलेली मुळे करत असतानाच जमिनीत खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात. विविध कीटकांना, किड्यांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण होते. विदेशी वृक्ष पुरेसा ऑक्सीजनही देत नाहीत. देशी वृक्ष जितका ऑक्सीजन देतात तितका ऑक्सीजन विदेशी वृक्ष देत नाहीत. काही देशी वृक्ष तर चोवीस तास ऑक्सीजन देतात. वातावरणातील ऑक्सीजन कमी होऊ द्यायचा नसेल तर देशी वृक्षांचीच लागवड करावी. वड, पिंपळ, कडुनिंब, आवळा, चिंच, फणस, आंबा, बेल, कदंब, पळस या वृक्षांची जास्तीतजास्त लागवड करण्यात यावी. देशी वृक्ष औषधी असतात शिवाय हे वृक्ष मोठे झाल्यास त्याची दाट व थंडगार सावलीही मिळते त्यामुळे जास्तीतजास्त देशी वृक्षांची लागवड करायला हवी. 

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५