श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे शुक्रवारी प्रस्थान

118

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

 पुसेगाव(दि.26जून):- तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने शुक्रवार २७ जून ते सोमवार ७ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय केली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन, देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव व विश्वस्तांनी केले आहे.

श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे ३० वे वर्ष आहे. शुक्रवार २७ जूनला सकाळी ७.३० वाजता पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होईल. शुक्रवार २७ जूनला महिमानगड, शनिवार २८ जूनला लोधवडे, रविवार २९ जून म्हसवड, सोमवार ३० जून पिलीव, मंगळवार १ जुलै तांदूळवाडी, बुधवार २ जुलै भाळवणी, गुरुवार ३ जुलै उपरी, शुक्रवार ४ जुलै वाखरी, शनिवार ५ जुलै पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. रविवार ६ जुलै चंद्रभागेत स्नान करून नगर प्रदक्षिणा होईल. सोमवारी ७ जुलैला चंद्रभागा स्नान करून दुपारी एक नंतर दिंडी तीर्थक्षेत्र पुसेगावकडे ट्रकमधून प्रस्थान करेल.  

दिंडी सोहळ्यादरम्यान ठीकठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, भारुड, हरिपाठ, दैनंदिन आरतीचा कार्यक्रम होईल. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिंडीच्या दुपारच्या जेवणाच्या व मुक्कामाच्या जागांची पाहणी करून उत्तमोत्तम नियोजन केले आहे. ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाईल. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबुंची सोय केली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयिंसुविधायुक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्ट मार्फत केली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसठी ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.